Thursday, July 8, 2010

पाउस, माणुसकी जागवणारा........


पाउस, माणुसकी जागवणारा........

आज सकाळची घटना. लोअर परेल स्टेशनवर गाडीतून उतरण्याची वेळ आणि त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरु झाला. आधीच उशीर झाला होता. चालत जान्या ऐवजी छत्री उघडून जवळच असलेल्या शेअर टाक्सी च्या रांगेत उभा राहिलो. बराच वेळ झाला तरी टाक्सी काही आली नाही. पावसाचा जोर वाढला होता, सहज मागे वळून पहिले तर माझ्या मागे रांगेत उभा असलेला एक गरीब माणूस छत्री नसल्याने मुसळधार पाऊसात चिंब ओला झाला होता. मी लागलीच त्याला म्हटले "मित्रा, माझ्या छत्रीखाली ये." त्यावर तो गरीब माणूस उत्तरला "साहेब, छत्री छोटी आहे, मला घेतल्यास तुम्हीही भिजून जाल". का कुणास ठाऊक माझ्या तोंडातून लागलीच शब्द बाहेर पडले "ये मित्रा ये, छत्री लहान असेल पण मन मात्र मोठे आहे". चेहऱ्यावरील पाणी हाताने पुसत त्यांनी मंद स्मित केले आणि तो छत्रीत आला. अंगाला पाणी लागू नये म्हणून आम्ही दोघांनीही छत्रीखाली अंग चोरून घेतले होते. पाउस जोरदार कोसळत होता, अंग पावसाने भिजले होते अन मनही भिजत होते जागे झालेल्या माणुसकीने.

थोड्या वेळात टाक्सी आली, त्यात एकच सीट होती. माझ्याकडे छत्री असल्याने मी त्याला पुढे पाठवले. जाताना त्याने मला 'धन्यवाद' दिले अन तो पुन्हा मंद स्मित देवून निघून गेला. मी मनाशीच विचार करू लागलो तो कोण? कुठला? काहीच माहित नाही, त्याचे अन माझे नातेही माहित नाही. तो निघून गेला होता पण त्याची क्षणिक भेट आजच्या धावपळीच्या जीवनात कुठेतरी कोमेजलेला माणुसकीचा अंकुर उगवून गेली होती. मी मागे वळून पाहीले म्हणून भाग्यशाली ठरलो होतो. जे त्याच्या मागे उभे राहून त्याला उघड्या डोळ्यांनी भिजताना पाहत होते ते कमनशिबी ठरले होते. असो, पाउस तर रोजच येणार आहे, एक दिवस अंकुर त्यांच्याही मनात फुटेल.

सचिन मेंडिस

No comments: