Monday, September 6, 2010

पॉल गुरुजीं


तस्मै श्री गुरवे नमः
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
गुरुजींच्या काळजात मोगऱ्याची बाग सतत फुललेली असते. त्यामुळे ते सदा प्रसन्न असतात. त्यांची स्नेहपूर्ण नजर हाच विद्यार्थ्यांसाठी धाक होता. गुरुजींनी बाल संस्कारकथा लिहिल्या आहेत. वास्तविक त्यांचे उभे जीवन म्हणजे एक चालतीबोलती संस्कारकथा आहे. त्यांचे चारित्र्यसंपन्न जीवन, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा समाजाला मिळालेला नित्यपाठ आहे.1940-50चा तो काळ. आमचा परिसर शेतकीप्रधान. शेतीसुद्धा मोठी नाही. गुंठ्यांच्या हिशेब. मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती. यामुळे सारेच शेतीत गुंतलेले. चर्चमधील धर्मगुरू शिक्षणाचा खूप आग्रह करीत; परंतु पालकांना त्याचे महत्त्व जाणवले नव्हते. अशा अतिशय प्रतिकूल काळात 1938/39च्या दरम्यान पॉल रुमाव व त्यांचे सहकारी फिलिप मशाद, डॉमनिक रूमाव, अं. चि. दमेल आदी मंडळी सातवीपर्यंत शिकली. तेव्हा "व्हर्नाक्‍युलर फायनल' (व्ह.फा.) म्हणजे फार मोठा टप्पा होता।
नंदाखाल या आमच्या गावात फादर रेमंड मेंडीस यांनी शाळा सुरू केली होती. या दूरस्थ खेडेगावात शिक्षक मिळणे हे महाकठीण काम होते. तीन-चार मुले व्ह.फा. झाली होती. त्यात पॉल रुमाव याचाही समावेश होता. फादरांनी त्याला आमच्या गावी शिकविण्याची परोपरीने विनवणी केली. पॉल नऊ वर्षांचा असताना त्याचे वडील देवाघरी गेले होते. पाठी दोन भाऊ. सर्व कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती. घरची शेती तर सांभाळायला हवी. बरे, नोकरी चालून आली, तीही जेमतेम 10 रुपये मासिक पगाराची; कारण पालकांना मुलांच्या शिक्षणात स्वारस्य नव्हते. तशात त्यांची आर्थिक स्थितीही ओढग्रस्तीची होती. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे फादरांनी ओळखले होते; पण शिक्षकांना चांगले पगार देण्याइतकी त्यांची ऐपत नव्हती. मुंबईच्या आपल्या नातेवाइकांकडून भिक्षा मागून त्यांनी शाळा सुरू केली होती. फादरांचा आग्रह पॉलला मोडवेना. त्याने आईची समजूत घातली आणि फादरांना होकार कळवला. शाळेव्यतिरिक्त उरलेला वेळ शेतीत।
एकदा गुरुजी मला म्हणाले, ""मला खूप शिकायचे होते. त्या वेळच्या पद्धतीनुसार आईने माझ्यासाठी "स्थळ' शोधले. मला लवकर लग्न करायचे नव्हते. मी आईची परोपरीने समजूत घालण्याचा प्रयत्न करत होतो; पण तिने काही माझे ऐकले नाही. घरात आणखी एक माणूस म्हणजे शेतीसाठी बिनपगारी आणि हक्काचा माणूस.''गुरुजींना संसारात पडावे लागले. तरीही त्यांनी आपली ज्ञानसाधना सुरूच ठेवली. दिवसभर शाळेत शिक्षणदान आणि फावल्या वेळेत शेतीकाम, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला।
गुरुजींनी जवळजवळ चाळीस वर्षे अध्यापन केले. दोन पिढ्यांवर संस्कार केले. शिकविता शिकविता त्यांनी बाहेरून अकरावीची परीक्षा दिली आणि ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. वाचन हा त्यांचा छंद होते. ते आम्हाला नेहमीच सांगायचे, ""शाळेत असताना मी खाऊकडे नाही, तर पुस्तकांसाठी हट्ट करीत असे. आगाशी गावात दर सोमवारी आठवड्याचा बाजार भरतो. जवळच माझे आजोळचे गाव आहे. त्यामुळे आईचा बाजार कधी चुकला नाही. बाजारात उपलब्ध असलेली गोष्टींची पुस्तके आई आणत असे. मी ती अधाशासारखी वाचून काढत असे. वाटेने जाताना खाऊभोवती गुंडाळलेल्या वर्तमानपत्राचा एखादा कपटा दिसला, तरी तो उचलून वाचत असे.''मराठी भाषेवर गुरुजींचे निरतिशय प्रेम आहे. त्यांचे उच्चार शास्त्रशुद्ध आहेत. व्याकरण शिकविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना व्याकरण हा विषय कधी कंटाळवाणा वाटला नाही. गुरुजींचे वाचन चौफेर होते. गद्य-पद्य शिकवताना गुरुजी तल्लीन होऊन जात. अनेक कवी आणि लेखकांचे संदर्भ ते सहजपणे देत असत. त्यामुळे मराठीचा तास म्हणजे आमच्यासाठी आनंदयात्रा होती. जिव्हाळ्याने मराठी शिकविणे, हा मराठी भाषेवरील प्रेम वाढविण्याचा उपाय आहे।
गुरुजी आम्हाला अनेक विषयांवर निबंध लिहायला सांगत आणि उत्कृष्ट निबंधाचे वर्गात वाचन करून दाखवत असत. "पावसाळ्यातील एक दिवस' हा विषय त्यांनी दिला होता. आम्ही सातवीत होतो. त्या वेळी मी घरी येत असलेल्या एका वर्तमानपत्रातील अग्रलेखात आलेली कवितेची एक ओळ माझ्या निबंधात उद्‌धृत केली होती. माझा निबंध गुरुजींना नक्कीच आवडेल, अशी अटकळ मी मनाशी बांधली होती. गुरुजींनी एक-दोघांचे निबंध वाचले. त्यांनी माझे नाव पुकारले आणि ते प्रेमाने म्हणाले, ""काय रे कुठली पुस्तके वाचतोस? तू काय लिहिले आहेस, त्याचा अर्थ तुला समजतो का?'' नाराजी व्यक्त करत त्यांनी वही परत केली. माझे काय चुकले, ते कळेना. घरी जाऊन मी वही उघडून पाहिली. एका संपूर्ण वाक्‍यावर गुरुजींनी लाल शाईने फुली केली होती. ते वाक्‍य होते, "अंगे भरली जलधारांनी...' बालवयात मला त्याचा अर्थ समजला नव्हता आणि गुरुजींनीही तो समजावून देण्याचा (विनाकारण) त्रास घेतला नाही!
गुरुजी मराठी भाषेची निरलसपणे सेवा करत आहेत. आपले मित्र बावतीस दाबरे आणि फादर कोरिया यांच्या सहकार्याने त्यांनी सामवेदी बोलीतील लोकगीतांचे, तसेच म्हणी आणि वाक्‌प्रचारांचे संशोधन करून "सामवेदी लोकगीते', "मधाच्या घागरी', "सामवेदी ख्रिस्ती समाज' आदी पुस्तके संपादित केली आहेत. वसई परिसरात वापरत असलेल्या आणि आधुनिकतेमुळे विस्मृतीत जात असलेल्या म्हणींवर आधारित गोष्टींची पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. अशाप्रकारे लोकभाषांच्या अभ्यास दालनामध्ये त्यांनी मोलाची भर घातली आहे।
विनामूल्य भूमापन हा गुरुजींचा एक आवडता छंद आहे. गणिती सूक्ष्मतेचे वरदान त्यांना लाभले आहे. त्यामुळे आज त्यांनी वयाची पंचाऐंशी वर्षे पूर्ण केली असली, तरी भूमापन करण्यासाठी त्यांना तालुक्‍यातून आमंत्रणे येतात. त्यांचा स्वभाव माया करताना फुलाहून कोमल आणि सामाजिक व्यवहार करताना वज्राहून कठीण असा आहे. ऋजू स्वभावामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटतात. गावात लहानसहान बाबींवरून कुरबुरी होत असतात. प्रश्‍न सामोपचाराने सोडविण्यासाठी अनेक जण त्यांची मध्यस्थी मान्य करतात।
सरकारी नियमाप्रमाणे गुरुजी अठ्ठावन्नाव्या वर्षी शाळेतून निवृत्त झाले. ज्ञानदानापासून मात्र त्यांनी निवृत्ती घेतलेली नाही. गुरुजींनी जितके वर्गात शिकवले, त्यापेक्षा जास्त जगाच्या वर्गात शिकवले. गुरुजी कोणावरतरी रागावले आहेत, असे कधी घडले नाही. गुरुजींच्या काळजात मोगऱ्याची बाग सतत फुललेली असते. त्यामुळे ते सदा प्रसन्न असतात. त्यांची स्नेहपूर्ण नजर हाच विद्यार्थ्यांसाठी धाक होता. गुरुजींनी बाल संस्कारकथा लिहिल्या आहेत. वास्तविक त्यांचे उभे जीवन म्हणजे एक चालतीबोलती संस्कारकथा आहे. त्यांचे चारित्र्यसंपन्न जीवन, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा समाजाला मिळालेला नित्यपाठ आहे. त्यांची भेट होताच आपोआप हात जुळतात।
फादर फ्रान्सिस दिब्रिटो

No comments: