Saturday, March 1, 2014

'खित' नावाची आठवण.. !

'खित' नावाची आठवण.. !

'खित' ह्या शब्दात इतकी मिठास आहे, कि ज्याला ती येते तो ती अनुभवू शकतो. खित म्हणजे आठवण, नुसती आठवण का? नाही,  महाप्रचंड आठवण, शरीरापासून दूर असलेल्या व नजीकच्या काळात संवाद न घडू शकलेल्या व्यक्तीच्या विरहाचा प्रेमळ आविष्कार ! कधीकधी मी काव्यात सहजंच बोलून जातो, 'जिथे प्रीत आहे, तिथे खित आहे'. आपल्यालावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मायेच्या व्यक्तीच आपल्या मधील भौगोलिक अंतर वाढलं कि जन्म घेते ती खित.

लहानपणी बऱ्याच दिवसानंतर मामाकडे जाण्याचा योग आला, कि मामाकडे ओटीवर चढताच मामाकडची बय आपल्याला गच्च मिठीत सामावून घेत असे, अन म्हणत असे 'पोरा तू होतो कडे, कोडी खित आल्ती तुयी मला'.  अन तिच्या उबदार मिठीचा स्पर्श होताच आपलीही खित पूर्ण होत असे, ज्याला आपण 'खित मोडली' असं म्हणत असू. दुसरे उदाहरण बघा, मुलगी बाळंतपणासाठी माहेरी यावी, ६ महिने राहावी, त्यात त्या इवलुश्या बाळाचा जन्म, त्याच्या कोवळ्या रडण्याची कानाला झालेली सवय अन त्याच्या अंगाला लावण्यात येणाऱ्या पावडरचा निरागस सुवास. किती सवयींच होऊन जाते. अन अचानक मुलगी लेकराला घेऊन सासरी निघून जाते मग राहते ती फक्त खित अन खित. ते घरून गेल्यानंतर मागे राहिलेली रात्र किती भकास अन उदास वाटते. पहाट होते कधी अन त्यांना जाऊन भेटतो कधी असं जीवाला  वाटून जाते. हीच ती ताकद 'खित' नावाच्या शब्दाची. आपल्या पासून दूर गेलेलं आपल हक्काचं माणूस जवळ यावं अन त्याला जवळ घेताना नकळत डोळे भरून यावे, हाच खरा त्या  खितीचा अवर्णनीय आनंद.

घरापासून दूर परदेशात असणाऱ्या व्यक्तीची तर कहाणीच वेगळी. त्याला त्याच्या कुटुंबाची, घराची, गावाची अन मागे ठेवून गेलेल्या समाजाची काय खित येत असेल ते त्या एकट्या जीवालाच माहित.आजच्या सोशल मिडीयाच्या युगात फेसबुक अन वोट्सअप जरी उपलब्ध असले तरी ती फक्त  संपर्काची साधने, त्यातून 'संवाद' थोडाच घडतो. आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीला भेटण्याचा, त्याला मिठीत घेण्याचा, त्याला भरभरून पाहण्याचा अन त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याच्याशी संवाद साधण्याचा योगच स्वर्गीय अन त्यासाठी खरेखुरे भौगोलिक अंतर नष्ट होणे गरजेच असते, कारण खित मोडण्याचा तोच खरा नैसर्गिक मार्ग असतो. बाकी सगळ्या कृत्रिम सोयी, मनाच्या समजूत करणाऱ्या. फेसबुक अन वोट्सअपवर शेकडोनी आपले मित्र मैत्रिणी असतात पण मनापासून खित यावी असे हाताच्या बोटावरही मोजता येणारे चेहरे सापडत नाही, कारण ज्यांची खित यावी असे चेहरे फेसबुकच्या आभासी दुनियेपासून अलिप्त असतात, अन त्यांना लाईक देण्यासाठी आभाशी दुनियेतून वेळ काढून खऱ्या दुनियेत प्रत्यक्ष भेट घ्यावी लागते.

खित फक्त व्यक्तीचीच येते का? तर नाही, खित व्यक्ती पासून पशु-प्राणी, स्थळ-काळ अन निसर्गाच्या बदलणाऱ्या ऋतुचीही येते. ग्रीष्म ऋतूत उन्हाने शरीराची लाहीलाही होते तेव्हा मन चातकासारखी वर्षा ऋतूची वाट पाहते. मला तर पावसाच्या पहिल्या सरीने मातीला येणारा सुगंधाची खित येते. तो सुगंध नाकावाटे शरीरात विरघळल्याशिवाय हृदयात खरा पाऊस डोकावतच नाही.

हे ललित वाचत असताना आपल्यापासून दूर असलेल्या आपल्या व्यक्तीची आठवण करून बघा, काय वाटते? जर आपल्यापासून दूर असतील तर भेटण्याची आस अन जर आपल्याला कायमचे सोडून देवाघरी गेल्या असतील तर? फक्त अन फक्त आठवणी, न संपणाऱ्या, न मावळणाऱ्या. ते कधीही भेटणार नाहीत हे वास्तव मान्य करून येणारी खित? किती जीवघेणी. त्या खितीची भूक, कधीही न मिटणारी....खितीपासून सुरु होऊन फक्त 'खित' म्हणून उरणारी !!

तू असता दूर, यावी हलकीच खित !
वाऱ्यासंगे उडून तुझकडे, विरघळावे मिठीत !

 सचिन मेंडिस

No comments: