Wednesday, August 6, 2014

दिमाग कि कमाई !!

दिमाग कि कमाई !! मागच्या आठवड्यात बांद्रा कुर्ला संकुल येथील अमेरिकी दुतावासात विजासाठी मुलाखतीला जाण्याचा योग आला. मुलाखतीसाठी कागदपत्रे अन मोबाईल इतका ऐवज घेवून मी तिथे पोहचलो. अमेरिकी दुतावासात सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने मोबाईल इमारतीमध्ये नेण्यास मज्जाव होता पण तिथे बाहेर भाड्याने लॉकर मिळतील अशा आशेवर मी घरून सोबत मोबाईल घेऊन गेलो. (आजकाल मोबाईल घरी सोडून मुंबईत जाणे एखाद्या निर्जन बेटावर जाण्यासारखे वाटते). सकाळी ९ वा.ची मुलाखत होती अन मी तिथे ८.३० ला पोहचलो. मुसळधार पाऊस सुरु होता, इमारतीबाहेर उभे राहण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने छत्री असूनही अर्धे शरीर भिजून गेले होते. बाहेर लॉकरविषयी चौकशी केली पण इथे लॉकर उपलब्ध नाही असे ऐकायला मिळाले. आता मोबाईल ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला. आतमध्ये मुलाखतीसाठी गेलेल्या लोकांचे काही नातेवाईक बाहेर उभे होते त्यांना मोबाईल ठेवण्याची विनंती केली पण त्यांना लागलीच निघायचे असल्याने त्यांनी नकार दिला. मुलाखतीसाठी आत जाण्याची वेळ जवळ येत होती अन मोबाईल ची व्यवस्था होत नव्हती त्यामुळे मनाची घालमेल होत होती. दूर सायकलवर चहा विकणाऱ्या एका फेरीवाल्याकडे माझी नजर गेली, त्याच्याकडे जाऊन मी मोबाईल ठेवण्याची विंनती केली पण त्याने नकार दिला परंतु लांब उभ्या असलेल्या एका मारुती ८०० कारकडे बोट दाखवून तिथे जाऊन विचारायला सांगितले. मी तिथे जाऊन चौकशी केली तर लक्षात आले कि ती कार एक फिरते लॉकर बनवले गेले होते. बाहेर त्याचा एक माणूस लोकांमध्ये फिरून माझ्यासारखे गिर्हाईक आणण्याचे काम करीत होता. प्रत्येकी २०० रुपये घेऊन त्यातील एक मनुष्य एका पिशवीत आपले सामान ठेऊन एका वहीत सामान ठेवणार्याचे नाव व मोबाईल क्रमांक लिहून घेत होता. मी माझा मोबाईल व गाडीची चावी पिशवीत घालून त्याच्याकडे दिली व नाव व मोबाईल क्रमांक त्याला सांगितला. त्याने मला एक टोकन दिले व सामान परत घेतेवेळी ते टोकन परत करावयास सांगितले. त्याच्या त्या छोट्याश्या कारमध्ये सकाळच्या २ तासात सामानाच्या जवळजवळ ५० पिशव्या ठेवलेल्या आढळल्या व अजून अख्खा दिवस मुलाखतीसाठी लोक येणे बाकी होते. मी मनातल्या मनात हिशोब केला कि दिवसाला ह्याच्या गाडीत जर कमीत कमी ५० पिशव्या सामान ठेवण्यासाठी येत असतील तर ५० पिशव्या गुणिले प्रत्येकी २०० रु. प्रमाणे दिवसाची कमाई रुपये १०००० होती तीही गाडी न चालवता. महिन्याचा हिशोब केला तर २६ दिवस गुणिले प्रतिदिन १०००० रुपये म्हणजे जवळपास अडीच लाखाच्या आसपास त्या गाडीची उलाढाल होती. ३ लाखाची मारुती ८०० गाडी महिन्याला कुणाला अडीच लाख कमावून देत असेल ह्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण ज्याच्याकडे डोके आहे अन जो लोकांच्या गरजेचे रुपांतर आपल्या व्यवसायात करू शकतो त्याला मुंबईत पैसे कमावणे कठीण नाही हे मला त्या अनुभवातून शिकायला मिळाले. माझा हा अनुभव आपल्यालाही काही शिकवून जाईल म्हणून हा प्रपंच. बाकी कुणाची मारुती ८०० गाडी निकालात काढायची असेल तर धंद्याचा विचार करायला हरकत नाही.

No comments: