Monday, April 20, 2015

निग्रो कोपात !!

निग्रो कोपात !!

त्या दिवशी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी सायकल घेऊन मी बोळींज सोपारा रस्त्यावरून निघालो होतो. रस्त्यात थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या शेजारी दोन आफ्रिकन निग्रो व्यक्ती रस्त्याशेजारी गप्पा मारताना आढळले. गेली अनेक वर्षे ते तिथे भाड्याच्या बंगल्यात वास्तव्यास होते अन कधीतरी चर्चमध्ये इंग्रजी मिस्साच्या वेळी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा योग आला होता. मी सहज सायकल थांबवून त्यांना विचारले, 'हाव आर यु फ्रेंड्स? आप को हिंदी भाषा आती है क्या?'. त्यावर त्यातील एक निग्रो बोलला, 'कोपात, हिंदी भी आती है और कादोडी पण आमाला बोलता येते'. मी अवाक झालो. निग्रो अन चक्क कादोडीत संभाषण. त्याने मला नाव विचारले. 'तुवा नाव का', मी त्याला 'सचिन मेंडीस' असे नाव सांगितले अन जवळच राहतो अशी माहिती दिली. मी त्यांना त्यांची नावे विचारली. एकाचे नाव 'जेम्स ओडुम्बे' अन दुसऱ्याचे 'टोनी ओडुम्बे' अशी नावे त्यांनी सांगितली. दोन्ही भाऊ मुळचे केनियाचे. मुंबईतून आफ्रिकन देशात ते तयार कपडे निर्यात करण्याचा व्यवसाय करीत होते. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी येथील निसर्ग सौदर्य, कुपारी संस्कृती अन समाजजीवन ह्यांची भरभरून स्तुती केली अन काही कुपारी मित्रांची नावे सांगितली ज्यांच्याकडून ते कादोडी भाषा शिकले होते. पण त्यांनी सांगितलेल्या एकही व्यक्तीला मी ओळखले नाही.

गप्पा करीत करीत आम्ही त्यांच्या बंगल्याच्या गेटपाशी पोहचलो. गेटच्या आत एक निग्रो बाई वालच्या शेंगा तोडत होती. जेम्सने तिला हाक मारली. बहुतेक ती त्याची बायको असावी. कमरेची पिशवी सावरत ती गेटपाशी आली. जेम्सने आफ्रिकन भाषेत तिला काही सांगितले ज्यात 'फ्रेंड' हाच शब्द तेवढा मला कळला. तिने माझ्याकडे स्मितहास्य केले अन म्हटले,' कुण्या, शा घेवोन जा'. तिचे ते शब्द ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी 'नाही, आभारी' असे तिला म्हटले. तिच्या कमरेच्या पिशवीतील वालाच्या शेंगा पाहून मी कुतूहलाने तिला विचारले, 'डू यु लाइक दिज वेजीटेबल्स?' त्यावर ती म्हणाली,' वालायो हिंगो, जाम टेस्टी'. मागून जेम्स म्हणाला,'काळ्या रवयसा वांगा घायला तर कोपात का खायदा का'. त्यांचे अस्सल कुपारीपण पाहून मला काही सुचेनासे झाले. माझी उत्सुकता आता शिगेला पोहचली होती. मूळ कुपारी माणूस हक्काची कादोडी भाषा मागे टाकत असताना अशा परक्या लोकांना त्यांच्या १५ वर्षाच्या वास्तव्यात इतके कुपारीपण यावे हे नक्कीच कौतुकास्पद होते.

मी त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील एकंदर फोटो पाहून घरात ख्रिस्ती वातावरण असल्याचे आढळले. मी सोफ्यावर बसणार तितक्यात एक म्हातारी निग्रो बाई हातात एक लहान मुलं घेऊन बाहेर आली. 'ई आम्शी बय' टोनीने मला तिची माहिती दिली. पूर्ण पांढरे झालेल्या झिपरी केसांच्या त्या म्हातारीला तांबडे लुगडे नेसले तर कसे दिसेल असे उगाचंच त्या वेळी माझ्या मनात आले. ती म्हातारी बाई त्या लहान मुलाला घेऊन ओटीवरच्या झोपल्यात बसली अन तिने 'येला तू गाये, देला तू दूध' हे गाणे घेतले. तेवढ्यात जेम्सच्या बायकोने सासूला हाक मारून 'उठ माळ्या सांदाला' गीत घ्यायला सांगितले. मला मी स्वप्न वैगेरे पाहतोय कि काय असे क्षणभर वाटू लागले. काही वेळ सोफ्यात बसेतो मला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला. हातात प्लेट घेऊन आतमधून एक स्त्री बाहेर आली अन तिने माझ्या पुढ्यात 'तळणाच्या रोट्या' ठेवल्या. टोनीने ती त्याची बायको असल्याचे मला सांगितले अन अनेक कुपारी रेसिपी तिला जमत असल्याची सुग्रास माहिती दिली. पुढ्यात ठेवलेली गरम कुरकुरीत रोटी तोंडात टाकीत असताना मला त्या 'तळणाच्या रोट्या' आफ्रिकेतील केनिया, झाम्बिया, सोमालिया, इथोपिया येथे एक्स्पोर्ट करण्याची भन्नाट कल्पना सुचली. टोनीच्या बायकोची कुणीतरी कुपारी मैत्रीण होती तिने तिला ती कुपारी रेसिपी दिल्याची कुरकुरीत माहिती मला टोनीने दिली. 'संध्याकाळच्या वेळेला रोट्या कशा? असा प्रश्न मी टोनीच्या बायकोला विचारला तर तिने कादोडीत माझी विकेट घेतली. ती म्हणाली,' हाकोटे पीठ घायलोतो, आते आलो, सून कमीजास्ती जाला वाटते'. मला जणू शॉक बसला होता.

मी रोटी खात खात जागेवरून उठलो अन मोबाईलमध्ये फोटो घेऊन त्यांचा निरोप घेतला. गेटवर एक पाववाला जोरात सायकलची बेल वाजवत होता. बराच वेळ तो बेल वाजवत असल्याने त्याच्या कर्कश बेलने माझे कान भरून आले. मी त्याला काही बोलणार इतक्यात मला माझ्या बायकोची हाक ऐकू आली. 'सचिन, कते पासून अलार्म वाजाते, मोबाइल स्नुज कर'. मी झोपेतून धाडकन जागा झालो अन बिछान्यावर बसलो. सकाळी सकाळी मला ते विचित्र 'निग्रो' स्वप्न पडले होते. मी त्या स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला पण काही करून मला त्याचा अर्थ लागला नाही. नंतर चहा पीत असताना मला टोनीच्या बायकोने पुढ्यात ठेवलेली कुरकुरीत रोटी आठवली अन मी गालातल्या गालात हसत झाम्बियामध्ये रोटी एक्स्पोर्ट करण्याचे स्वप्न पाहू लागलो.

No comments: