Tuesday, August 27, 2013

माजी महापौर श्री. राजीव पाटील ह्यांना अनावृत्त पत्र

माजी महापौर श्री. राजीव पाटील ह्यांना अनावृत्त पत्र

--------------------------------------------------------------------------------------------------प्रती श्री. राजीव पाटील,

माजी महापौर, वसई - विरार महानगर पालिका,



महोदय,



आपण पर्यावरणप्रेमी असल्याने व वसईचा निसर्ग वाचण्याच्या दृष्टीने आपल्या दीर्घकालीन योजना ऐकुन असल्याने मी आपणास हे छोटे ई -पत्र लिहित आहे. अविवेकी आंदोलन करून पोलिसांचा मार खाण्यापेक्षा हा सुशिक्षित संवाद तसा चांगला वाटतो. वसईचा निसर्ग आणि भूमिपुत्र वाचण्याच्या दृष्टीने आपण हा विषय गांभीर्याने घ्याल अशी मला आशा आहे.



आपण स्वतः तालुक्यातील आघाडीचे बांधकाम व्यावसायिक आहात, त्यामुळे सदर बांधकामासाठी लागणारे पाणी मोठ्या प्रमाणात पश्चिम पट्ट्यातील बागायती जमिनीतून अवैध रीतीने उपसा केले जाते हे आपणास ज्ञात असेलच. दुर्दैवाने ह्यात तालुक्यातील बांधकाम व्यावसायिका बरोबर पाणी विकून आपल्या मातीशी बेईमानी करणारे काही स्थानिकही जबाबदार आहेत. आपणास माहित असूनही सांगावेसे वाटते की, वर्षोनवर्षे विहिरीवर होत असलेल्या ह्या अत्याचाराने विहिरी कुपोषित झाल्या असून सध्या असलेले पिण्याचे पाणी अति क्षारयुक्त बनले आहे, जे मानवी आरोग्यास धोकादायक आहे.



ह्या वर्षी राज्यातील विदर्भ-मराठवाडयात भीषण असा दुष्काळ आहे हे सर्वश्रुत आहे परंतु दुर्दैवाने वरुणराजाची सदैव कृपा असलेल्या निसर्गसंपन्न अशा वसई विरार परिसरात मे महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवावे हे गंभीर अन धोक्याची घंटा वाजवणारे आहे. आपल्या पक्षाने गाजावाजा करून आणलेल्या सुर्या प्रकल्पाचे पाणी मधेच शहरातील आपल्या सवंगड्यानी शोषून घेतल्याने फक्त विहिरीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या आम्हा गावकर्यांना ह्या काळात पाण्याचा दुसरा कोणताही स्त्रोत उपलब्ध होणार नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात परिसरातील पाणी पेटून कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू शकते. पाण्यासारखा मुलभूत प्रश्न सुटला नसताना गरज नसलेले स्काय -वाल्क बांधणारे लोकप्रतिनिधी मिळणे हि आमच्या लोकशाहीची खरी शोकांतिका आहे, असो.



'स्वाभिमानी वसईकर संघटनेच्या' माध्यमातून अवैध पाणी उपशाचा हा विषय आम्ही वारंवार महापालिकेकडे लोकशाही पद्धतीने मांडत आले आहोत. परंतु दुर्दैवाने निर्णय घेणाऱ्या सत्ताधाऱ्याच्या पैशाचे झाड, ह्या पाण्यावरती पोसत असल्याने व महापालिका प्रशासन त्यांचे मिंधे असल्याने मागील काळात पाण्याची तस्करी खुलेआम चालू आहे. आपल्या कानी ह्या गोष्टी घालूनही बागायती पट्ट्यात सकाळी सायकल स्वारी करणारा आपल्या सारखा निसर्गप्रेमी व्यक्ती ह्या गोष्टीवर कानाडोळा करतो हे खेदजनक आहे.



वसई विरार बागायती भागातील निसर्गाचा व नागरी आरोग्याचा व्यापक विचार करता अवैध पाणी उपसा थांबणे अगत्याचे आहे. त्याकरिता तातडीची उपाययोजना म्हणून तालुक्यातील बांधकामे पावसाळ्यापर्यंत बंद करण्याचे आदेश आपण आपल्या बांधकाम व्यावसायिकाने देणे गरजेचे आहे. आपण सत्ताधारी पक्षातील वजनदार आणी आदरणीय नेते असल्याने आपले आदेश आपली मित्रमंडळी मानतील ह्याची आम्हास आपल्यापेक्षा जास्त खात्री आहे.



ऐन मे महिन्यात शहरातील विशेष लोकांना क्लबमधील तरणतलावांचा थंडावा मिळत असताना आम्हा सामान्यजणांना दोन वेळचे पाणी मिळावे म्हणून आमचा हा आटापिटा चालला आहे. आपण ह्या गंभीर विषयात लक्ष घालून आपले पर्यावरणाशी असलेले नाते अधिक दृढ कराल अशी मी अपेक्षा करतो.



आपला,



सचिन मेंडीस

सचिव, स्वाभिमानी वसईकर संघटना



ता. क. : आपल्या उत्तरापेक्षा आपल्या कृतीची अपेक्षा बाळगतो.

No comments: