Wednesday, July 23, 2014
गंध चाफ्याचा !!
गंध चाफ्याचा !!
काही माणसे सुगंधित असतात, त्यांच्या सहवासात आठवणीचा चाफा हळूच दरवळतो. अळवाच्या पानावर पाण्याचा थेंब साचून क्षणभर त्याचा मोती व्हावा तसा अशा माणसाच्या सहवासात क्षणाचे शिंपले मोती बनतात. अन जर अशी माणसे बुजर्ग म्हातारी असतील तर त्यांच्या सुरकुती पडलेल्या हाताच्या हळूच स्पर्शाने स्वर्गीय प्रेमाचा आनंद मिळतो.
अशाच एका प्रेमळ अन मायाळू आजीला भेटण्याचा योग आला. माझ्या चुलत भावाची मामा कडची बय जिला सर्वजण प्रेमाने 'बाय' म्हणतात. लहानपणी आमच्या घरी यायची तेव्हा आवर्जून काही तरी खाऊ घेऊन यायची. तिने आणलेल्या खाऊपेक्षा तिच्या देण्यालाच जास्त चव होती. बऱ्याच वर्षात तिची भेट झाली न्हवती. आठवणीतल्या वहीत कोणत्या तरी पानात ती गुडूप झाली होती. आजच्या सोशल दुनियेच्या युगात आभासी लोकांना जवळ करणारी आमची पिढी अशा सुगंध देणाऱ्या माणसापासून अलिप्त झाली आहेत, ह्याचे क्षणभर शल्य वाटले.
सहजच चुलतभावाशी विषय काढला अन मागच्या रविवारी त्याच्या मामाकडच्या बायला भेटण्याचा बेत ठरला. बाय तशी देखणी, गोरीपान, घारे डोळे. चाफ्यासारखी दिसायची अन चाफ्यासारखी सुगंधी दरवळायची ! मामाकडच्या ओटीवर चढून आतमध्ये डोकावले तर बाय बसलेली होती. हातात पांढऱ्या रंगाची रोजरी घेऊन तिची जपमाळ चालू होती. वयाची ८० पार केल्याने डोळे अन कान साथ देत न्हवते. चाफ्यासारख्या चेहऱ्यावर वार्धक्याच्या खुणा जमा झाल्या होत्या पण डोळ्यातील तेज बदलले न्हवते. चुलतभावाने तिला विचारले 'कोण आले आहे माझ्याबरोबर?. तर तिने डोळे किलकिले करून चेहरा आठवण्याचा
प्रयत्न केला. कित्येक वर्ष तिची भेट न झाल्याने ती बहुदा ओळखणार नाही असे वाटले होते, पण तिने मला ओळखले. पण तिला नाव काही आठवत न्हवते. जवळ घेऊन तिने आपुलकीने चौकशी केली. 'तुवा दरी का हाय' असा तिचा प्रश्न म्हणजे मला लेकरे किती असा सरळ सोपा होता. आम्ही मोठे झालो, शिक्षण झाले अन मार्गी लागलो याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटाना सामोरी जाऊन पुन्हा उभी असलेली बाय मनात अजून फुलत गेली. मी तिची आठवण काढून तिला भेटायला आलो ह्याचा तिला हर्ष झाला. 'मी घरी असते पण तुम्ही कामात असता त्यामुळे तुम्हाला वेळ मिळत नाही, त्यामुळे तुमची काय तक्रार करणार ' असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा नकळत हृदयाला काटा टोचला अन शल्य वाटले. वेळ नाही ह्या सबबीखाली सोन्यासारखी माणसे दुरावलेली आमची उच्चशिक्षित पिढी, काय कामाची. तिचा निरोप घेत असताना पुन्हा तिच्या सुरकुतलेल्या हाताचा दैवी स्पर्श झाला अन २५ वर्षापूर्वी तिने हातात दिलेल्या गाठ्याच्या पुडीचा वास क्षणभर आठवणीच्या कप्प्यातून बाहेर आला.
अंगणात पायात चपला चढवत असताना ओटीपर्यंत सोडायला आलेली बाय मनात पुन्हा पुन्हा साचत गेली. हातात रोजरी घेऊन इतरांसाठी प्रार्थना करणाऱ्या आपल्या ह्या वात्सल्यमुर्ती आपल्याला मिळालेल्या ईश्वरी देणग्या आहेत. आपल्या आसपास असे चाफे असतील तर जरून त्यांच्या भेटीला जा. तेही फुलतात अन आपल्यालाही फुलवतात. जीवन सुगंधित करण्यासाठी अन क्षणाला मोती बनवण्यासाठी त्याची भेट अन संवाद जरुरी आहे !!
Wednesday, July 16, 2014
फिल्मी दुनियेत करिअर!
सकाळी Facebook ह्या व्यासपीठावर पोस्ट चाळत असताना ग्राहम गोन्साल्वीस ह्या तरुणाची पोस्ट वाचनात आली. पोस्ट सोबत टाकलेला फोटो 'प्रोफेशनल' वाटला अन पोस्टची उत्सुकता वाढली. त्याने स्वतःने लिहिलेला, संगीतबद्ध केलेला अन गायलेल्या गीताचा त्यात उल्लेख होता. या अनोळख्या तरुणाने हौशेखातर काही केलं असेल अस वाटून पुढची पोस्ट वाचण्याचा विचार केला पण एका अनामिक उत्सुकतेने पुन्हा त्याने दिलेली लिंक गाठली अन त्याने निर्मित केलेले 'तेरा दिवाना' हे गीत ऐकले. आश्चर्य म्हणजे इतका प्रतिभा असलेला तरुण इतके दिवस कुठे लपला होता असा मनात विचार आला. दर्जेदार गीतरचना, रोमांटिक संगीत अन त्याला साजेसा प्रेमळ आवाज असा त्रिवेणी मिलाफ ह्या गीतात अनुभवयास मिळाला.
मुंबई म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीचे माहेरघर. संपूर्ण भारतातून अनेक तरुण तरुणी नशीब कमवण्यासाठी ह्या मायावी दुनियेत येतात अन चमकतात. आपल्याला मुंबई शहर इतके जवळचे असूनही आजपर्यंत आपला सेवीन तुस्कानो सोडला तर कुणीही करिअर दृष्टीने ह्या फिल्मी दुनियेचा विचार केला नाही. ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईत येऊन नाव कमावलेले अनेक मराठी कलाकार मुंबईत आहेत पण आपले बबन गुरुजी अन अब्राहम अंकल सारखे दर्जेदार कलाकार ह्या हाकेच्या अंतरावर असलेल्या दुनियेपासून दूरच राहिले, हि एक खंत आहे.
ग्राहम गोन्साल्वीस सारख्या उमद्या कलाकारला पाहून त्याच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो, पण त्याच बरोबर ह्या फिल्मी दुनियेत त्याने पदार्पण करून नावारूपाला यावं अस मनोमन वाटते. अंनसन तुस्कानो सारखा अजून एक तरुण प्रतिभावान संगीतकार आपल्यामध्ये आहे, ह्याची जाणीव खूप कमी लोकांना आहे. उपजत कलागुण असूनही नोकरी न करता ह्या मायावी सृष्टीत संघर्ष करून करिअर करण्याची मानसिकता आपल्या समाजात नाही हे वास्तव फार मोठे आहे परंतु अशा तरुणांना शक्य तेवढी मदत करून त्यांना प्रोत्साहन देणे आपली सामाजिक गरज आहे. चित्रपट व जाहिरात क्षेत्राशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित असलेल्या आपल्या वसईतील लोकांनी चांगले नेटवर्किंग करून एकमेकांना संधी उपलब्ध करून दिल्यास आपल्या गावतील चेहरा नक्कीच चित्रपट सृष्टीत पाहायला मिळेल ह्याची मला खात्री वाटते. ह्या क्षेत्रात आवड असणार्या व करिअरसाठी धडपड करणाऱ्या सर्व तरुण मंडळीना शुभेच्छा !!
सचिन मेंडीस
एक उभरता संगीतकार !!
एक उभरता संगीतकार !!
Anson A. Tuscano हा आपल्यामधील तरुण गायक अन संगीतकार. काही महिन्यागोदर माझी त्याच्याशी ओळख झाली. संगीताविषयी असलेली त्याची जाण अन आवड मला खूपच भावली. सहजच मी लिहलेली 'छेडतात तारा मनाच्या' ही कविता त्याच्याकडे संगीतबद्ध करायला दिली तर ह्या पठ्ठ्याने सुंदर चाल देऊन स्वतच्या आवाजात एक अप्रतिम गीत तयार केले. मी लिहिलेल्या कवितेवर इतके सुंदर गीत बनू शकते ह्यावर माझा विश्वासच बसला नाही. ह्या तरुणाचे भविष्य उज्ज्वल आहे ह्यात शंका नाही. आपण हे गीत ऐका अन आम्हाला प्रतिक्रिया कळवा.
(ह्या गीताचे सर्व हक्क Anson A. Tuscano ह्याकडे आहेत)
https://www.youtube.com/watch?v=EKtWEPmAXvU&feature=youtu.be
उठा अन उभे राहा, नवीन स्पर्धा जिंकण्यासाठी !!
आयुष्य हि एक स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेत प्रत्येकाला यशस्वी व्हावेसे वाटते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला संघर्ष करावा लागतो. काही वेळेला ठरवलेले उद्दिष्ट समोर असूनही काही गोष्टी चुकतात अन पदरी अपयश येते. मन निराश होते, एकटेपणा वाटतो, हरल्याची-मागे पडल्याची भावना निर्माण होते. आपल्याबरोबर जे होते ते आपल्या पुढे गेले हे पाहून नैराश्य येते, उगाचच आपण दुसऱ्याशी तुलना करीत आपले प्रयत्न सोडून देतो. प्रसंगी टोकाचा निर्णय घेतो. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते, त्याला कुणी अपवाद नाही, फक्त यशाची परिमाणे अने व्याख्या व्यक्तिपरत्वे बदलतात किव्हा वेगवेगळ्या असतात.
काही वेळेला आपण अपयशातून उठण्याचा प्रयत्न करतो, जवळच्या माणसाचा आधार मागतो. काही वेळेला जवळचे उठायला मदत करतात तर काही वेळेला आपण पडल्याचाच आनंद आपल्याच लोकांना होतो. अपयश हि यशाची पहिली पायरी समजली जाते. यशाचा मार्ग अपयशातून जातो फक्त पुन्हा उठून यशाच्या प्राप्तीसाठी धावण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे. आज आपल्या समोर उभे असलेले अनेक यशस्वी व्यक्ती ह्या अनुभवातून गेलेले आहेत. त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत म्हणून ते यशस्वी झाले. आपण ही पराभवावर मात करून यशस्वी होऊ शकतो, फक्त जिद्द अन चिकाटी हवी.
काल सकाळी माझा ट्रेन मधील मित्र जोएल डाबरे ह्याने मला हा प्रेरणादायी विडीओ दाखवला अन क्षणभर डोळ्यात पाणी उभे राहिले. शरीर साथ न देताही धाव पूर्ण करण्याच्या दुर्दम्य शक्तीने धावणारा धावपटू जितका प्रेरणादायी आहे तितकाच त्याच्या पाठीवर मायेचा हाथ ठेवणारा अन त्याला धावायला मदत देणारा 'तो' मनुष्य ही तितकाच मार्गदर्शक आहे. आपण जर अपयशाचा सामना करीत असाल तर त्या धावपटूला नजरेसमोर ठेवा अन जर आपण सुशेगात असाल तर उठून प्रयत्न करणार्यांचे मार्गदर्शक बना. या विडीओ मधील धावपटूला धावायला मदत देणारा 'तो' मनुष्य खूपच महत्वाचा आहे. कळत नकळत आपण अडचणीत असलेल्या व्यक्तीपासून नामनिराळे राहतो, माहित नसल्यासारखे करतो तर प्रसंगी अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या वेदनेतून असुरी आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. हि मानसिकता आपल्या सोडावी लागेल.
आपण जर खाली पडले असाल तर उठा अन उभे राहा, नवीन स्पर्धा जिंकण्यासाठी !! अन जिंकले असाल तर पुढे या, इतरांना जिंकायला मदत करण्यासाठी !!
http://www.youtube.com/watch?v=kZlXWp6vFdE
Subscribe to:
Posts (Atom)