Wednesday, July 16, 2014

फिल्मी दुनियेत करिअर!

सकाळी Facebook ह्या व्यासपीठावर पोस्ट चाळत असताना ग्राहम गोन्साल्वीस ह्या तरुणाची पोस्ट वाचनात आली. पोस्ट सोबत टाकलेला फोटो 'प्रोफेशनल' वाटला अन पोस्टची उत्सुकता वाढली. त्याने स्वतःने लिहिलेला, संगीतबद्ध केलेला अन गायलेल्या गीताचा त्यात उल्लेख होता. या अनोळख्या तरुणाने हौशेखातर काही केलं असेल अस वाटून पुढची पोस्ट वाचण्याचा विचार केला पण एका अनामिक उत्सुकतेने पुन्हा त्याने दिलेली लिंक गाठली अन त्याने निर्मित केलेले 'तेरा दिवाना' हे गीत ऐकले. आश्चर्य म्हणजे इतका प्रतिभा असलेला तरुण इतके दिवस कुठे लपला होता असा मनात विचार आला. दर्जेदार गीतरचना, रोमांटिक संगीत अन त्याला साजेसा प्रेमळ आवाज असा त्रिवेणी मिलाफ ह्या गीतात अनुभवयास मिळाला. मुंबई म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीचे माहेरघर. संपूर्ण भारतातून अनेक तरुण तरुणी नशीब कमवण्यासाठी ह्या मायावी दुनियेत येतात अन चमकतात. आपल्याला मुंबई शहर इतके जवळचे असूनही आजपर्यंत आपला सेवीन तुस्कानो सोडला तर कुणीही करिअर दृष्टीने ह्या फिल्मी दुनियेचा विचार केला नाही. ग्रामीण महाराष्ट्रातून मुंबईत येऊन नाव कमावलेले अनेक मराठी कलाकार मुंबईत आहेत पण आपले बबन गुरुजी अन अब्राहम अंकल सारखे दर्जेदार कलाकार ह्या हाकेच्या अंतरावर असलेल्या दुनियेपासून दूरच राहिले, हि एक खंत आहे. ग्राहम गोन्साल्वीस सारख्या उमद्या कलाकारला पाहून त्याच्या प्रतिभेला सलाम करावासा वाटतो, पण त्याच बरोबर ह्या फिल्मी दुनियेत त्याने पदार्पण करून नावारूपाला यावं अस मनोमन वाटते. अंनसन तुस्कानो सारखा अजून एक तरुण प्रतिभावान संगीतकार आपल्यामध्ये आहे, ह्याची जाणीव खूप कमी लोकांना आहे. उपजत कलागुण असूनही नोकरी न करता ह्या मायावी सृष्टीत संघर्ष करून करिअर करण्याची मानसिकता आपल्या समाजात नाही हे वास्तव फार मोठे आहे परंतु अशा तरुणांना शक्य तेवढी मदत करून त्यांना प्रोत्साहन देणे आपली सामाजिक गरज आहे. चित्रपट व जाहिरात क्षेत्राशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंधित असलेल्या आपल्या वसईतील लोकांनी चांगले नेटवर्किंग करून एकमेकांना संधी उपलब्ध करून दिल्यास आपल्या गावतील चेहरा नक्कीच चित्रपट सृष्टीत पाहायला मिळेल ह्याची मला खात्री वाटते. ह्या क्षेत्रात आवड असणार्या व करिअरसाठी धडपड करणाऱ्या सर्व तरुण मंडळीना शुभेच्छा !! सचिन मेंडीस

No comments: