Wednesday, July 23, 2014

गंध चाफ्याचा !!

गंध चाफ्याचा !! काही माणसे सुगंधित असतात, त्यांच्या सहवासात आठवणीचा चाफा हळूच दरवळतो. अळवाच्या पानावर पाण्याचा थेंब साचून क्षणभर त्याचा मोती व्हावा तसा अशा माणसाच्या सहवासात क्षणाचे शिंपले मोती बनतात. अन जर अशी माणसे बुजर्ग म्हातारी असतील तर त्यांच्या सुरकुती पडलेल्या हाताच्या हळूच स्पर्शाने स्वर्गीय प्रेमाचा आनंद मिळतो. अशाच एका प्रेमळ अन मायाळू आजीला भेटण्याचा योग आला. माझ्या चुलत भावाची मामा कडची बय जिला सर्वजण प्रेमाने 'बाय' म्हणतात. लहानपणी आमच्या घरी यायची तेव्हा आवर्जून काही तरी खाऊ घेऊन यायची. तिने आणलेल्या खाऊपेक्षा तिच्या देण्यालाच जास्त चव होती. बऱ्याच वर्षात तिची भेट झाली न्हवती. आठवणीतल्या वहीत कोणत्या तरी पानात ती गुडूप झाली होती. आजच्या सोशल दुनियेच्या युगात आभासी लोकांना जवळ करणारी आमची पिढी अशा सुगंध देणाऱ्या माणसापासून अलिप्त झाली आहेत, ह्याचे क्षणभर शल्य वाटले. सहजच चुलतभावाशी विषय काढला अन मागच्या रविवारी त्याच्या मामाकडच्या बायला भेटण्याचा बेत ठरला. बाय तशी देखणी, गोरीपान, घारे डोळे. चाफ्यासारखी दिसायची अन चाफ्यासारखी सुगंधी दरवळायची ! मामाकडच्या ओटीवर चढून आतमध्ये डोकावले तर बाय बसलेली होती. हातात पांढऱ्या रंगाची रोजरी घेऊन तिची जपमाळ चालू होती. वयाची ८० पार केल्याने डोळे अन कान साथ देत न्हवते. चाफ्यासारख्या चेहऱ्यावर वार्धक्याच्या खुणा जमा झाल्या होत्या पण डोळ्यातील तेज बदलले न्हवते. चुलतभावाने तिला विचारले 'कोण आले आहे माझ्याबरोबर?. तर तिने डोळे किलकिले करून चेहरा आठवण्याचा प्रयत्न केला. कित्येक वर्ष तिची भेट न झाल्याने ती बहुदा ओळखणार नाही असे वाटले होते, पण तिने मला ओळखले. पण तिला नाव काही आठवत न्हवते. जवळ घेऊन तिने आपुलकीने चौकशी केली. 'तुवा दरी का हाय' असा तिचा प्रश्न म्हणजे मला लेकरे किती असा सरळ सोपा होता. आम्ही मोठे झालो, शिक्षण झाले अन मार्गी लागलो याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटाना सामोरी जाऊन पुन्हा उभी असलेली बाय मनात अजून फुलत गेली. मी तिची आठवण काढून तिला भेटायला आलो ह्याचा तिला हर्ष झाला. 'मी घरी असते पण तुम्ही कामात असता त्यामुळे तुम्हाला वेळ मिळत नाही, त्यामुळे तुमची काय तक्रार करणार ' असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा नकळत हृदयाला काटा टोचला अन शल्य वाटले. वेळ नाही ह्या सबबीखाली सोन्यासारखी माणसे दुरावलेली आमची उच्चशिक्षित पिढी, काय कामाची. तिचा निरोप घेत असताना पुन्हा तिच्या सुरकुतलेल्या हाताचा दैवी स्पर्श झाला अन २५ वर्षापूर्वी तिने हातात दिलेल्या गाठ्याच्या पुडीचा वास क्षणभर आठवणीच्या कप्प्यातून बाहेर आला. अंगणात पायात चपला चढवत असताना ओटीपर्यंत सोडायला आलेली बाय मनात पुन्हा पुन्हा साचत गेली. हातात रोजरी घेऊन इतरांसाठी प्रार्थना करणाऱ्या आपल्या ह्या वात्सल्यमुर्ती आपल्याला मिळालेल्या ईश्वरी देणग्या आहेत. आपल्या आसपास असे चाफे असतील तर जरून त्यांच्या भेटीला जा. तेही फुलतात अन आपल्यालाही फुलवतात. जीवन सुगंधित करण्यासाठी अन क्षणाला मोती बनवण्यासाठी त्याची भेट अन संवाद जरुरी आहे !!

No comments: