Saturday, November 24, 2012

जुने घर



फेसबुक वरील जुन्या घराचा हा फोटो बघुन माझे मन क्षणभर माझ्या बालपणीच्या काळात हरवून गेले. प्रशस्त असे आमचे जुने घर (बोळींज-जापके) साधारणपणे स्वातंत्र्यापूर्वी (१९४५) बांधण्यात आले होते. घराच्या पायाला असलेले मजबूत चौकोनी दगड, त्याचा दगडापासून बनवलेल्या लांब ६-७ पायरया, जमिनीपासून साधारण ४-५ फूट उंच असलेला ओटा, ओटीवर एक उखळ व त्याच्या शेजारी एक सपाट दगड, संपूर्ण सागाच्या लाकडापासून उभारण्यात आलेला नक्षीदार मुख्य दरवाजा, दरवाजाला असलेले पितळी चणीच्या आकाराचे खिळे , ओट्याच्या मध्यभागी साधारण १० फूट लांब बसण्याचा बाक, त्याच्या दोन्ही कडेला घोड्यासारखे दिसणारे दोन भाग, बाकावर लिहिलेले 'देगु चिमा मेन' हि अक्षरे, ओट्याच्या डावीला असलेला ५x ४ चा मोठा हिंदोळा, त्याच्या पोलादी सळ्या.... सगळ कस जसच्या तसं डोळयासमोर उभं राहिलं....

पावसाळ्यात शाळेतून घरी परत येत असताना घोसाळी गावातून झाडाखालून उचललेली बदामे घरी आणून ओट्यावरच्या दरवाजाच्या फटी मध्ये फोडायचो. त्या बियामधुन भुगा झालेले बदामा चे तुकडे खाण्यात येणारी मजा आजच्या 'सुक्यामेव्यात' नाही, हे निश्चित.... दरवाजा ओलांडून घरात प्रवेश केल्यानंतर २० फुटावर एक लाकडी जिना होता, त्यावरून माडीवर जाता येत असे. माडीवर प्रचंड अंधार असायचा. इथे चिंच भरलेल्या मुजी अन भात साठवायचे 'कलांगे' होते. घराच्या मागच्या बाजूला गुरांना बांधायचा गोठा होता. कधी गाय, कधी म्हैस असले काहीतरी दुभते जनावर आणि त्याचे एखादे वासरु, रेडकू तेथे बांधलेले असे. घरामागे गोठया शेजारी चुली होत्या, अंघोळीचे पाणी ह्या चुलीवर तापवले जाई. घराच्या पाठीमागे आंब्या-चिंचेची खूप झाडे होती त्यातून मिळणारे आंबे-चिंच अख्खा वर्षभर पुरत असत.

जुन घर मोडून so called ‘नवीन’ घरात आलो अस कितीही म्हटल तरी गुणात्मक पातळीवर जुन्या घराचे वैभव मार्बल-ग्रेनाईटच्या बंगल्याला येणार नाही ह्या मताशी तुम्हीही सहमत असाल. ओटीवर असलेल्या त्या उंच आणि मजबूत 'मेडी' तेव्हाच्या विशाल मनाच्या अन संघर्षातून आजची पिढी उभारणार्या आपल्या पूर्वजाच्या जणू साक्षीदारच...! जवळजवळ २० वर्षे (१९७९-१९९८) जुन्या घरात राहण्याचे मला भाग्य मिळाले. चुलीच्या जागेवर स्टोव्ह नंतर शेगडी, शेणापासून सारवलेली(?) जमीन ते कोबा, चुलीतली राखेडी ते कोलगेट, सुकं जेवण ते बिर्याणी असा प्रवास आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ह्याच घरात अनुभवयास मिळाला. जुन्या घरात जसे जेवलो, तसे पुढे आयुष्यात कुठेच मिळाले नाही. उन्हाळाच्या दिवसात अंगणात खाटेवर झोपण्याची मज्जा तर अवर्णनीय...

जुन्या घरातून बाहेर पडून माझ्या चारही काकांनी वेगवेगळे बंगले बांधले, सगळ्यात शेवटी आम्ही १९९८ ला जुन्या घरातून बाहेर पडलो अन नवीत घरात आलो. अशे आमचे जुने घर २००४ साली तोडण्यात आले. जुन्या घराचे सागाचे लाकूड आम्ही नवीन घरात फर्निचर साठी वापरले. नवल म्हणजे फर्निचर बनवणार्या सुतारांनी आयुष्यात असे सुंदर अन रंधा मारण्यास अवघड लाकूड फारच कमी पहावयास मिळाल्याचे सांगितले तेव्हा आपले पूर्वज मालाच्या दर्जा बाबतीत किती चोखंदळ होते, हे कळून चुकले.

आज जुने घर अस्तित्वात नसले तरी आमच्या जुन्या घरचा ओटा आणि पायऱ्या शिल्लक आहेत. आमच्या गावातल्या लग्नात बऱ्याच वेळेला हा ओटा रेडीमेड स्टेज म्हणून कामाला येतो. अशे जुने वैभव पाहिल्यावर आपण काय सोडून कशाच्या मागे लागलो आहोत असा प्रश्न पडतो. प्रश्नावर चिंतन केल्यास ग्लोबल जीवनाच्या भौतिक गरजावर उत्तर सापडू शकेल अस वाटते.

No comments: