Thursday, August 21, 2014

वेदना !

वेदना ! हे मी तुला का सांगतोय हे मला माहित नाही, बहुतेक तू माझ्या मुलाच्या वयाचा असावा म्हणून असावं. माझ्या निवृत्तीला आता ७-८ वर्षे झाली. चौकोनी कुटुंब, एक मुलगा अन एक मुलगी. मी नोकरी सांभाळली तर ह्यांच्या मम्मीने संसार अन ह्यांच्याकडे लक्ष दिलं. मुलांना कुठे कमी पडून दिलं नाही. मुलगी लग्न करून सासरी गेल्याला १० वर्षे झाली तर मुलगा सध्या अमेरिकेला असतो. मुलगी वरचेवर घरी येते, पण तिची नोकरी, मुले अन संसार हे सर्व करता तिची धावपळ होते, अन आता तर आल्या आल्या निघायची घाई करते. तिचा दोष काय करायचा, कुठे कुठे लक्ष देईल ती. मुलांनी शिकावं, मोठे व्हावं असे मनोमन वाटत होते, त्यात मुलगा हुशार म्हणून उच्चशिक्षण दिलं अन शिक्षण करून जो तो अमेरिकेला गेला तो अजून तिथेच रमलाय. पूर्वी म्हणायचा कि ३-४ वर्षे राहून मग परत येतो, मग लग्न करावं म्हणून पुन्हा विचार बदलला, नंतर सुनेने अमेरिका अनुभवावी म्हणून पुढे परतणे लांबले अन आता मुलगी झाल्यावर तिला इथलं वातावरण कसं झेपेल अशी चिंता त्याला लागली आहे. एकुलता एक मुलगा आमचा. रोज फोन करतो, बोलण होत, पण डोळ्यासमोर नाही ह्याची खंत वाटते. एवढ्या मोठ्या घरात आम्ही दोघे, घर खायला उठते. का कुणास ठाऊक एक प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे ह्या घरात. ह्याची मम्मी वरचेवर आजारी असते. रात्री अपरात्री उठते अन ह्याच्या आठवणीने ढसाढसा रडते. तिला समजावण्याचा प्रयत्न करतो पण आईचं मन तिचं, मला इतका शोक होतो तर त्या बिचारीचा काय दोष करू. महिन्याला इथे बँकेत डॉलर जमा होतात पण मुलाच्या स्पर्शाच्या उबेपुढे त्या डॉलरची उब काय कामाची. कधी गरज पडली तर शेजारच्या मुलाला बोलवायला लागते, कुणी नाही म्हणत नाही मदतीला, पण एकुलता एक मुलगा परदेशी ऐश्वर्यात असताना कुणाला मदतीला बोलवायला कसेतरीच वाटते. अजून किती वर्षे आम्ही जगणार माहित नाही, मनात विचार येतो उरलेल्या आयुष्यात मुला अन नातीसोबत भरलेल्या घरात राहायला मिळेल की नाही. हिने तर आता वेगळच खूळ घेतलाय डोक्यात, म्हणे उद्या परवा माझं काय झाल तर तोंड पाहायला तरी हा पोहचेल का? कधी कधी शांतपणे विचार गेला तर वाटते थोडा कमी शिकला असता तर जवळ राहिला असता, कमी चैन केली असती पण घर फुललं असतं. हिच प्रेशर, माझा डायबेटीस अन हि औषधे, का कुणास ठाऊक हा जवळ असता तर वाट्याला आली नसती. तुमच्या सारखी तरुण मंडळी समोर येता तेव्हा तो डोळ्यासमोर उभा राहतो. कसं समजावू त्याला हा जन्म एकदाचं आहे, हे पप्पा-मम्मी एकदाचं येणार आहेत वाट्याला. एकदा गेले कि पुन्हा नाही येणार परत. मग कितीही डॉलर मोजले तर न आम्ही परतणार न उडून गेलेले क्षण. आयष्य म्हणजे पैसा, प्रमोशन, चैनीच जीवन अस थोडेच असते, जिथे नात्याचा ओलावा नाही, आपल माणूस जवळ नसल्याने डोळ्यात पाणी नाही, अशा जिण्याला काय आयुष्य म्हणायचं? मी हताश झालोय पण आशावादी आहे, तो येईल कायमचा परत आमच्याकडे. पुन्हा घर भरेल, बहरेल. त्याची आई शांतपणे झोपेल. त्याने यायलाच पाहिजे आता, त्याची आई अन मी कायमचे झोपी जाण्या अगोदर. सचिन मेंडीस

No comments: