Thursday, August 21, 2014

'सुशिक्षित' अन 'सुसंस्कृत'

जोगेश्वरीवरून अंधेरी डाऊन गेल्याने आज छानपैकी सीट मिळाली. गाडी अंधेरी पोहचताच क्षणात उड्या मारून प्रवाशी आत शिरले अन डबा प्रवाशांनी फुलून गेला. माझ्या समोर साधारण २८-३० वर्षाचा एक तरुण येऊन उभा राहिला. अंगात लुई फिलिपचा शर्ट, खिशाला महागडा माउंट ब्लांक पेन, एका हातात आय-फोन अन शरीराला उंची सुगंधी अत्तर असा एकूण हेवा वाटावा असा त्याचा पेहराव होता. गाडी सुरु झाल्यावर त्याने खिशातील हल्दीराम भूजीयाचे पाकीट बाहेर काढले अन काही वेळात त्याचा निकाल लावला. पाकीट रिते झाल्यावर त्याने थोडा पुढे येऊन ते पाकीट मोठ्या रुबाबाने खिडकीतून बाहेर फेकले. मी अवाक होऊन त्याच्या कडे पाहत राहिलो. त्याने केलेल्या 'त्या' कृतीने एकूणच त्याच्या अंगातील लुई फिलिपचा शर्ट, खिशातील माउंट ब्लांक पेन, हातातील आय-फोन अन शरीराला येणारा उंची सुगंधी ह्या सर्व श्रेष्ठ वस्तूंचा अक्षरशा: 'कचरा' करून टाकला होता. ज्या व्यक्तीचा काही क्षणापूर्वी हेवा वाटत होता, तो आता मला 'खुजा' जाणवू लागला होता. त्याच्या एका कृतीने 'सुशिक्षित' अन 'सुसंस्कृत' ह्या मधील फरक अधोरेखित केला होता. धन्य तो सुशिक्षित नव्या पिढीचा चेहरा !! सचिन मेंडीस

No comments: