Thursday, August 21, 2014

हे कुठे तरी बदलायला हवे !

परवा ट्रेन मध्ये उभा असताना डोक्यावरील पंखा अन लाईट बंद आढळले अन मित्राच्या वडिलांची आठवण झाली. ते रेल्वेत कामाला होते अन आता रिटायर्ड झाले होते. ते सकाळी ६ वाजता घरून कामावर निघायचे, जाताना वाडीतील भाजीपाला अन केळीची फुले घेऊन जायचे अन ११ वाजेपर्यंत घरी परतायचे. ते 'पासवाले' असतील अन दादरला माल विकायला जात असतील असा माझा तेव्हा गोड गैरसमज होता. जेव्हा ते सेवानिवृत्त झाले अन मित्राने मला सेवानिवृत्तीच्या निमित्ताने जेव्हा कार्यक्रम अन प्रीतीभोजनासाठी आमंत्रित केले तेव्हा त्याचे वडील रेल्वेत नोकरीला असल्याचे कळले. गेली चाळीस वर्षे ते भाजीपाला घेऊन जात असतं अन तो विकून झाल्यावर रेल्वे यार्ड मध्ये जाऊन सहीचा सोपस्कार पूर्ण करीत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला भेट दिल्यावर उगाचं तो 'सेवा' शब्द डोळ्याला अन मनाला खुपत होता. सेवानिवृत्तीच्या भाषणात त्यांच्या सेवेविषयी पाहुणे सुंदर फुले उधळत असताना मला का कुणास ठाऊक डब्यातील बंद असलेले पंखे अन डोळे मिटलेल्या ट्यूब लाईट डोळ्यासमोर येत होत्या. वाडीतील भाजीपाला तोडून तो मुंबईला नेण्याचे श्रम घेणारे असे व्यक्तिमत्व रेलेवेच्या सेवेबाबत असे कामचुकार का असा मनाला प्रश्न पडायचा. कधी कधी चांगली कामसू माणसेही सरकारी सेवेत 'दांड्या मारण्याच्या' 'पाट्या टाकण्याच्या' किव्हा 'लवकर पळण्याच्या' संस्कृतीत कसे रुळून जातात हे पाहून वैषम्य वाटले अन मग हीच संस्कृती त्यांच्या अंगवळणी पडून त्यांच्या जगण्याचा भाग बनून जाते असे जाणवले. काही वर्षापूर्वी एक दूरच्या नातेवाईकाला भेटण्याचा योग आला होता. केंद्र सरकारच्या कोत्यातरी खात्यात तांत्रिक विभागात तो 'चिकटला' होता. सहज बोलताना तो दिनक्रमाविषयी मोठ्या अभिमानाने बोलत होता. सकाळी गेल्यावर तासभर नाष्टा करणे मग २-३ तास काम, नंतर जेवण मग तासभर डुलकी अन मग घरी परतीचा प्रवास असा राजेशाही दिवस. पुन्हा घरी आल्यावर थोडा आराम अन मग गावात कुणाच्यातरी ओटीवर पत्ते कुटणे. २७-२८ वर्षे वय असलेल्या त्या तरुणाचे त्या उमेदीच्या काळातील जगणे पाहून पहिल्यांदा कीव अन नंतर चिंता वाटली. ज्या काळात ह्या तरुणाने मेहनत करावी, आपल्या कामातून कौशल्य शिकून पदोन्नती घ्यावी, त्या वयात ह्याने असा आळसपणा करावा हे जरा अतीच होते. श्रम न करता घरी येणारा पगार, अर्धा दिवस घरी असल्याने नकळत लागलेली व्यसने अन काम करण्याची इच्छा मरून गेल्याने शरीरात साचून गेलेला स्थूलपणा मला त्या तरुणाच्या बाबतीत चिंताजनक वाटला. दुर्दैवाने करिअर करण्याच्या थ्रिल पेक्षा घरी लवकर पळण्याचे थ्रिल त्याला जास्त ''किक' देत असावे, असो. सातासमुद्रा पार आपल्या ज्ञानाचा अन कौशल्याचा झेंडा रोवणारा आपला समाज अन त्याचं समाजात जगणारी अशी व्यक्तिमत्वे उगाचं मनाला सलत राहतात. ज्या समजातून अनेक लोक सरकारी सेवेत राहून सन्मानाने निवृत्त झाली, आपल्या कामाचा ठसा त्यांनी शासन दरबारी उमटवून दाखवला, सेवाकार्यात अनेक प्रशस्तीपत्रके मिळवून आपल्या समाजाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला, त्याचं समाजात असा प्रवृत्ती आनंदाने मिरवाव्या, ही थोडी शोकांतिका वाटली. हे कुठे तरी बदलायला हवे असे मनोमनी वाटते. रेलेवे, मुंबई महापालिका येथे चांगले काम करणाऱ्या आपल्या मंडळीचा हे आदर्श घेतील का? निदान तरुण पिढीने तरी !! सचिन मेंडीस

No comments: