'आडसळ' हा शब्द ऐकला तरी पटकन हसू येते. हा शब्द खूप विनोदी वाटत असला तरी मला त्या विषयी एक सुप्त आकर्षण अन मनापासून सहानभूती आहे. 'आडसळ' हे विशेषण आपल्या बोली भाषेत नारळाच्या संबंधात वापरले जाते. नारळाच्या उपयुक्ततेनुसार शहाळाचे पाणी देणारी अवस्था तर पूर्ण वाढ झाल्यावर मिळणारे खोबरे हि अवस्था उपयोगाची समजली जाते. ह्या दोन्ही अवस्थेच्या मध्ये अर्धवट असलेला बिनकामाचा नारळ म्हणजे 'आडसळ'. शहाळाचे पाणी प्यायला नारळ फोडावा अन तो 'आडसळ' निघावा असा अनुभव ज्याला येतो त्याचे दुक्ख: त्यालाच माहित.
नारळाला दिलेले हे विशेषण मग आपण माणसाला का वापरतो?. अमुक अमुक व्यक्ती 'आडसळ' आहे, अस आपण सहज बोलून जातो मग त्या मागचे तर्कशास्त्र कोणते? ती व्यक्ती अर्धवट? त्याच विशिष्ट परिस्थितीत त्याच वागण बिनकामाच? 'तो ना साफसूफ 'आडसळ' नाळ हाय' असा कादोडी भाषेत शेरा ऐकताना त्या 'आडसळ' व्यक्तीच कोणत चित्र पुढे येत?. चला कुठून तरी माझ्या कानी पडलेली दोन उदाहरणे बघू.
एका चर्चमध्ये धर्मगुरूला लग्नाच्या मिस्साला मिस्सा संपायच्या अगोदर वाजणाऱ्या फटाक्याचा खूप त्रास व्हायचा, जे रास्त होत. एके दिवशी त्या धर्मगुरूने लग्नाचा मिस्सा संपायच्या अगोदर एक गुगली टाकली. त्यांनी म्हटले, 'आता बघा, काही तरुण बाहेर मिस्सा चालू असताना फटाके फोडतील अन मिस्साचे पावित्र्य भंग करतील. अन हे कोण करतील माहित आहे का?, जे 'आडसळ' असतील तेच करतील'. झाले, धर्मगुरूचा नेम बरोबर लागला होता, फटाके फोडण्याच्या तयारीत असलेल्या त्या मुलांना आपण 'आडसळ' नसल्याच सिद्ध करण्यासाठी फटाके न वाजवणे भाग होते अन तेच धर्मगुरूला हवं होत. त्या दिवशी फटाके वाजले नाहीत. मन विचार करू लागले, कोण असतात हि मुले? उत्साही, सांगकाम्या टाइपची, नवरा घरून निघून लग्नलावेपर्यंत फटाक्याची तिजोरी हातात घेऊन फिरणारी. हीच ती मुले आनंदाने निरागसपणे फटाके फोडणारी अन दुसर्याकडून स्वता:ला 'आडसळ' म्हणवून घेणारी.
दुसर उदाहरण पाहू, सोयरिक होऊन जावईबापू पहिल्यांदाच सासुरवाडीला गेले होते. पाहुणचार म्हणून अंड्याचे चार तुकडे, पाव किलो तळलेले कोंबडीचे पीस, अन पाव किलो मिठाई जावईबापूच्या पुढे ठेवली होती. तसे जावईबापू खाण्याच्या बाबतीत त्यांच्या गावात कुप्रसिद्ध होते पण सासुरवाडीपर्यंत हा लौकिक पोहोचला न्हवता अन त्यात मध्यस्थाला दोष देणे हि अति झाले असते. जावईबापूला २४ तास भूक लागलेली, तशी भूक हि माणसाची मुलभूत प्रेरणा आहे पण स्थळ-काल वेळ पाहून भुकेचे नियमन करणे खूप गरजेच असते. तर झाले असे कि जावईबापूने प्लेटला जो हात घातला तो शेवटी प्लेट शून्य होईस्तोवर काढला नाही. सासूबाई जावईबापूला 'प्लेटला हात लावा' बोलायला उभी होती पण दुर्दैवाने तिला ती संधी मिळाली नाही. दुसऱ्या बाजूला हातात टॉवेल घेऊन उभी असलेली त्याची वाग्दत वधु आपल्या भावी पतीचे कुंभकरणीय रूप बघून अचंबित झाली होती. एवढा नाश्ता केल्यावर जावईबापू कमी जेवतील असा सासरेबुवाने केलेला भोळा अंदाज नंतर जावईबापूने चुकीचा ठरवला होता. जे व्हायचे होते तेच झाले, जावईबापू निघून गेल्यावर मुलीने हंबरडा फोडला, 'मला त्या 'आडसळ' मुला बरोबर सोइरिक ठेवायची नाही', असे निक्षून सांगून 'वन डे' सामन्याचा निकाल लावला. भुकेचे नियमन करणे कठीण केल्याने जावईबापूने सामना सुरु होण्यापूर्वीच विकेट गमावली होती अन 'आडसळ' असल्याचे परमवीरचक्र मिळवले होते.
दोन्ही उदाहरांतील व्यक्ती 'आडसळ' म्हणून गणली गेलेली असली तरी त्यांच्या व्यक्तीत्वामध्ये एक निरागसपणा होता. दुसर्यांच्या लग्नात फटाक्यांची हमाली करणारा व काळ-वेळ न पाहता आपल्या भुकेचे नियमन न करणारा, ह्या दोन्ही व्यक्ती म्हणजे तसे निष्पाप जीव. आजच्या ढोंगी गर्दीत मुखवटे घालुन फिरणाऱ्या लोकांत त्यांचा थोडाच निभाव लागणार होता. आजचा जमाना पोटात एक अन ओठात दुसरे असा जगण्याचा बनला आहे त्यामुळेच मुखवटे न घालू शकणारे बहुतेक समाजाच्या दृष्टीने 'आडसळ' ठरत असावेत किव्हा कोणत्या प्रसंगी कसे वागावे ह्याची जाणीव न ठेवता स्वतचे हसे करून घेणारे 'आडसळ' ह्या व्याखेत बसत असावेत. आपल्याला कधी कुणाला 'आडसळ' म्हणावे वाटले होते काय? आपल्या दृष्टीने 'आडसळ' कोण?.
(टीप: 'आडसळ' हा शब्द कुठून अन कसा आला ह्याचा कुतूहलापोटी मी शोध घेतला अन माहिती मिळाली कि 'ज्यातून पाण्याने भरलेले शहाळे निघेल असा अख्खा न सोललेला नारळ म्हणजे 'अडसर वा 'आडसर', ज्याचा आपल्या बोली भाषेत 'आडसळ' असा अपभ्रंश झाला व पुढे ह्या शब्दाचा मजेशीरपणे एखाद्या व्यक्तीला चिडवण्यासाठी वापर होत गेला.)
© सचिन मेंडीस
.