Tuesday, June 10, 2014

'ते' हरले 'आपण' जिंकलो !!



लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस. एकाच गावातले दोन धडाडीचे तरुण मतदान केंद्राच्या बाहेरील दोन वेगवेगळ्या गटाच्या बूथवर बसले होते. एकाच्या नातेवाईकाचे व्यावसायिक हितसंबंध 'विरार'कडे असल्याने त्याने अंगात पिवळा टि-शर्ट परिधान करून तो शिटीसेनेत काम करीत होता. तर दुसरा तरुण काहीही करून 'शिटी' पाडायची असा निश्चय करून ह्यावेळेला भाजपचे 'कमळ' फुलवण्यासाठी मोदीमय झाला होता.

जसजसी मतदान केंद्रावर गावातील मतदाराची पाऊले सरकत होती तसतशी ह्या दोन तरुणांच्या नजरेमधील खुन्नस वाढत होती. कसाही करून आपलाच उमेदवार जिंकणार अशा अविर्भावात दोघे बूथवर फिरत होते. एकाच गावातील असूनही त्यांचे पाठीराखे तरुण सम प्रमाणात त्या दिवसापुरता का होईना 'भगवे' अन 'पिवळे' असे वाटले गेले होते. कुणी वयस्कर मतदार बूथच्या जवळ येताना दिसला कि दोघेही त्यांच्या कडे धाव घ्यायचे अन त्यांना आपल्या उमेदवाराला मत द्यायला विनंती करायचे. 'दादे, आपला मत शिटीला दयासा हा, वरणे ६ वा बटन', पहिल्याचा विनंतीचा सूर.तर दुसरा 'दादे, आपले दुकाने फोडले ता कहा भाहयासा, ह्यावेळेला कमळ दादे'. पुन्हा एकदा एकमेकावर नजरानजर अन खुन्नस. दोनी बाजूने आवाज अन एकेमेकांचा उद्धार.

दुपार जवळ आली होती तसं तशी गर्दी कमी होत गेली. तरुण पोरांचे पोटे भुकेले होती. शिटीच्या बूथवरील तरुणाने पटकन गरमागरम वडे अन पेप्सी मागवली. ते पाहून दुसर्या बूथवरील कमळवाल्या तरुणाने समोसा अन कोकाकोला मागवून घेतले. शीतपेय पोटात जात असताना एक वेगळेच शीतयुद्ध दोन गटात सुरु झाले होते. एकाच गावातील एकत्र खेळणारी तरुण मुले त्या दिवशी वाटली गेली होती. कमळ वाला तरुण आपल्या स्मार्ट फोनवरून फेसबुक वर आपल्या गावच्या ग्रुपवर आपल्या बूथवरील गर्दीचे फोटो अपलोड करीत होता तर शिटी वाला तरुण गावातल्या वॉटअप्प्स ग्रुपवर पिवळी गर्दी शेर करीत होता. पुन्हा एकदा एकमेकावर नजरानजर अन खुन्नस.

पूर्ण दिवसभर दोन्ही बाजूने आवाज अन एकेमेकांचा उद्धार. एकदा सायंकाळ झाली अन शिटी अन कमळ चे बूथ थंड झाले अन एकाच गावातले दोन पक्षीय गट घराकडे निघाले. बूथवरील आवरा आवर करून ते दोघेही धडाडीचे कार्यकर्ते आपल्या गाड्या घेऊन गावाच्या दिशेने निघाले. जाताजाता दोघात शाब्दिक बाचाबाची सुरु होती. '१६ मे ला बळीराम ची 'शिटी' पडणार असा टोमणा कमळ वाल्याने दुसर्याला मारला तर दुसर्याने '१६ मे ला 'कमळ' बुडून चिंतामण 'चिंतामग्न' होणार असा प्रतिटोला लगावला. पुन्हा एकदा एकमेकावर नजरानजर अन खुन्नस. एका गावातले शालेय सवंगडी दोन पक्षात वाटले गेले होते. एका निवडणुकीने दोघात एक भिंत उभी राहिली होती.

दोघांच्या गाड्या गावात आत शिरल्या अन थोडे पुढे जाणार तोच समोरच्या घरच्या ओटीवर एका बाईचा किंचाळण्याचा आवाज आला. झोपाळ्यावर खेळणारे तिचे ६ वर्षाचे लेकरू तोल जाऊन रस्त्यावर पडलेले दोघांना दिसून आले. दोघांच्या गाड्या जागच्या जागी थांबल्या. एकाने धावत जाऊन त्या मुलाला उचलून घेतले तर दुसर्याने ताबडतोब जाऊन बर्फ आणले व मुलाच्या डोक्यावर धरले. त्या मुलाच्या डोक्यातून रक्त वाहत होते अन त्याला तत्काळ हॉस्पिटलला नेणे गरजेचे होते. 'शिटी' वाल्याने त्याची गाडी सुरु केली अन 'कमळ' वाल्याने तत्काळ त्या मुलाला खांद्यावर घेतले अन तो शिटी च्या पाठीशी गाडीवर बसला अन गाडी वेगाने हॉस्पिटल कडे निघाली. दोघात उभी राहिलेली भिंत आता पडली होती. 'भगव्यात' 'पिवळा' रंग विरघळून दोघानाही खराखुरा 'कुपारी' रंग चढला होता. त्या मुलाला वेळीच उपचार मिळाल्याने गंभीर प्रसंग टळला होता.

हॉस्पिटल मध्ये बाहेर उभे असताना एकाने जाऊन मस्त कोकच्या थंडगार बाटल्या आणल्या अन एक बाटली दुसऱ्याच्या हातात दिली. दोघांनी एकेमेकांना चिअर्स करून बाटली तोंडाला लावली अन एकत्र फोटो घेऊन फेसबुकवर गावच्या ग्रुपवर अपलोड केले. फेसबुक वर पोस्ट केलेल्या फोटोवर एकामागून एक कमेंट येत होत्या अन सर्वांचा सूर होता ' We are one ' . आता १६ मे पर्यंत निकालाची वाट पाहण्याची गरज न्हवती, मतदानाच्या दिवशीच निवडणुकीचा निकाल लागला होता. दोन्ही राजकीय पक्ष हरले होते अन 'कुपारी गावकरी' बिनविरोध निवडून आले होते.

सचिन मेंडीस

No comments: