Tuesday, June 10, 2014

Palghar loksabha


Sachin Mendes 7:07pm Apr 16
पालघर लोकसभा निवडणूक: आपले मत कुणाला?

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्या पासून ही निवडणूक देशपातळीवर चर्चेची तितकीच उत्सुकतेची झालेली आहे. ह्या मध्ये देशभर झालेले घोटाळे, लोकांची वाढलेली साक्षरता हे घटक जेवढे कारणीभूत आहेत तितकीच प्रसिद्धी माध्यमामुळे विशेष करून सोशल मीडियामुळे निवडणूक घराघरात पोहचली आहे. आपल्या समाजाचा विचार करता स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत अन पंचायत समितीच्या निवडणुकीपासून दूर राहणारा आपला युवावर्ग मोठ्या जोशामध्ये निवडणुकीच्या चर्चेमध्ये सहभागी होताना दिसत आहे. आपल्या युवा वर्गाला राजकारणाविषयी उत्सुकता निर्माण करण्यामध्ये जितका सोशल मीडियाचा वाटा आहे त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त अलीकडच्या काळात आपल्या हक्कासाठी आंदोलने करणाऱ्या अन विधानसभा निवडणुकीत वसईत ऐतिहासिक राजकीय परिवर्तन घडवून आणणाऱ्या स्वाभिमानी तरुणाईची भूमिका आहे. कुणी कितीही नाकारले तरी समाजाच्या हक्कासाठी राजकीय चळवळीत भाग घेऊन व्यवस्था परिवर्तन करण्याचे किंबहुना सत्तेतील शुक्रचार्यावर अंकुश ठेवण्याचे व तरुण पिढीच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ करण्याचे कार्य स्वाभिमानी तरुणांनी नक्कीच केले आहे.

काही दिवसा अगोदर पालघर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी कॉंग्रेस, भाजपा अन बहुजन विकास आघाडी अशा तीन मोठ्या राजकीय पक्षामध्ये खरी चुरस होती. राज्यमंत्री राजेंद्र गावित ह्यांच्यासारख्या चांगल्या प्रतिमेच्या तरुण मंत्र्याला कॉंग्रेसने बहुजन विकास आघाडीविरोधात उमेदवारी दिल्याने वसईतील ख्रिस्ती लोकांत एक चांगला संदेश गेला होता. मागील काही वर्षात सरकारी पातळीवर विविध कामासाठी त्यांनी आपल्या समाजाला वेळोवेळी मदत केल्याने व महापालिकेतून गावे वगळण्यासाठी सरकार दरबारी आपल्याला पूरक अशी भूमिका घेतल्याने स्वाभिमानी वसईकर संघटनेने सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन राजेंद्र गावित ह्यांना व कॉंग्रेस पक्षाला पाठींबा दिला होता परंतु राजकारण हे अनपेक्षित असते ह्याचा प्रत्यय आपल्याला कॉंग्रेस पक्षाने आपला उमेदवार माघारी घेऊन व बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा देऊन दाखवून दिला.
जिथे साक्षात मुख्यमंत्र्यांच्या पसंतीला केराची टोपली दाखऊन त्यांची व राज्यमंत्री राजेंद्र गावित ह्यांची मानहानी केली गेली तिथे तालुका पातळीवर काम करणाऱ्या आपल्या संघटनेच्या निर्णयावर टिप्पणी करणे तसे विशेष नव्हते. काही मंडळीनी 'स्वाभिमानी' तोंडघशी पडली अशी चर्चा रंगवून असुरी आनंद व्यक्त केला, परंतु वसईतील प्रस्तापित पक्ष निद्रिस्थ असताना ठाकुरांच्या 'अरे' ला 'कारे' असे ठणकावून सांगण्याचा निर्भीडपणा ह्याच तरुणांनी दाखवला होता हे विसरता कामा नये. निर्णय चुकतील म्हणून ते न घेणाऱ्या निष्क्रिय मंडळीपेक्षा धाडशी निर्णय घेउन समाजाचे नेतृत्व करण्याची धमक असणार्या तरुणाची आज समाजाला खरी गरज आहे. अपरिहार्य परिस्थितीमुळे घेतलेले निर्णय चुकीचे जरी वाटत असले तरी निर्णय घेणारेच समाजाला दिशा देतात हेच शाश्वत सत्य आहे.

सद्य स्थितीत कॉंग्रेस पक्षाने आपला उमेदवार मागे घेतल्याने काही अंशी वसईतील ख्रिस्ती समाजापुढे काहीसा पेच उभा राहिला आहे. आम आदमी पार्टी आणि मार्क्सवादी पक्ष जरी रिंगणात असले तरी खरी लढत हि भाजपा अन बहुजन विकास आघाडी ह्यात होणार आहे हे सांगण्याची गरज नाही. देशपातळीवर भाजपा पक्षाला सलग्न असलेल्या संघटनेचा इतिहास अल्पसंख्याकाच्या बाबतीत तितका चांगला नाही ते वास्तव आहे, ज्याची प्रत्यक्ष झळ वसईतील ख्रिस्ती समाजाला कधीही पोहचली नाही. दुसर्या बाजूला विचार केल्यास वसई-विरार परिसरात बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी नेहमीच आपल्या समाजाला धर्माच्या नावावर टार्गेट केले आहे. आपल्या समाजाची दुकाने फोडणे, वाघोलीसारख्या ठिकाणी घरात घुसून आपल्या लोकांना मारहाण करणे, आपल्या समाजाच्या जमिनी बळकावणे असे अलीकडच्या काळात घडलेले अमानुष प्रकार विसरणे कदापि शक्य नाही. त्यामुळे वसईपुरता स्वार्थी विचार केल्यास आपला मुख्य शत्रू बहुजन विकास आघाडी हा असून वसईला ह्या गुन्हेगारी शक्तीपासून वाचवण्यासाठी निवडून येणाऱ्या सशक्त उमेदवाराला पाठींबा देणे गरजेचे आहे असे मला वाटते. वसईतील ख्रिस्ती समाजापुरता विचारकरता भारतीय जनता पक्षाला जरी आपण जातीयवादी मानत असलो तरीही इतिहास तपासून पाहिल्यास आपल्या समाजाकरिता खरा जातीयवादी पक्ष हा बहुजन विकास आघाडी हाच असून भावी पिढीला त्याच्या एकछत्री आव्हानापासून दूर ठेवण्यासाठी व वसईच्या दीर्घ हितासाठी बहुजन विकास आघाडीची राजकीय ताकद कमी करणे हेच आपले ह्या घडीला पहिले लक्ष्य असले पाहिजे. ह्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला जर यश मिळाले तर त्याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या ३ जागेवर निश्चित पडतील व दुर्दैवाने त्यांच्या हाती अमर्यादित राजकीय सत्ता येवून महराष्ट्राच्या राजकारणात त्यांची उपयुक्तता अन उपद्रवमूल्य वाढेल व त्यांचे भीषण परिणाम वसईच्या राजकीय-सामाजिक समाजमनावर होतील. जर खरेच असे झाले तर मागील २५ वर्षाप्रमाणे विरोधकांचे खच्चीकरण होऊन वसईला ओरबाडण्याचे काम त्यांच्या लाभार्थीकडून अखंडपणे चालत राहील व आपल्या पुढील पिढीला आपल्या सारखाच संघर्ष करण्यावाचून पर्याय उरणार नाही. काही मंडळीचा आम आदमी पार्टीकडे भावनिक ओढा जरी दिसून आला तरीहि जिंकण्याची क्षमता नसणाऱ्या 'आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला होणाऱ्या मतदानामुळे ख्रिस्ती मताचे ध्रुवीकरण होवून त्याचा फायदा अंतिमता बविआला होणार आहे त्यामुळे ख्रिस्ती पट्ट्यातून आपल्याला मते मिळत नसतील तर ती भाजपकडे न वळता आप कडे कशी वळतील ह्याची गनिमी नीती छुप्या पद्धतीने बविआ कडून आखली जात आहे.

राजकारणात बदलत्या परिस्थितीत आपले साध्य साधण्यासाठी उपलब्ध असणार्या वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करून कमीत कमी नुकसान करणारे निर्णय घेणे महत्वाचे ठरते, त्यामुळे काही वेळेला भावनेला मुरड घालून व्यावहारिक पातळीवर निर्णय घेणे गरजेचे असते. सद्य परिस्थितीत बहुजन विकास आघाडीचा पाडाव करून त्याची तालुक्यावरील राजकीय पकड कमी करण्यासाठी त्या पक्षाचा पाडाव करण्याची क्षमता असणार्या पक्षाला मत देणे राजकीय दृष्ट्या शहाणपणाचे ठरेल असे मला वाटते. भविष्यात आपले स्वतचे घर जाळले जाण्याची शक्यता असताना जाळणाऱ्याचा बंदोबस्त करायचे सोडून कोसो दूर असणाऱ्या समधर्मी समाजावरील कल्पित हल्ल्याची भीती बाळगणे अन त्या भीतीतून घरच्या शत्रूचा पाडाव करण्यासाठी सक्षम असणाऱ्या उमेदवारला रोखणे आपल्या वसईतील समाजाकरिता आत्मघाती ठरू शकेल. प्राप्त परिस्थितीत देशातील वातावरण पाहिल्यास भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळण्याची शक्यता अधिक असून आपल्या मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यात फार काही फरक पडणार नाही पण ह्यावेळेला आपण थोडा धाडशी निर्णय घेऊन भारतीय जनता पक्षाला एकगठ्ठा मतदान केल्यास आपल्या मुख्य शत्रूचा पाडाव होऊन भारतीय जनता पक्षाच्या विजयात आपला महत्वाचा वाटा दिसून येईल ज्याद्वारे तालुक्यात दोन धर्मामध्ये असलेले सौधार्याचे संबंध अधिक दृढ होऊन सर्वधर्मसमभावाचे चांगले वातावरण निर्माण होईल.

आज माझ्या दृष्टीने मला वसईतील आपल्या लोकांच्या सुरक्षतेची व हक्काची जास्त प्राथमिकता आहे, त्यामुळे राहते घर, गाव व समाज वाचवण्यासाठी जवळच्या शत्रूचा पाडाव करणे हे मी महत्वाचे समजतो. काही निर्णय घेणे कठीण जरी असले तरी निर्णय घेणे हे महत्वाचे असते. भविष्य कुणी बघितलेले नाही त्यामुळे प्राप्त स्थितीत थोडे स्वार्थी बनून हिरव्या वसईला लुटणाऱ्या माफियाराजचा मुकाबला करण्यासाठी आपले मत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देणे मला अधिक संयुक्तिक वाटते. आपण सर्व सुज्ञ अन सुशिक्षित आहात व प्राप्त परीस्थित आपल्या वसईला डोळ्यासमोर ठेऊन मतदान कराल ह्यात काही शंका नाही. आपले मत वसईच्या भविष्यासाठी अमुल्य आहे.

No comments: