Tuesday, June 10, 2014

आठवणी आंब्याच्या !!


Sachin Mendes 4:48pm May 8
आठवणी आंब्याच्या !!

सचिन मेंडीस ©

मे महिन्याची सुट्टी अन आंब्याचे खूप जवळचे असे नाते आहे. सुट्टीच्या दिवसात आंब्यासोबत वेळ न घालवलेला व्यक्ती आपल्या समाजात शोधून हि सापडणार नाही. १९९८०-९० च्या वर्षात शाळेत असणाऱ्या मुलांनी आपली अख्खी उन्हाळी सुट्टी या ना त्या प्रकारे आंब्याच्या आसपास व्यतीत केली आहे त्यामुळेच आंब्याच्या आठवणी प्रत्येकाच्या तितक्याच मधुर अन रसाळ आहेत.

तसं पाहिलं तर हिवाळा संपत आला कि आंब्याच्या झाडावर मोहर येऊन त्याचा सुगंध आसमंतात दरवळत असे अन मग मोहरलेल्या झाडावरून एखादे 'किरमुट' शोधण्यासाठी बच्चेकंपनी मेहनत करीत असे. जस जसा उन्हाळा जवळ येई तसं तसे आंब्याचे झाड आंब्याने व्यापून जाई. साधारण मार्च महिन्यात बऱ्याचशा झाडाला कैऱ्या लागलेल्या दिसत असतं अन त्याची आंबट गोड चव तोंडाला पाणी आणत असे. आम्ही कधी कधी अभ्यासाच्या नावाखाली वाडीत केळीच्या भागात चटई टाकून अभ्यासाला बसत असू. तसा अभ्यास कमी अन घरून आणलेल्या मीठ मसाल्या बरोबर कैऱ्या खाणे हा उद्योग जास्त चालत असे. थोडक्यात अभ्यास हा 'बाय-प्रोडक्ट' असायचा. मधेच कैरीतून निघालेली बी म्हणजे 'कोय' भविष्यातील नवरी शोधण्यासाठी लागू पडायची. दोन बोटात कोय धरून ती उडवायची अन ज्या दिशेला ती पडेल त्या दिशेला असलेल्या गावातली मुलगी नवरी मिळेल अशी चर्चा चालायची. ३६० अशांत कोय फेकून सगळ्या दिशा पालथ्या घातलेल्या माझ्या गावातील एका मित्राला अजूनही 'अठ्वारा' राहायची वेळ का आली, हा संशोधनाचा विषय आहे. कधी बेत जमलाच तर आंब्याची 'चटणी' व्हायची. त्यात साखर, मीठ, मसाला, गोडेतेल अन काळी चिंच घातली जायची अन मस्त पैकी केळीच्या पानावर ती वाटली जायची. घरून चटणी साठी सामान आणताना मला नेहमी 'गोडेतेल' आणायला का सांगितले जात होते त्याचे अर्थशास्त्र मोठेपणी कळाले तेव्हा माझे मलाच हसू आले.

आमच्या गावातील वाडीत शेजारच्या ब्राह्मण व्यक्तीची जागा होती. त्याला आम्ही 'दामूची वाडी' म्हणत असू. त्या वाडीतील कैऱ्या चवीला गोड अन आकाराने मोठ्या होत्या. दुपारच्या वेळेत त्या वाडीतील माणसे जेवायला घरी गेली कि आम्ही त्या वाडीवर गनिमी पद्धतीने चढाई करत असू, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आंबे पाडण्याच्या हिशोबाने आम्ही त्या वाडीच्या आसपास अगोदरच दगडाची सोय करीत असू. एक दोन मुले कुणी येते का याची टेहळणी करत असतं अन तेव्हाच मोठ्या प्रमाणात झाडावर दगडाचा मारा होत असे अन काही मिनिटात २०-२५ आंबे हातात येऊन मोहीम फत्ते होत असे. कधी कधी टवाळखोर मुले 'दामू आलो दामू आलो' अशा खोट्या बोंबा मारून सगळ्यांची पळता भुई थोडी करत असतं. आमच्या गावाच्या मधोमध एका घराच्या पाठीमागे एक गोड कैऱ्याच झाडं होत परंतु त्या झाडाखाली पूर्वजांचा साप (ज्याला मराठीत भुजंग अन आपल्या बोली भाषेत 'खेत्रो' म्हणतात)असल्याची वंदता असल्याने आम्ही इच्छा असूनही त्या झाडाच्या वाटेला जात नसू.

परीक्षा संपत येत असताना त्याच हंगामात आंबे पिकायला सुरुवात होत असे. गावातील प्रत्येक आंब्याच्या झाडाला विशिष्ट असे नाव होते. त्यामध्ये तोतापुरी, गीटी, धारणी, काळी आंबा अशी माझ्या परिचयाची नावे. आमच्या गावातला गीटी आंबा खूप प्रसिद्ध होता. साधारण लाडूच्या आकाराचे आंबे त्याला लागायचे, पण 'मूर्ती लहान अन कीर्ती महान' असाच त्याचा लौकिक होता. पण दुर्दैवाने त्या झाडाची उंची खूप जास्त असल्याने फक्त ठराविक मुलांनीच मारलेले दगड तिथे पोहचत असतं. बाकीच्या वयाने लहान मुलांना नैसर्गिक रित्या वारयाने पडणाऱ्या आंब्यावर समाधान मानावे लागे. दुर्दैवाने मी जेव्हा जेव्हा पडलेले आंबे शोधायला जाई तेव्हा अगोदरच काही मुले तिथे पोहोचलेली असतं. जणू काही झाडावरून पडलेले आंबे उचलण्याचा ठेका त्यांनी घेतलेला असावा. काही वेळेला पक्षांनी चोच मारलेले आंबे सापडत असतं जे त्या आंब्याच्या स्थितीवरून ठेवायचे कि फेकायचे ते ठरविले जाई. कधी कधी झाडाखालील दूर कचऱ्यात एखादा पडलेला आंबा दृष्टीस पडायचा परंतु लहान असल्याने तिथे जाण्याची भीती वाटत असे, अन मग तो आंबा मिळवण्यासाठी एखाद्या वयाने मोठ्या असलेल्या मुलाला एक चावा देण्याच्या अटीवर प्रासंगिक करार करून तो आंबा मी मिळवीत असे, ज्याचे अप्रूप काही वेगळेच. बरयाच वेळेला एखाद्या झाडावर एखादा गर्द पिवळा आंबा आढळत असे ज्याला आम्ही 'बुलबुल' म्हणत असू. असा आंबा मिळवण्यासाठी अख्खी दुपार दगडांचा मारा त्या दिशेने होत असे. ज्याच्या दगडाने तो आंबा पडत असे त्याला स्वयंवरात एखादी राजकुमारी मिळवल्याचा आनंद वाटत असे. काही वेळेला कच्चे आंबे पडून ते पेंढ्यात खालून पिकविले जात परंतु जी मजा झाडावर पिकलेल्या अन दगडाने पाडलेल्या आंब्यात होती ती घरी पिकविलेल्या आंब्यात नक्कीच न्हवती.

पावसाळ्यात लागणाऱ्या लोणच्याची तयारी म्हणून बरीच मंडळी मे महिन्यात अंगणात दुपारच्या उन्हामध्ये खाटेवर मीठ लावून आंब्याच्या फोडी वाळत घालत असतं. अशा मीठ लावून रेडीमेड खाण्यासाठी तयार असणाऱ्या फोडीवर डल्ला मारणे जास्त अवघड नसे. कारण नसताना उगाच जाता येता दोन दोन फोडी उचलून प्रत्येक जण आपली सोय करत असे.

एक वर्षी आमच्या गावातील बच्चेकंपनीला क्रिकेटसाठी काही साहित्य आणायचे होते. आमच्या क्रिकेट मंडळाची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने काही हुशार मुलांनी दूरच्या वाडीतली आंब्याची झाडे खाली करून ते विकून आलेल्या पैशातून क्रिकेट साहित्याची सोय केली होती. आजच्या घडीला BCCI ने IPL सारखे टुकार खेळ भरवण्यापेक्षा ह्या बाबतीत आमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा :-)

आज मागे वळून आंब्याच्या आठवणी जाग्या करताना बदललेल्या परिस्थितीची जाणीव होते. नवीन घरासाठी जागा म्हणून बहुतेक गावातील आंब्या चिंचेच्या झाडाचा बळी गेलेला आहे. जे उरलेली आंब्याची झाडे आहेत त्याची दाखल घेणारी पिढी आज राहिली नाही. आंब्याच्या झाडावर दगड मारणारी मुले आता कमावते पालक झालेली असून त्यांच्या मुलांच्या वाट्याला मार्केट मधील महागडा हापूस आला आहे जो धुऊन कापून अन साल काढून त्यांच्या पुढ्यात ठेवला जातो. खरंच काळ किती बदलला. माणसे बदलली, मुलांची खेळण्याची अन जगण्याची साधने बदलली. कधी कधी उगाच वाटते कि मे महिन्यात हीच आंब्याची झाडे वर्षोन वर्षे त्यांच्या पायायी येऊन आंबे लुटणाऱ्या मुलांची वाट पाहत असतील का? अशा अचानक तुटलेल्या नात्यामुळे त्याचे जगणे कोरडे झाले असेल का? त्यांच्या अंगणातील हरवलेला मुलांचा किलबिलाट त्यांना असह्य करत असेल का? पुन्हा येईल का मोहर तसाच त्या दुरावलेल्या आंब्यांना अन रुजेल का नवीन झाडं नवीन पिढीच्या जीवनात त्यांच्या असण्याच? मला खात्री नाही, पण बघू या काय काय होते ते येणाऱ्या काळात.

सचिन मेंडीस©

No comments: