Thursday, August 21, 2014
एक विचार, एक कृती, एक बदल, एक आदर्श !!
एक विचार, एक कृती, एक बदल, एक आदर्श !!
मागच्या दशकात आपली आर्थिक भरभराट झाली अन सर्वांची क्रयशक्ती वाढली. पूर्वी वर्षातून होणारी खरेदी २-३ महिन्यात किव्हा वरच्या वर होऊ लागली. नवीन कपडे, शूज, चपला, घड्याळे, मोबाईल व अनेक बाजारपेठेकडून माथी मारलेल्या वस्तू घरात येऊ लागल्या. पण नवीन वस्तू कपाटात पडत असताना त्याच वेगाने घरातील जुनी वस्तू काही बाहेर निघायचे नाव घेत नाही. मग काय, फक्त ढिगारा. कपड्यांचा, चपलांचा, मुलांच्या खेळण्यांचा अन अलीकडेच आणलेल्या पण नवीन वस्तूच्या तुलनेत जुन्या झालेल्या सामानांचा.
नवीन फ्रीज घरात आलं तर जुने फ्रीज बाहेर टाकायला आईचा विरोध मग टाक ते वरच्या खोलीत. एखादे शर्ट कोणाला द्यायचे म्हटले तरी ती अलीकडेच घेतल्याची खंत, किती वेळा कपडे वापरले, त्याची किंमत, ब्रांड असा विचार करून मग अशे शर्ट कपाटात एका खाली एक लपत जातात. ना धड ते कुणाला दिले जातात ना धड वापरले जातात. वर्षाकाठी मोबाईल बदलत राहतात, नवीन घड्याळे येत राहतात पण जुना मोबाईल, घड्याळ घरातून बाहेर काढायला मन तयार होत नाही. मग येतो वस्तूंचा महापूर. जिकडे तिकडे ह्या अलीकडे घेतलेल्या अन वापरात नसलेल्या वस्तू साचत राहतात अन घरात जागा कमी पडू लागते.
लहान मुलांसाठी आणलेल्या औषधांच्या बाटल्यांची पण तीच कथा. अर्धवट संपलेल्या बाटल्या शोकेस मध्ये किव्हा भिंतीच्या कोनाड्यात महिनोन महिने पहुडलेल्या असतात. पुन्हा कधी लागतील असा विचार करून ठेवलेली हि औषधे एकमेकांत हरवून जातात किव्हा लहान मुलांच्या बाबतीत जास्त हळवेपणा असल्याने आपण सरळ नवीन बाटलीच विकत घेतो अन घरात मेडिकल स्टोर तयार होते. तीच गोष्ट चपलांची. घरात ४-५ माणसे असतील तर प्रत्येकाचे २-3 बूट, चपला, लहान मुलांचे ५-६ जोड अन मग पावसाळ्यासाठी वेगळी पादत्राणे असा हा भला मोठा व्याप एका Stand पाशी जमतो, नवीन पादत्राणे येत राहतात पण जुनी जागची हलत नाही अन चुकून हललीच तर एका पिशवीत बंदिस्त होऊन वरच्या खोलीत भूमिगत होतात.
सुरवातीला मला वाटायचं हे फक्त माझ्या बाबतीत घडते अन माझ्याच घरापुरता मर्यादित आहे पण घरोघरी मातीच्याच चुली असे हे चित्र आहे (काही अपवाद असू शकतात). तात्पर्य हेच कि नव्या वस्तूंचे इनकमिंग चालू असताना जुन्या वस्तूंचे आउटगोइंग चालू राहिले पाहिजे अथवा वस्तूंचे इनकमिंग मर्यादित असावे. आपल्या घरातील वापरात नसलेल्या चांगल्या वस्तू एकत्र करून गरीब गरजूंना दान देण्याची कल्पना कशी वाटते? बर्याच स्वयंसेवी संस्था अशा वस्तूंच्या शोधात असतात, जे ते दुर्गम भागात किव्हा गरीब वस्ती मध्ये वाटत असतात. आपल्या घरात पलंगाच्या कपाटात अनेक वर्ष दडून राहिलेले एखादे पांघरून रस्त्यावर झोपणाऱ्या कुणा निराश्रित व्यक्तीच्या कामी आले तर आपल्याला नक्कीच समाधान लाभेल, नाही का?
'सुशिक्षित' अन 'सुसंस्कृत'
जोगेश्वरीवरून अंधेरी डाऊन गेल्याने आज छानपैकी सीट मिळाली. गाडी अंधेरी पोहचताच क्षणात उड्या मारून प्रवाशी आत शिरले अन डबा प्रवाशांनी फुलून गेला. माझ्या समोर साधारण २८-३० वर्षाचा एक तरुण येऊन उभा राहिला. अंगात लुई फिलिपचा शर्ट, खिशाला महागडा माउंट ब्लांक पेन, एका हातात आय-फोन अन शरीराला उंची सुगंधी अत्तर असा एकूण हेवा वाटावा असा त्याचा पेहराव होता.
गाडी सुरु झाल्यावर त्याने खिशातील हल्दीराम भूजीयाचे पाकीट बाहेर काढले अन काही वेळात त्याचा निकाल लावला. पाकीट रिते झाल्यावर त्याने थोडा पुढे येऊन ते पाकीट मोठ्या रुबाबाने खिडकीतून बाहेर फेकले. मी अवाक होऊन त्याच्या कडे पाहत राहिलो. त्याने केलेल्या 'त्या' कृतीने एकूणच त्याच्या अंगातील लुई फिलिपचा शर्ट, खिशातील माउंट ब्लांक पेन, हातातील आय-फोन अन शरीराला येणारा उंची सुगंधी ह्या सर्व श्रेष्ठ वस्तूंचा अक्षरशा: 'कचरा' करून टाकला होता. ज्या व्यक्तीचा काही क्षणापूर्वी हेवा वाटत होता, तो आता मला 'खुजा' जाणवू लागला होता. त्याच्या एका कृतीने 'सुशिक्षित' अन 'सुसंस्कृत' ह्या मधील फरक अधोरेखित केला होता. धन्य तो सुशिक्षित नव्या पिढीचा चेहरा !!
सचिन मेंडीस
वेदना !
वेदना !
हे मी तुला का सांगतोय हे मला माहित नाही, बहुतेक तू माझ्या मुलाच्या वयाचा असावा म्हणून असावं. माझ्या निवृत्तीला आता ७-८ वर्षे झाली. चौकोनी कुटुंब, एक मुलगा अन एक मुलगी. मी नोकरी सांभाळली तर ह्यांच्या मम्मीने संसार अन ह्यांच्याकडे लक्ष दिलं. मुलांना कुठे कमी पडून दिलं नाही. मुलगी लग्न करून सासरी गेल्याला १० वर्षे झाली तर मुलगा सध्या अमेरिकेला असतो. मुलगी वरचेवर घरी येते, पण तिची नोकरी, मुले अन संसार हे सर्व करता तिची धावपळ होते, अन आता तर आल्या आल्या निघायची घाई करते. तिचा दोष काय करायचा, कुठे कुठे लक्ष देईल ती.
मुलांनी शिकावं, मोठे व्हावं असे मनोमन वाटत होते, त्यात मुलगा हुशार म्हणून उच्चशिक्षण दिलं अन शिक्षण करून जो तो अमेरिकेला गेला तो अजून तिथेच रमलाय. पूर्वी म्हणायचा कि ३-४ वर्षे राहून मग परत येतो, मग लग्न करावं म्हणून पुन्हा विचार बदलला, नंतर सुनेने अमेरिका अनुभवावी म्हणून पुढे परतणे लांबले अन आता मुलगी झाल्यावर तिला इथलं वातावरण कसं झेपेल अशी चिंता त्याला लागली आहे. एकुलता एक मुलगा आमचा. रोज फोन करतो, बोलण होत, पण डोळ्यासमोर नाही ह्याची खंत वाटते. एवढ्या मोठ्या घरात आम्ही दोघे, घर खायला उठते. का कुणास ठाऊक एक प्रचंड पोकळी निर्माण झाली आहे ह्या घरात. ह्याची मम्मी वरचेवर आजारी असते. रात्री अपरात्री उठते अन ह्याच्या आठवणीने ढसाढसा रडते. तिला समजावण्याचा प्रयत्न करतो पण आईचं मन तिचं, मला इतका शोक होतो तर त्या बिचारीचा काय दोष करू.
महिन्याला इथे बँकेत डॉलर जमा होतात पण मुलाच्या स्पर्शाच्या उबेपुढे त्या डॉलरची उब काय कामाची. कधी गरज पडली तर शेजारच्या मुलाला बोलवायला लागते, कुणी नाही म्हणत नाही मदतीला, पण एकुलता एक मुलगा परदेशी ऐश्वर्यात असताना कुणाला मदतीला बोलवायला कसेतरीच वाटते. अजून किती वर्षे आम्ही जगणार माहित नाही, मनात विचार येतो उरलेल्या आयुष्यात मुला अन नातीसोबत भरलेल्या घरात राहायला मिळेल की नाही. हिने तर आता वेगळच खूळ घेतलाय डोक्यात, म्हणे उद्या परवा माझं काय झाल तर तोंड पाहायला तरी हा पोहचेल का? कधी कधी शांतपणे विचार गेला तर वाटते थोडा कमी शिकला असता तर जवळ राहिला असता, कमी चैन केली असती पण घर फुललं असतं. हिच प्रेशर, माझा डायबेटीस अन हि औषधे, का कुणास ठाऊक हा जवळ असता तर वाट्याला आली नसती.
तुमच्या सारखी तरुण मंडळी समोर येता तेव्हा तो डोळ्यासमोर उभा राहतो. कसं समजावू त्याला हा जन्म एकदाचं आहे, हे पप्पा-मम्मी एकदाचं येणार आहेत वाट्याला. एकदा गेले कि पुन्हा नाही येणार परत. मग कितीही डॉलर मोजले तर न आम्ही परतणार न उडून गेलेले क्षण. आयष्य म्हणजे पैसा, प्रमोशन, चैनीच जीवन अस थोडेच असते, जिथे नात्याचा ओलावा नाही, आपल माणूस जवळ नसल्याने डोळ्यात पाणी नाही, अशा जिण्याला काय आयुष्य म्हणायचं? मी हताश झालोय पण आशावादी आहे, तो येईल कायमचा परत आमच्याकडे. पुन्हा घर भरेल, बहरेल. त्याची आई शांतपणे झोपेल. त्याने यायलाच पाहिजे आता, त्याची आई अन मी कायमचे झोपी जाण्या अगोदर.
सचिन मेंडीस
हे कुठे तरी बदलायला हवे !
परवा ट्रेन मध्ये उभा असताना डोक्यावरील पंखा अन लाईट बंद आढळले अन मित्राच्या वडिलांची आठवण झाली. ते रेल्वेत कामाला होते अन आता रिटायर्ड झाले होते. ते सकाळी ६ वाजता घरून कामावर निघायचे, जाताना वाडीतील भाजीपाला अन केळीची फुले घेऊन जायचे अन ११ वाजेपर्यंत घरी परतायचे. ते 'पासवाले' असतील अन दादरला माल विकायला जात असतील असा माझा तेव्हा गोड गैरसमज होता. जेव्हा ते सेवानिवृत्त झाले अन मित्राने मला सेवानिवृत्तीच्या निमित्ताने जेव्हा कार्यक्रम अन प्रीतीभोजनासाठी आमंत्रित केले तेव्हा त्याचे वडील रेल्वेत नोकरीला असल्याचे कळले. गेली चाळीस वर्षे ते भाजीपाला घेऊन जात असतं अन तो विकून झाल्यावर रेल्वे यार्ड मध्ये जाऊन सहीचा सोपस्कार पूर्ण करीत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला भेट दिल्यावर उगाचं तो 'सेवा' शब्द डोळ्याला अन मनाला खुपत होता. सेवानिवृत्तीच्या भाषणात त्यांच्या सेवेविषयी पाहुणे सुंदर फुले उधळत असताना मला का कुणास ठाऊक डब्यातील बंद असलेले पंखे अन डोळे मिटलेल्या ट्यूब लाईट डोळ्यासमोर येत होत्या. वाडीतील भाजीपाला तोडून तो मुंबईला नेण्याचे श्रम घेणारे असे व्यक्तिमत्व रेलेवेच्या सेवेबाबत असे कामचुकार का असा मनाला प्रश्न पडायचा. कधी कधी चांगली कामसू माणसेही सरकारी सेवेत 'दांड्या मारण्याच्या' 'पाट्या टाकण्याच्या' किव्हा 'लवकर पळण्याच्या' संस्कृतीत कसे रुळून जातात हे पाहून वैषम्य वाटले अन मग हीच संस्कृती त्यांच्या अंगवळणी पडून त्यांच्या जगण्याचा भाग बनून जाते असे जाणवले.
काही वर्षापूर्वी एक दूरच्या नातेवाईकाला भेटण्याचा योग आला होता. केंद्र सरकारच्या कोत्यातरी खात्यात तांत्रिक विभागात तो 'चिकटला' होता. सहज बोलताना तो दिनक्रमाविषयी मोठ्या अभिमानाने बोलत होता. सकाळी गेल्यावर तासभर नाष्टा करणे मग २-३ तास काम, नंतर जेवण मग तासभर डुलकी अन मग घरी परतीचा प्रवास असा राजेशाही दिवस. पुन्हा घरी आल्यावर थोडा आराम अन मग गावात कुणाच्यातरी ओटीवर पत्ते कुटणे. २७-२८ वर्षे वय असलेल्या त्या तरुणाचे त्या उमेदीच्या काळातील जगणे पाहून पहिल्यांदा कीव अन नंतर चिंता वाटली. ज्या काळात ह्या तरुणाने मेहनत करावी, आपल्या कामातून कौशल्य शिकून पदोन्नती घ्यावी, त्या वयात ह्याने असा आळसपणा करावा हे जरा अतीच होते. श्रम न करता घरी येणारा पगार, अर्धा दिवस घरी असल्याने नकळत लागलेली व्यसने अन काम करण्याची इच्छा मरून गेल्याने शरीरात साचून गेलेला स्थूलपणा मला त्या तरुणाच्या बाबतीत चिंताजनक वाटला. दुर्दैवाने करिअर करण्याच्या थ्रिल पेक्षा घरी लवकर पळण्याचे थ्रिल त्याला जास्त ''किक' देत असावे, असो.
सातासमुद्रा पार आपल्या ज्ञानाचा अन कौशल्याचा झेंडा रोवणारा आपला समाज अन त्याचं समाजात जगणारी अशी व्यक्तिमत्वे उगाचं मनाला सलत राहतात. ज्या समजातून अनेक लोक सरकारी सेवेत राहून सन्मानाने निवृत्त झाली, आपल्या कामाचा ठसा त्यांनी शासन दरबारी उमटवून दाखवला, सेवाकार्यात अनेक प्रशस्तीपत्रके मिळवून आपल्या समाजाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला, त्याचं समाजात असा प्रवृत्ती आनंदाने मिरवाव्या, ही थोडी शोकांतिका वाटली. हे कुठे तरी बदलायला हवे असे मनोमनी वाटते. रेलेवे, मुंबई महापालिका येथे चांगले काम करणाऱ्या आपल्या मंडळीचा हे आदर्श घेतील का? निदान तरुण पिढीने तरी !!
सचिन मेंडीस
ग्रेट भेट अन चेकमेट !
ग्रेट भेट अन चेकमेट !
अलीकडेच 'पिके' च्या सेटवर आमिरची भेट झाली. तसा तो २० वर्षापूर्वी रंगीलाच्या शुटींगच्या वेळी वांद्र्याला कोलेजसमोर भेटला होता. त्याने लांबून पाहून हलकेच स्मित केले. मी त्याच्या जवळ गेलो अन हस्तांदोलन केले अन विषय काढला. 'आमीरजी, 'सत्यमेव जयते' खूप आवडलं लोकांना, खूप अपेक्षा आहेत तुमच्या कडून आम्हाला, पण असे व्यवस्थेच्या बाहेर राहून व्यवस्था कशी बदलणार. तुम्ही नेतृत्व घ्या, युवा पिढी तुमच्या पाठीशी उभी राहील. किती प्रश्न आहेत देशापुढे'. आमिर हलकेच हसला अन म्हणाला, 'सचिन, बहोत आसान है, बहोत आसान है, सिम्पल फंडा है, आंख बंद करनेका और दिल पे हाथ रखकर बोलनेका, 'आल एज वेल, आल एज वेल', बस हो गया काम'. त्याच्या ह्या उत्तराने मी निराश झालो अन म्हटलं 'और जब आंख खुलेगी तो दिखाई देगा अपना देश, तुम्हारे पिके के पोस्टर जैसा 'नंगा' ! त्याने रागाने माझ्याकडे पाहिले, तसेच जसा अमिताभ केबीसीच्या सेटवर रागावला होता माझ्यावर.
तशी अमिताभशी माझी भेट दुसऱ्यांदा, पहिल्यांदा कॅडबरीच्या जाहिरातीवेळी भेटला होता. तेव्हाच त्याला प्रश्न विचारणार होतो पण त्यांनी माझ्या हातात कॅडबरी दिले अन म्हटले, सचिनजी, कुछ मिठा हो जाये'. मग मी विचार केला उगाच गोड वातावरणात मिठयाचा खडा नको. पण मागे पुन्हा केबीसीच्या सेटवर संधी साधून आली होती. चाहत्यांच्या गरड्यात असूनही त्यांची नजर माझ्याकडे गेली अन त्यांनीच समोरून हाक दिली, 'सचिनजी, आजकल मिलते नही आप, हमसे कोई गुस्ताकी तो नही हुई', मी सरळ विषयालाच हात घातला. मी म्हटले आता लोकांना प्रश्न विचारणे पुरे झाले, आता देशासमोरील प्रश्न सोडवण्याची वेळ आली आहे, लोकांनी तुम्हाला भरभरून दिले आहे, आता तुम्हाला व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, तुमच्या पदाचा, तुमच्या वजनाचा, तुमच्या प्रतिष्ठेचा लोकहितासाठी वापर केला पाहिजे'. त्यांनी माझ्याकडे मिश्किलपणे हास्य केले अन म्हटले, ''सचिनजी, कौन साला उस कीचड में हात दालेगा दोबारा. उफ तुम्हारे ये उसूल, ये आदर्श, इस सारे उसुलो को मिलाके एक वक्त कि रोटी भी नही बन सकती, आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बलेंस है, क्या है तुम्हारे पास?', मी त्यांच्या अशा उत्तराने थोडावेळ चाट पडलो अन उत्तरलो, 'मेरे पास, मेरे पास 'भारतमाता' है, जो आज मदत के लिये पुकार राही है आपको! अमिताभ खजील झाला होता, त्या संवादाने आमच्यात एक अदृश्य 'दीवार' उभी राहिली होती, अगदी तशीच जेव्हा मी दीदीच्या घरून निराश मानाने परतलो होतो.
गेल्या महिन्यात कामानिमिताने ऑफिसच्या कारने चर्चगेटला निघालो होतो, पेडर रोड वर अचानक गाडी बंद झाली. मी बाहेर येऊन गाडी नीट होण्याची वाट पाहू लागलो तर अचानक कानावर मंजुळ हाक ऐकू आली, 'सचिन भाऊ, सचिन भाऊ', मी मागे वळून पाहिले तर जवळच्या बिल्डींगच्या खिडकीत साक्षात गानकोकिळा उभी. मला म्हणाली, 'सचिनभाऊ, गाडी ठीक होईपर्यंत चहा घेऊन जा', मी ड्रायवरला सांगून इमारतीकडे वळालो. दीदीच्या घरात पाऊल टाकेपर्यंत चहा तयार झाला होता, घरात मंद आवाजात 'ये मेरे वतन के लोगो' हे दीदीने गायलेले गीत वाजत होते. चहात साखर नव्हती, पण दीदीच्या मंजुळ आवाजाने चहा गोड भासत होता. आता आयतीच संधी आली आहे हे पाहून मी सरळ विषयालाच हात घातला. 'दीदी, आज पर्यंत तुम्ही चित्रपटासाठी गळा वापरला, आता लोकांच्या प्रश्नांसाठी थोडा गळा काढा, खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, भ्रष्टाचार ह्याबद्दल थोडे बोला, प्रशासन नक्कीच हलेल, तुम्ही 'भारतरत्न' आहात, सरकार नक्कीच दखल घेईल अन जनतेला फायदा होईल,' माझे बोलणे शांतपणे ऐकून दीदी जागेवरून उठल्या अन खिडकीकडे वळल्या. मी सकारात्मक उत्तराची अपेक्षा बाळगून होतो, दीदी थोडा वेळ शांत होत्या अन मग मला म्हणाल्या,' सचिनभाऊ, तुमची कार ठीक झाली आहे, ड्रायवर शोधतोय तुम्हाला, तुम्हाला निघाले पाहिजे,'. मी समजायचे ते समजून गेलो अन जागेवरून उठलो. दरवाजात पोहचल्यावर क्षणभर थांबलो अन दीदीला म्हणालो, दीदी, जमलं तर ते 'ये मेरे वतन के लोगो' गाणे तितके बंद करा, शोभत नाही ते इथे'. दीदीने धाड्कन दरवाजा बंद केला. मला सल्लूने दरवाज्यावर मारलेल्या लाथेची आठवण झाली.
वांद्र्याला एका अनाथाश्रमामध्ये जाण्याचा योग आला होता. मिशनरी सिस्टर्स तो अनाथाश्रम चालवीत होत्या. मी मुलांच्या खोलीकडे वळालो तर मुलांच्या घोळक्यात सलमान खेळत होता. मी पाहून न पाहिल्या सारखे केले. तर सलमानने जोरात हाक दिली, 'क्या मेंडीसभाई, कम से कम हात तो मिला'. मी म्हटले 'सल्लू, तू रस्त्यात दारू पिऊन लोकांच्या अंगावरून गाडी नेतोस अन येथे अनाथ मुलांच्या खांद्यावरून हात फिरवतोस, मला नक्की समजत नाही तुझ हे वागण'. सलमान माझ्याकडे पाहून गालात हसला, बहुतेक माझ्या अशा प्रश्नाने त्याला 'किक' लागली असावी. म्हणाला,' मेरे बारे में इतना मत सोचना, दिल में आता हू, समझमे नही', असं बोलून वेडेवाकडे चाळे करू लागला. मी शांतपणे त्याच्या कडे पहिले अन उलट उत्तर दिले, 'देश पे एक एहसान करना, कि देश पे कोई एहसान न करना', माझा हा डायलॉग त्याच्या जिव्हारी लागला, त्याने उद्वेगाने धाड्कन दरवाजावर लाथ मारली जी मला क्षणभर तेंडूलकरने शेन वार्नला हूकचा फटका मारल्यासारखी वाटली.
आज तसा संध्याकाळी सचिन भेटणार आहे वानखेडेला, त्यालाही फैलावर घ्यायचं आहे थोडं. मोठ्या आशेने राज्यसभेवर पाठवलं आहे त्याला, सांगतोच त्याला दोन युक्तीच्या गोष्टी, म्हणतो त्याला 'लोकांच्या प्रश्नावर तिथे चौफेर फलंदाजी कर अन त्या गेंड्याच्या कातडीच्या राजकारण्यांची विकेट काढ, मग बघ कसे हिट विकेट होतील ते', उगाच गैरहजर राहून राज्यसभेची जागा कुजवू नकोस ती !!
Wednesday, August 6, 2014
'स्नेल डिश' !!
'स्नेल डिश' !!
गावातील पावसाळा शेतामधील गोगलगायी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जमिनीवर किंवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या बहुतेक गोगलगायी ह्या तशा संथ चालणाऱ्या अन गरीब जातीच्या प्राणी परंतु उपद्रवी असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. लहानपणी शाळेत 'गोगलगाय बारशाला निघते अन लग्नाला पोहचते' अशा आशयाचा धडा होता. सहज बाजूला गेले तर शरीर आकुंचित करणारी ही बया 'गोगलगाय अन पोटात पाय' म्हणून ओळखली जाते.
मागच्या वर्षी फ्रान्स मधील एका निसर्गरम्य गावात पर्यटनासाठी गेलेलो असताना 'स्नेल डिश' खाण्याचा अनुभव आला. युरोपिअन लोक तिखट पदार्थ खाणे टाळत जरी असले तरी 'स्नेल डिश' बर्यापैकी झणझणीत होती. विशेष म्हणजे कवचाच्या आत असलेला मृदू भाग खाण्यासाठी दोन वेगवेगळे चमचे दिलेले होते. एक चमचा गोगलगाय पकडण्यासाठी उपयोगी होता अन एक दोन दाताचा वेगळ्याच प्रकारचा चमचा अलगतपणे तिच्या पोटातून मांसाहारी भाग बाहेर काढण्यासाठी होता. तस पाहिलं तर खेकड्याच्या हातातील (फान्गुडे) मांस काढताना आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतात, प्रसंगी घरातील पाटा-वरवंटा घ्यावा लागतो. पण ह्या चमच्यामुळे तोडफोडीची गरज पडली नाही. आता राहिला चवीचा भाग, काही जणाला गोगलगाय खाणे विचित्र वाटेल, पण चवी बाबतीत गोगलगाय खेकडा अन झिंगा ह्यानाही मागे टाकेल अस मला वाटते.
गोगलगाय खात असताना बेडकाच्या मागच्या पायाची आठवण झाली. पूर्वी आपल्याकडे बेडकाच्या पायाचा सूप शक्तिवर्धक समजला जाई पण आता ते दिवस मागे राहिले आहेत. सहज फ्रेंच मित्राशी ह्याविषयी विचारपूस केली असता ते ही बेडकाच्या मागच्या पायाचे चाहते असल्याचे कळाले. वसईत आलेले पोर्तुगीज लोक ही आवड बऱ्याच देशांना देऊन आले तर नाही ना अशी शंका वाटते. सहज जुने फोटो पाहत असताना हा फोटो सापडला अन दोन शब्द लिहावेसे वाटले.
टिप: गोगलगायींच्या काही जाती विषारी असतात त्यामुळे आपल्या इथे ह्या गोगलगायींचा खाद्य म्हणून उपयोग करीत नसल्याचे समजते.
'माणूस' बनायचं राहून जाते !!
'माणूस' बनायचं राहून जाते !!
गावात असतो तेव्हा मी 'बोळींजकर' असतो.
आगाशी, उमराळे अन नंदाखाल करांनी माझ्या गावाविषयी बोलले,
तर मी अस्वस्थ होतो, पेटून उठतो, जशास तसे उत्तर देतो !!
गावाबाहेर पडतो तेव्हा मी 'कुपारी' बनतो.
'दारू-बिर्याणी पाजली कि कुपारी मत फिरवतो' असे ऐकले कि माझे टाळके फिरते.
मी आगाशी, उमराळे अन नंदाखालकर मित्रांसमवेत निषेध व्यक्त करतो,
प्रसंगी बोलणाऱ्या ब्राह्मण, आगरी, वाडवळ जातीचा उद्धार करतो !!
समाजाबाहेर पडतो अन लोकल गाडीत चढतो तेव्हा मी 'विरारकर' होतो.
डाऊन ला येणाऱ्या अन बोरीवली ला चढणाऱ्या प्रवाशाची 'आय-माय' एक करतो.
विरारच्या हक्कासाठी लढा देतो, प्रसंगी टोळी बनवून कायदा हातात घेतो !!
मी अजून पुढे जातो अन दिल्ली मुंबई विमानात बसतो.
पुढे बसलेला अन मराठी पेपर वाचणारा प्रवासी माझे लक्ष वेधतो.
भय्या, गुजराती अन मारवाडी प्रवाशापेक्षा तो आपलासा वाटतो.
मी 'जय महाराष्ट्र' म्हणून त्यला मंद स्मित देतो !!
मी अजून झेप घेतो अन जगाला गवसणी घालतो.
गोऱ्या कातडीच्या 'जिनीवा' शहरात तो मला भारतीय वाटतो.
माझे देशप्रेम उचंबळून येते अन 'कहा से हो भाई' म्हणत मी विचारपूस करतो.
'मैं कानपूर से, और आप कहा से' म्हणत ग्लासाला ग्लास भिडते.
'सारे जहा से अच्छा हिन्दुस्था हमारा' गीत मनोमनी वाजते !!
मी असतो कधी बोळींजकर, कधी कुपारी, तर कधी विरारका छोकरा,
बनतो मी मराठी, कधी बनतो मी इंडिअन,
का कुणास ठाऊक 'माणूस' बनायचं राहून जाते,
'सारे विश्वची माझे घर' माझ्या पुस्तका पुरता उरते !!
दिमाग कि कमाई !!
दिमाग कि कमाई !!
मागच्या आठवड्यात बांद्रा कुर्ला संकुल येथील अमेरिकी दुतावासात विजासाठी मुलाखतीला जाण्याचा योग आला. मुलाखतीसाठी कागदपत्रे अन मोबाईल इतका ऐवज घेवून मी तिथे पोहचलो. अमेरिकी दुतावासात सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने मोबाईल इमारतीमध्ये नेण्यास मज्जाव होता पण तिथे बाहेर भाड्याने लॉकर मिळतील अशा आशेवर मी घरून सोबत मोबाईल घेऊन गेलो. (आजकाल मोबाईल घरी सोडून मुंबईत जाणे एखाद्या निर्जन बेटावर जाण्यासारखे वाटते).
सकाळी ९ वा.ची मुलाखत होती अन मी तिथे ८.३० ला पोहचलो. मुसळधार पाऊस सुरु होता, इमारतीबाहेर उभे राहण्यासाठी काही व्यवस्था नसल्याने छत्री असूनही अर्धे शरीर भिजून गेले होते. बाहेर लॉकरविषयी चौकशी केली पण इथे लॉकर उपलब्ध नाही असे ऐकायला मिळाले. आता मोबाईल ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला. आतमध्ये मुलाखतीसाठी गेलेल्या लोकांचे काही नातेवाईक बाहेर उभे होते त्यांना मोबाईल ठेवण्याची विनंती केली पण त्यांना लागलीच निघायचे असल्याने त्यांनी नकार दिला. मुलाखतीसाठी आत जाण्याची वेळ जवळ येत होती अन मोबाईल ची व्यवस्था होत नव्हती त्यामुळे मनाची घालमेल होत होती.
दूर सायकलवर चहा विकणाऱ्या एका फेरीवाल्याकडे माझी नजर गेली, त्याच्याकडे जाऊन मी मोबाईल ठेवण्याची विंनती केली पण त्याने नकार दिला परंतु लांब उभ्या असलेल्या एका मारुती ८०० कारकडे बोट दाखवून तिथे जाऊन विचारायला सांगितले. मी तिथे जाऊन चौकशी केली तर लक्षात आले कि ती कार एक फिरते लॉकर बनवले गेले होते. बाहेर त्याचा एक माणूस लोकांमध्ये फिरून माझ्यासारखे गिर्हाईक आणण्याचे काम करीत होता. प्रत्येकी २०० रुपये घेऊन त्यातील एक मनुष्य एका पिशवीत आपले सामान ठेऊन एका वहीत सामान ठेवणार्याचे नाव व मोबाईल क्रमांक लिहून घेत होता. मी माझा मोबाईल व गाडीची चावी पिशवीत घालून त्याच्याकडे दिली व नाव व मोबाईल क्रमांक त्याला सांगितला. त्याने मला एक टोकन दिले व सामान परत घेतेवेळी ते टोकन परत करावयास सांगितले. त्याच्या त्या छोट्याश्या कारमध्ये सकाळच्या २ तासात सामानाच्या जवळजवळ ५० पिशव्या ठेवलेल्या आढळल्या व अजून अख्खा दिवस मुलाखतीसाठी लोक येणे बाकी होते.
मी मनातल्या मनात हिशोब केला कि दिवसाला ह्याच्या गाडीत जर कमीत कमी ५० पिशव्या सामान ठेवण्यासाठी येत असतील तर ५० पिशव्या गुणिले प्रत्येकी २०० रु. प्रमाणे दिवसाची कमाई रुपये १०००० होती तीही गाडी न चालवता. महिन्याचा हिशोब केला तर २६ दिवस गुणिले प्रतिदिन १०००० रुपये म्हणजे जवळपास अडीच लाखाच्या आसपास त्या गाडीची उलाढाल होती. ३ लाखाची मारुती ८०० गाडी महिन्याला कुणाला अडीच लाख कमावून देत असेल ह्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण ज्याच्याकडे डोके आहे अन जो लोकांच्या गरजेचे रुपांतर आपल्या व्यवसायात करू शकतो त्याला मुंबईत पैसे कमावणे कठीण नाही हे मला त्या अनुभवातून शिकायला मिळाले. माझा हा अनुभव आपल्यालाही काही शिकवून जाईल म्हणून हा प्रपंच. बाकी कुणाची मारुती ८०० गाडी निकालात काढायची असेल तर धंद्याचा विचार करायला हरकत नाही.
मी 'मोठ्या' आनंदाच्या शोधात मरत राहिलो !!
स्टेशन वर उभ्या असलेल्या त्या दोन तरुणांत संवाद चालू होता. मी बाजूलाच उभा असल्याने ऐकायला येत होते. एकाच्या पगारात घसघशीत महिना ५०० रुपयाची वाढ झाली होती. त्या ५०० रुपयाच्या वाढीने त्याच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता, तर दुसऱ्याने नालासोपारा पूर्वेला २०० चौरस फुटाची स्वतःची खोली घेतली होती. ती खोली किती ऐसपैस आहे, अन पाण्याचा सुद्धा कसा जास्त त्रास नाही, हे तो मोठ्या अभिमानाने दुसऱ्याला सांगत होता.
5०० रुपयाच्या पगार वाढीने सुखावणारी अन २०० चौरस फुटाच्या घरात आनंद घेणारी ही माणसे आपल्या सारख्या अनेक लोकांना बरेच काही शिकवून जातात. २००० चौरस फुटाचे बंगले, ऐसपैस अंगण, बटन दाबताच विहिरीतून २४ तास घरात येणारे पाणी अन आपल्याचं लोकांमध्ये जगण्याचं ऐश्वर्य अशा सुखसुविधा असणारी तशी आपण भाग्यवान परंतु 'अतृप्त' अन 'असमाधानी' माणसे, खंर म्हटलं तर स्टेशनवरील त्या दोन तरुणांपेक्षा मानसिक अन भावनिक दृष्ट्या आपण जास्त 'गरीब' म्हणून त्यांच्या बोलण्यातील श्रीमंती आपल्या वाट्याला येत नाही. अशी माणसे भेटतात म्हणून आयुष्यावर बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेणारी अन देणारी ही माणसे म्हणून हेवा वाटावा अशीच !! ते 'छोट्या' दुनियेत आनंद घेत, जगून गेले, मी 'मोठ्या' आनंदाच्या शोधात मरत राहिलो !!
5०० रुपयाच्या पगार वाढीने सुखावणारी अन २०० चौरस फुटाच्या घरात आनंद घेणारी ही माणसे आपल्या सारख्या अनेक लोकांना बरेच काही शिकवून जातात. २००० चौरस फुटाचे बंगले, ऐसपैस अंगण, बटन दाबताच विहिरीतून २४ तास घरात येणारे पाणी अन आपल्याचं लोकांमध्ये जगण्याचं ऐश्वर्य अशा सुखसुविधा असणारी तशी आपण भाग्यवान परंतु 'अतृप्त' अन 'असमाधानी' माणसे, खंर म्हटलं तर स्टेशनवरील त्या दोन तरुणांपेक्षा मानसिक अन भावनिक दृष्ट्या आपण जास्त 'गरीब' म्हणून त्यांच्या बोलण्यातील श्रीमंती आपल्या वाट्याला येत नाही. अशी माणसे भेटतात म्हणून आयुष्यावर बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेणारी अन देणारी ही माणसे म्हणून हेवा वाटावा अशीच !! ते 'छोट्या' दुनियेत आनंद घेत, जगून गेले, मी 'मोठ्या' आनंदाच्या शोधात मरत राहिलो !!
Subscribe to:
Posts (Atom)