Thursday, February 20, 2014

आठव ते भुकेले डोळे


आठव ते भुकेले डोळे

लग्नाचा हंगाम सुरू होतोय…पंगती बसतील….जेवणावळी उठतील…

रांगेच्या दबावाला बळी पडून ….तू गरजेपेक्षा जास्त प्लेट भरशील ….

आठव जमेल तर…एक भुकेला चेहरा….कुठे तरी अन्नाच्या दाण्यासाठी रडणारा…

तुझी 3 वर्षाची लाडकी लेक….आग्रह करेल 'Seperete' प्लेट ची…

तिच्या प्रेमा खातर….तुही भरून देशील तिला….तिला न झेपणार ताट…

जमेल तर आठव ते भुकेले डोळे…रस्त्याकडेच्या दुर्दैवी बालकांचे….अर्धपोटी रडणारे…

डोकरा -डोकरीला प्लेट नेऊन देणे….चांगला रिवाज आहे आपला….नक्कीच पाठवावी प्लेट त्याना प्रेमापोटी…

पण डबा भरताना…..उगाच चेपु नकोस डब्यात…त्याच्या खाण्याच्या मर्यादेपलीकडे….

जमलं तर आठव… स्टेशन च्या पायरीवर झोपलेली ती अभागी म्हातरी….मातीमय झालेला पाव खाणारी.…

तुला ही येत असतील अनेक निमंत्रने ….एक दिवस, एक वेळ……अन 4-5 ठिकाणी जाणे…..

माहिताय एकाच ठिकाणी जेऊ शकतो आपण…..त्यातला त्यात चांगल्या अन श्रीमंत घरचा फर्स्ट प्रेफरेन्स…

जमेल तर सांगू शकशील का निमंत्रण घेताना….visit करेल रे तुमच्या घरी….पण जेवायला नाही थांबणार…

मला माहीत आहे…कविता करणं सोप आहे….स्पष्ट तोंडावर नाही म्हणणे … जरा कठीण आहे….

तू काय अन मी काय….तुडुंब भरलेली आपली पोटं …तृप्त अन फलद्रूप झालेली….

पण ते आहेत भुकेले…अभागी जीव….भुकेने विव्हळणारे…

अर्धी प्लेट डस्टबिन मधे उलटी करण्यापूर्वी….गारजेपेक्षा जास्त प्लेट भरण्यापूर्वी…

जमेल तर आठव ते भुकेले अभागी चेहरे….!!


Soyrik


आपल्या समाजात उच्चशिक्षण घेतलेल्या मुलीचे प्रमाण वाढत चालले आहे, त्यामानाने उच्चशिक्षण घेणारे तरुण जास्त नाही. तरुणाच्या संघटनेत काम करीत असल्याने व अनेक तरुणांशी चांगला संपर्क असल्याने अनेक तरुण उच्चशिक्षित मुलीचे पालक त्यांच्या मुलीसाठी उच्चशिक्षित तरुणाचे नाव सुचवण्यास सांगतात अन किमान पात्रता म्हणून किमान मुली इतका शिकलेला, रुबाबदार, उंचीने तिच्यापेक्षा जास्त अन चांगल्या घरातील असल्याची अपेक्षा करतात व त्याच प्रमाणे विशिष्ट parish मधील असावा अशी भौगोलिक मर्यादा घालतात. पालकांनी आपल्या मुलीसाठी अशी अपेक्षा करावी ह्यात त्यांचा काही दोष नाही, कारण आपली मुली चांगल्या मुलाच्या हातात जावी, हि सर्व मात्यापित्याची अपेक्षा असते व ती रास्त आहे.

प्रश्न असा आहे कि उच्चशिक्षित मुलीच्या आपल्या जोडीदार विषयी असलेल्या निकषात बसणाऱ्या तरुणाची संख्या कमी असताना त्यांनी आपल्या निकषाबाबतीत थोडी तडजोड करावी का? म्हणजे शिक्षणाने थोडा कमी किव्हा रूप रंग अन मुलाच्या कौटुंबिक निकषाबाबतीत थोडी तडजोड करावी?. अन अशा तडजोडी करून विवाह झाल्यावर अन काही वर्षांनी नैसर्गिकरित्या संसारात साचलेपणा आल्यावर वेगळे प्रश्न उभे करतील काय?

खर म्हटलं तर मागील काही महिन्यात मी एकही पालकांना त्यांनी सांगितलेल्या निकषात बसणारा तरुण सुचवू शकलो नाही, हे मलाच चिंताजनक वाटते. मुलीनी आपल्या अनुरूप जोडीदाराकरिता अन मानसिक गरजा भागवनारा अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी प्रसंगी भौगोलिक व जात-धर्म ह्या मर्यादेच्या बाहेर जावून विचार करावा. आंतरजातीय विवाहाच्या नावाने आपल्या इथे कितीही बोटे मोडली जात असली तरी एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यासाठी अन मानसिक घुसमट टाळण्यासाठी समाजाच्या बाहेर पडण्याचा धाडशी निर्णय घेण्याची वेळ आली आहे का? माझे विचार प्रसंगी धाडशी अन समाजविरोधी वाटू शकतात परंतु वैचारिक पातळीवर हि चर्चा होणे गरजेचे आहे असे मला वाटते. आपल्याला काय वाटते?

Wednesday, February 19, 2014

येशू कितीदा...?


येशू कितीदा...?

शेजार्याना आम्ही दूर सारुनी

जाणूनबुजुन मनी वैर धरुनी

रुतुत चालले पापाचे चाक रे,

तरीही 'अजाण आम्ही तुझी लेकरे' !

तुझ्यासाठी नसे आम्हा वेळ

तुझे बलिदान, आमुचा खेळ

तुला नाकारुनी, बनूनी आम्ही राजे

गीत गाती 'तुझियासाठी जीवन माझे' !

गलबत भरले आमुच्या पापाने

कितीदा माफ केले देव बापाने

तरीही आळवीती गीत आणुनी मुखी

'सुकानु घे रे प्रभु तुझ्या हाती' !

गरजा आमुच्या देवपित्याकडे मागुनी

कायमचा राहिलास तू क्रसावर टांगुनी

आम्हाला ते काहीच ना कळले

कळले ते फक्त, 'ह्या दासाचे भाग्य उजळले' !


Malcom


माल्कम, सलाम तुझ्या जिद्दीला...
सलाम तुझ्या संघर्षाला....

तू दाखवून दिल की उडण्याची जिद्द असेल तर....
गरिबी आडवी येत नाही....

तू दाखवून दिलस की रंग नसलेल्या पत्र्याच्या घरात....
आपण स्वप्न पाहू शकतो....फुलवू शकतो...
स्वप्नाना कवेत घेउ शकतो. ...

सलाम तुझ्या पालकाना....
त्यानी दाखवून दिल...मुलांच्या पंखाना बळ देण्यासाठी....
सुशिक्षितपणा अन पैशाच्या पलिकडे काही असते....
तो असतो दुर्दम्य आशावाद....
ध्येयवादी माउलीच्या दूधातून पाजलेला...
तो असतो खांद्यावर ठेवलेला बापाचा बलदंड हात,
संघर्षासाठी विश्वास देणारा....

माल्कम, तू आमची शान आहेस, तू नव्या पिढीचा मान आहेस...
शून्यातून जग निर्माण करण्यासाठी निघालेला तू एक हिरा आहेस. ..
तू गरिबीला पडलेल, आकाशाकडे उडण्याच स्वप्न आहेस...
तू परिस्थितीशी हरलेल्या गरीब जीवांच नव जगण आहेस....

उद्या तू मिग किव्हा F16 घेउन आकाशात झेपावशील....
अन शत्रूवर तुटून पडशील तेव्हा आम्ही म्हणू....
हा आमच्या गावचा हीरो आहे...
हा आमचा हिरा आहे...
सलाम तुला माल्कम.....!!


Old House


फेसबुक वरील जुन्या घराचा हा फोटो बघुन माझे मन क्षणभर माझ्या बालपणीच्या काळात हरवून गेले. प्रशस्त असे आमचे जुने घर (बोळींज-जापके) साधारणपणे स्वातंत्र्यापूर्वी (१९४५) बांधण्यात आले होते. घराच्या पायाला असलेले मजबूत चौकोनी दगड, त्याचा दगडापासून बनवलेल्या लांब ६-७ पायरया, जमिनीपासून साधारण ४-५ फूट उंच असलेला ओटा, ओटीवर एक उखळ व त्याच्या शेजारी एक सपाट दगड, संपूर्ण सागाच्या लाकडापासून उभारण्यात आलेला नक्षीदार मुख्य दरवाजा, दरवाजाला असलेले पितळी चणीच्या आकाराचे खिळे , ओट्याच्या मध्यभागी साधारण १० फूट लांब बसण्याचा बाक, त्याच्या दोन्ही कडेला घोड्यासारखे दिसणारे दोन भाग, बाकावर लिहिलेले 'देगु चिमा मेन' हि अक्षरे, ओट्याच्या डावीला असलेला ५x ४ चा मोठा हिंदोळा, त्याच्या पोलादी सळ्या.... सगळ कस जसच्या तसं डोळयासमोर उभं राहिलं....

पावसाळ्यात शाळेतून घरी परत येत असताना घोसाळी गावातून झाडाखालून उचललेली बदामे घरी आणून ओट्यावरच्या दरवाजाच्या फटी मध्ये फोडायचो. त्या बियामधुन भुगा झालेले बदामा चे तुकडे खाण्यात येणारी मजा आजच्या 'सुक्यामेव्यात' नाही, हे निश्चित.... दरवाजा ओलांडून घरात प्रवेश केल्यानंतर २० फुटावर एक लाकडी जिना होता, त्यावरून माडीवर जाता येत असे. माडीवर प्रचंड अंधार असायचा. इथे चिंच भरलेल्या मुजी अन भात साठवायचे 'कलांगे' होते. घराच्या मागच्या बाजूला गुरांना बांधायचा गोठा होता. कधी गाय, कधी म्हैस असले काहीतरी दुभते जनावर आणि त्याचे एखादे वासरु, रेडकू तेथे बांधलेले असे. घरामागे गोठया शेजारी चुली होत्या, अंघोळीचे पाणी ह्या चुलीवर तापवले जाई. घराच्या पाठीमागे आंब्या-चिंचेची खूप झाडे होती त्यातून मिळणारे आंबे-चिंच अख्खा वर्षभर पुरत असत.

जुन घर मोडून so called ‘नवीन’ घरात आलो अस कितीही म्हटल तरी गुणात्मक पातळीवर जुन्या घराचे वैभव मार्बल-ग्रेनाईटच्या बंगल्याला येणार नाही ह्या मताशी तुम्हीही सहमत असाल. ओटीवर असलेल्या त्या उंच आणि मजबूत 'मेडी' तेव्हाच्या विशाल मनाच्या अन संघर्षातून आजची पिढी उभारणार्या आपल्या पूर्वजाच्या जणू साक्षीदारच...! जवळजवळ २० वर्षे (१९७९-१९९८) जुन्या घरात राहण्याचे मला भाग्य मिळाले. चुलीच्या जागेवर स्टोव्ह नंतर शेगडी, शेणापासून सारवलेली(?) जमीन ते कोबा, चुलीतली राखेडी ते कोलगेट, सुकं जेवण ते बिर्याणी असा प्रवास आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ह्याच घरात अनुभवयास मिळाला. जुन्या घरात जसे जेवलो, तसे पुढे आयुष्यात कुठेच मिळाले नाही. उन्हाळाच्या दिवसात अंगणात खाटेवर झोपण्याची मज्जा तर अवर्णनीय...

जुन्या घरातून बाहेर पडून माझ्या चारही काकांनी वेगवेगळे बंगले बांधले, सगळ्यात शेवटी आम्ही १९९८ ला जुन्या घरातून बाहेर पडलो अन नवीत घरात आलो. अशे आमचे जुने घर २००४ साली तोडण्यात आले. जुन्या घराचे सागाचे लाकूड आम्ही नवीन घरात फर्निचर साठी वापरले. नवल म्हणजे फर्निचर बनवणार्या सुतारांनी आयुष्यात असे सुंदर अन रंधा मारण्यास अवघड लाकूड फारच कमी पहावयास मिळाल्याचे सांगितले तेव्हा आपले पूर्वज मालाच्या दर्जा बाबतीत किती चोखंदळ होते, हे कळून चुकले.

आज जुने घर अस्तित्वात नसले तरी आमच्या जुन्या घरचा ओटा आणि पायऱ्या शिल्लक आहेत. आमच्या गावातल्या लग्नात बऱ्याच वेळेला हा ओटा रेडीमेड स्टेज म्हणून कामाला येतो. अशे जुने वैभव पाहिल्यावर आपण काय सोडून कशाच्या मागे लागलो आहोत असा प्रश्न पडतो. प्रश्नावर चिंतन केल्यास ग्लोबल जीवनाच्या भौतिक गरजावर उत्त

नोकरी करणार्या स्त्रियां.


नोकरी करणार्या स्त्रियांसाठी घर अन ऑफीस ही एक तारेची कसरत असते. त्यात आपण मुंबई पासून दूर रहात असल्याने आपण जीवघेणा लोकलचा प्रवासा करावा लागतो. दूरचा प्रवास असल्याने सकाळी लवकर उठून डबा करणे हे ही वेगळे आव्हानच.निसर्गाने प्रजनन अन संगोपणाची जबाबदारी टाकली आहे ती तर वेगळीच, त्याला पर्याय नाही.

स्त्रीने नोकरी करावी की नाही हा तिचा अन त्यांच्या कुटुंबाचा खाजगी प्रश्न आहे. एखाद्या स्त्रीला अनंत अडचणीला तोंड देऊन जर नोकरी करावी लागत असेल तर तिने हा प्रश्न स्वताला विचारला पाहिजे, की खरच ही नोकरी करणे गरजेचे आहे का? आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवून हा मनस्ताप कमी करू शकतो का?

माझ्या आईने घर सांभाळुन वडिलांच्या नोकरीवर आम्हा भावंडाना उत्तम रीतीने शिकविले अन वाढविले, आजच्या काळात बाजारातील चैनीच्या गरजामागे न धावता आपण हे करू शकू का, हा खरा प्रश्न आहे. मी अनेक तरुण मुली अशा बघितल्या आहेत की ज्यानी आपल्या घरासाठी चांगल्या नोकर्या सोडल्या आहेत. काही उदाहरणे अशी आहेत जिथे पत्नीला चांगली नोकरी असल्याने पती-पत्नीने आपल्या कामाच्या जबाबदारीची अदलाबदल केलेली आहे. ऐपत नसतानाही कर्ज काढून मोठी खरेदी करायची अन त्याचे हप्ते भरता भरता मेटाकुटीला यायचे हे खरच विचार करण्यासारखे आहे. ज्याचा त्याने विचार करावा.

जगण्यासाठी पैसे हवे असतात हे नक्की पण पैशाच्या गरजेला मर्यादा नसते. कुणाचा संसार १००००रु. मधे भागतो तर एखाद्याला लाख ही कमी पडतात. अधिक पैसे कमवण्यासाठी वेळ अन श्रम देणे कुणालाही चुकले नाही. रडून फक्त सहानभूती मिळू शकते, पण त्याने प्रश्न सुटत नाही.

एक विचित्र गूढ...'मंडे तो सनडे'!


एक विचित्र गूढ...'मंडे तो सनडे'!


****हॉम्वार: विरार-सतपला बस राती 9 वाजता विरार डेपोत ने हुटली...58 प्रवासी....बॉलींज नका....JP नगर....रातशे 11 वाजल्यात...हेलो...हेलो...कुणे ज्प नगर ने अब्राहम नाक्योर जाताना बस बगिली गा? अजून पोसली नाय अब्राहम नाक्योर....मंजे गायब जाली...बर्म्यूडा ट्राइॅंगल हारखी...कंट्रोल रूम ST बस MH 04 DN 3801 मिसिंग....



****मंगळवार: जेनि पोरे निजल्योर मस्त हिंडल्यात गप्पा मारो...रातशे 10...डेनिस मेय हिंडल्यात पोसले...फ्रिड्ज मिनसा एक Apple घेवों ये...एकदम रेडिश...अन हुरी पण हाड....ई घे Apple आणि हुरी...काप आते...हिंदोलो गावित खाओ...ट्रिंग ट्रिंग....जाला आतेस् फोन वाज्यासो होतो....जाय डेनिस कॉल रिसीव कर...पोरे उठेड्यात....डेनिस आत्मीने जाते....2 मिंटानंतर....हिंडालो हलते जोरजोरात....हिंडल्यात अक्खा रगात ....खाला हुरी पडले...जेनि दिखे नाय...Apple फिराते हिंडल्यात...रक्तावर्ती Apple श्यो आडव्यो तीडव्यो विचित्र रेषा.....अन त्यात ने दिखणारे अक्षरे ...MH 04 DN 3801 ....



****बुधवार: डॉक्टर आगारवाल...वी नीड तो ऑपरेट हिम इमीडीयेट्ली...ईट्स ब्रेन ट्यूमर...ब्रेन स्कॅनिंग हॅज़ क्लियर्ली शोड अ बिग ट्यूमर...डोन्ट वरी मिसस लोपिस, प्रे फॉर युवर हज़्बेंड....3 अवर्स आफ्टर ऑपरेशन...वॉट? ईट्स नोट ट्यूमर?...ओह माइ गोड....हाउ इस इट पासिबल? ईट्स अन Apple इन प्लेस ऑफ ट्यूमर? can't बिलिव दिस....'सॉरी मॅम....'मिस्टर. पिटर लोपिस इस नो मोर.....



****गुरुवार: अरे, गिरीज ला क्रॉस बनवयाडो दिले तो हदयासो हाय...जिम तू अन स्टीव जाय...गिरीज देवळामागे...जीसस कार्पंटर हांग बस....हा ता बघ घर...अंकल, आमचा क्रॉस रेडी हाय का...थॅंक्स...वाउ ब्लॅक क्रॉस आणि वाइट येशू क्राइस्ट...नाइस यार..बाइ द वे अंकल तुमचे नाव काय....मा नाव मी स्वर्गवासी 'मिस्टर. पिटर लोपिस......हेहेहे...ई वेडा हाय वाटते कार्पंटर...सल स्टीव..



****हुक्रवार: राजोडी ला फुटबॉल खेळ्यासी मजास वेगळी...3-1 स्कोर...मॅक, अजून 2 गोल पात ईक्वल कार्यादो...मार मॅक मार...जोरात मार किक....अरे बॉल हळू मार पाण्यात नका मारो...रात पड्या लागले हापड्यासो नाय...जाला गा कडे मारलो पाण्यात...आते थांब येदे लाटे बरोबर....कोडा टाइम 4 लाटी येवन गेल्यो....आलो आलो बग...टूक आते...अरे...ओ बॉल नाय ई का हाय...ओ माइ गोड....क्रॉस...ब्लॅक क्रॉस अन वाइट जीसस क्राइस्ट....बॉल कडे गेलो....सप्राईज..



****हिन्वार: पाटील....प्रेताला पोस्ट मॉर्टेम करता घेउन जा...बाप रे...कहा ओळख्यासो महाणु....साहेब...साहेब....हा सरकारी सेवक असावा...कशावरून पाटील....हे बघा ह्याचे कपडे...खाकी रंगाचे...बहुतेक बस चा कंडक्टर किव्हा ड्राइवर असावा....पाटील, DySp ऑफीस ला फोन लावा अन चेक करा कुणी मिसिंग आहे का मनून....साहेब, साहेब...एक मिस्सिंग केस आहे....ST बस विरार डेपोटून सुटलेली....बहुतेक त्याचाच ड्राइवर किव्हा कंडक्टर.....डॉक्टर, तुमचा पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट काय म्हणतो ?...साहेब..ह्याच्या पोटाच्या आतड्यामधे हे तुकडे सापडले....ओह माइ गॉड...ह्याने हे तुकडे खाले...विश्वास बसत नाही...साहेब कशाचे तुकडे? काय फुटबॉलचे ?....अक्खा फुटबॉल पोटात...



****आयतवार: .......जेर्री, का वाशा लाविले रे....मस्त पुस्तक हाय...गूढ कथा...मिस्टरी...हॅंग तरी का स्टोरी हाय....अरे, बो भरीस...सोमवार ते रविवार मिने विचित्र घटना घडतयात त्या गूढ रिलेशन ..मे जस्ट शनिवार पर्यंत आले...बस शा कंडक्टर शी बॉडी हापडले अन त्या पोटात फुटबॉल शे तुकडे...क्लाइमॅक्स आले स्टोरी ओ...नेक्स्ट पेज सनडे...थांब मे वाशीते ....अरे ई शेव्ट्सा पान कुणे फ़डले....ताई, क्रिस बाबू-ने पुस्तक घेतलोता गा....हा जेर्री...हातात एक पान घेवोंन फिरतोतो तिगला...बडबडतोतो...मम्मी या कागदावर फुटबॉल, बस, क्रॉस, Apple, हुरी, पोलीस...यांशे मस्त फोटो हात मनून....अन त्या मिने त्यावो पण फोटो हाय मनून.....ताई, क्रिस कडे हाय?....पपा दारी हायडे...पपा क्रिस हाय हा....नाय मला माहित नाय...बाबा-ला विसर...बाबा, क्रिस हाय हा तुमशा दरी...नाय मला माहित नाय...का जाला पोर हाप डे नाय गा का...बी कुणा बरोबर जासा नाय पोर....क्रिस...क्रिस...क्रिस....देवा परमेश्वरा कडशा कडे मायारा आली, पोर घालवला वाटाते.


सचिन मेंडीस 

मला भिती वाटते...…


मला भिती वाटते...…

खरच मला टू व्हिल्लर चालवणार्या बाईची भिती वाटते...…

कारण तिचा नेम नसतो …

ब्रेक दाबायचा तेव्हा ती अक्सिलेटर दाबते अन अक्सिलेटर च्या वेळेला ब्रेक…

का कुणाच माहित, तिला कळत नसेल का?

गाडी थांबवण्यासाठी जमिनीला पाय घसण्याची गरज नसते ….त्या करिता गाडीला ब्रेक असतो ….

मग तिथेच ती फसते अन आपल्याला फसवते ….

म्हणून मला टू व्हिल्लर चालवणार्या बाईची भिती वाटते...…

टर्न कसा न घ्यावा हे तिच्याकडून शिकाव ….

ती राइट चा सिग्नल देते पण गाडी लेफ्ट ला वळवते ….

मग काय …. मग तिथेच ती फसते अन आपल्याला फसवते ….

म्हणून मला टू व्हिल्लर चालवणार्या बाईची भिती वाटते...…

नील आर्मस्ट्रॉंग भासवा तशी ती गाडीवर सजते …

काय तो सन सूट, ती टोपी तो गॉगल ….जणू चंद्रावर निघाल्याचा भास देते

मी 30 च्या वेगात जात असताना ती सूसाट बाजूने कट मारून निघते ….

मग तिथेच ती फसते अन आपल्याला फसवते ….

म्हणून मला टू व्हिल्लर चालवणार्या बाईची भिती वाटते...…

स्पीड ब्रेकर कशाशी खातात ते तिला माहित नसते …

ब्रेकर वरून गाडी आपटली तर मनातच हसते ….

अन हसता हसता बाई रस्ता सोडते …

मग तिथेच ती फसते अन आपल्याला फसवते ….

म्हणून मला टू व्हिल्लर चालवणार्या बाईची भिती वाटते...…

सचिन मेंडिस

कुपारी म्हणून जगण....!!


कुपारी म्हणून जगण....!!

आवडलं मला...एका दिवसापुरता म्हणून का होईना कुपारी म्हणून जगण...

आवडलं मला...माझ्या हरवलेल्या हक्काच्या पारंपारिक वस्तूचा न वास्तूचा शोध....

आवडलं मला...काळाच्या पडद्याआड हरवलेल्या लाल टोपी अन लुगड्याच एका दिवसा करिता का असेना गुलाबासारख फुलंन.....

दिंडीत उठून दिसणारा कावड घेवून येणारा कॉर्पोरेट तरुण...आवडला मला...अन बैल गाडीवर बसलेले पूजनीय धर्मगुरू...भावून गेले मनाला...

किती सुंदर दिसत होते ते लहानगे पारंपारिक पोशाखात...जणू जुने दिवस पुन्हा जन्म घेत आहेत ह्या क्षणात....

जून घर कौलारू...तो ओटा तो झोपाळा....सगळ काही ३ तासाच्या छोट्या विश्वात भारावून सोडणार... आवडला मला.

आवडला मला तो रहाट...इतिहासात थांबलेला पण घटकाभर आम्हासाठी धावणारा....आमच्या हरवलेल्या क्षणाला गती देणारा...

आवडली मला वालाची भाजी, तलनाची रोटी, फुगे, खपच्या, मोराचे लाडू, पुहू, रेवाळ अन अनेक गायब झालेले चविष्ट माझे तुमचे आपले घरगुती पंचपक्वाने...जिभेवर पाणी आणणारे....

आवडलं मला...एका दिवसापुरता म्हणून का होईना कुपारी म्हणून जगण...

रोज शक्य नसलं तरीही एक दिवस मला जगायचं आहे कुपारी म्हणून...'येला तू गाये' गीत ऐकत झोपी जायचं आहे....एक दिवसा साठी तरी...

पूर्ण दिवस काम करून मी थकलो नाही...अन थकणार हि नाही...हा माझा समाज आहे अन तो मला टिकवायचा आहे...एकीने मिळून मिसळून बांधून ठेवायचा आहे.

सचिन मेंडीस

खरचं आपण लग्न सोहळे एन्जोय करतो का?


खरचं आपण लग्न सोहळे एन्जोय करतो का?

थंडीचे तीन महिने म्हणजे आपले कुपारी लोकांच्या लग्नाचा हंगाम. विरार गाडीत जशी चेपून गर्दी असते तशी सर्व लग्ने ह्या ३ महिन्यात चेपून भरलेली असतात. त्यातल्या त्यात नोवेंबर मध्ये पावसाने एक दोघांना दगा दिल्याने बरीच मंडळी त्या महिन्यावर भरवसा ठेवत नाही. मग साहजिकच डिसेंबर अन जानेवारी मध्ये खच्चून लग्ने पुढ्यात येतात. घरात शोकेस मध्ये आमंत्रण पत्रिकेचा नुसता सडा पडलेला असतो. लहानपणी आमंत्रण पत्रिकेची वाट पाहणारे मन आजकाल ह्या पत्रिकेचा धसका घेते.

एकाच वेळेला ३-४ लग्ने, एक आगाशीला दुसरे उमराळे अन तिसरे निर्मळ म्हणजे तारेवरची कसरत. गाडी उचलायची अन तिन्ही ठिकाणी विजीट करायची. नक्की म्हणजे काय करतो आपण तर पहिले आहेराच्या रांगेत उभे राहयचे अन १० सेकंदाकरिता आपले तोंड वधू-वरांना दाखवायचे अन मग जेवणाच्या रांगेत प्रस्थान करायचे. तिकडे तास भर मेहनत करून मग दुसर्या ठिकाणी पळायचे. जीवाचे हाल नुसते. जो काही आनंद जुन्या काळात मिळायचा त्याचा लवलेश हि कुठे नाही. तसेच जेवणातले वेगळे वेगळे मसाले खाऊन शरीराची होणारी हानी तर वेगळीच.

मग मन विचार करते, खरचं आपण लग्न सोहळे एन्जोय करतो का? रविवारचा सुट्टीचा म्हणजे आरामाचा दिवस अशा पळापळी मध्ये निघून जातो अन सोमवार आ वासून पुढे येतो.
काही ठिकाणी एकत्र कार्यक्रम केल्याने वरील गोष्टी बर्याच प्रकारे टाळता आल्या, ते कौतुकास्पद आहे पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. सगळेच सोहळे असे 'Common Reception' अपेक्षित करणे, हे काल्पनिक ठरेल.

तूर्तास गाडी उचला अन पळा एकीकडून दुसरीकडे !

एक अल्लड काव्य.... 


एक अल्लड काव्य....

अशीच ठेव तू पाठ मोकळी
सुखावती गोरी कांती कोवळी !

खुणावती आडून तीळ साजरा
हलकेच सार बाजूसी गजरा
हिरव्या शालूत भासशी आगळी
अशीच ठेव तू पाठ मोकळी
सुखावती गोरी कांती कोवळी !

बट केसांचे ओघळती पाठी
शृंगार स्पर्श लाविती ओठी
यौवनात भासे गुलाब पाकळी
अशीच ठेव तू पाठ मोकळी
सुखावती गोरी कांती कोवळी !

किरणे पडता पाठ चमकती
रसिक पुरुषी तिथे नेत्र थबकती
सांभाळ बया तुझी साडी चोळी
पण अशीच ठेव तू पाठ मोकळी
सुखावती आम्हा गोरी कांती कोवळी !

Dosti


एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते?

वरील वाक्य आपण बरयाच वेळा ऐकले असेल किंबहुना आपल्या ग्रुपमध्ये ह्या विषयावर अनेकदा चर्चा सुद्धा केली असेल. बदलत्या काळात जेव्हा हातातील मोबाईलद्वारे आपण क्षणात एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीशी संपर्क करू शकतो तेव्हा अशा विषयावर मोकळी चर्चा जरुरी वाटते. आपण एका मोठ्या समाजाचे भाग आहोत अन इच्छा असूनही भिन्नलिंगी व्यक्ती मधील निखळ नात्याचे स्वागत करायचे पुरोगामित्व आपल्याकडे नाही, ज्याला समाजाची पुर्व्ग्रहित मानसिकता तसेच कामधंदा नसलेल्या टवाळखोर मंडळीची निंदानालस्ती तितकीच कारणीभूत आहे. काही वेळेला इच्छा असूनही अशी मैत्री सामाजिक संकेतांत बसत नसल्याने आवश्यक मोकळेपणा दिसत नाही. अलीकडेच इंटरनेट वर ह्या विषयावर एक ब्लॉग वाचण्यात आला ज्याचा एक भाग खाली देत आहे जो ह्याविषयावर सविस्तर प्रकाश टाकू शकेल.
--------------------------------------------------------
"पुरूषाची मैत्रीण म्हटलं की आपल्याकडे थोडं सावरून बसायची पद्धत आहे. शंभर एक वर्षांपूर्वी 'मैत्रीण' हार्ट अ‍ॅटॅक देत असेल. आता फक्त सावरून बसण्यापर्यंत आलो आहोत हे एक चांगलंच. शिवाय आज विशीतली बरीच (सगळी नव्हे) मुलं-मुली मैत्री, आकर्षण, लैंगिकता याबाबतीत पुष्कळच 'सुलझे हुए' आहेत, अधिक थेटपणे या गोष्टींना सामोरं जात आहेत असंही मला वाटतं. किमान आजच्या अभिव्यक्तीतून, चित्रपट-नाटक, फेसबुक अशा माध्यमातून जे चित्र समोर येतंय ते तरी असं आहे. आणि ते आश्वासकही आहे. आज छत्तीस पूर्ण केलेला मी 'आमच्या वेळच्या' गोष्टी आठवतो तेव्हा मला आंतरिक पातळीवर फारसा फरक दिसत नाही, पण अभिव्यक्ती, आकलन - विशेषतः आजच्या मैत्रिणींचं मुलं आणि त्यांचं 'टेस्टॉस्टेरॉन प्रेरित' वागणं याचं आकलन - याबाबतीत मात्र फरक दिसतो.

'व्हेन हॅरी मेट सॅली' या चित्रपटातलं 'स्त्री आणि पुरूष मित्र होऊ शकत नाहीत' हे एक गाजलेलं वाक्य/विचार. ('मैने प्यार किया'मध्ये पुढे ते आपण रीतसर वापरलं.) एखादं सार्वकालिक सत्य किंवा सत्यांश असावा असं वाटायला लावणारा हा विचार पुढे पुष्कळच चर्चिला गेला. हे सार्वकालिक सत्य आहे का याबाबतीत मी ठाम नसलो तरी हॅरीचं पुढचं म्हणणं मला पटतं. सॅली त्याला 'का' असं विचारते तेव्हा तो म्हणतो की 'द सेक्स पार्ट ऑल्वेज गेट्स इन द वे'. मला ते पटतं कारण 'सेक्स पार्ट'चा अर्थ कायम लैंगिक भूक असा असत नाही. तीही असू शकते पण स्त्री आणि पुरूषामधलं 'सेक्शुअल टेंशन' अतिसूक्ष्म, अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म स्वरूपात का होईना जागं असतं. दोन मित्रात किंवा दोन मैत्रीणीत (ते समलिंगी नसतील तर) ते असत नाही. 'दृष्टी' चित्रपटात हा विचार 'स्त्री और पुरूष के बीच हमेशा एक उत्तेजना रहती है' अशा, आशयाच्या अधिक जवळ जाणाऱ्या समर्पक शब्दांत येतो. या उत्तेजनेला एक आदिम परिमाण, योग्य-अयोग्यच्या पलीकडे असा एक विस्तृत अर्थ आहे. स्त्री-पुरूष मैत्रीमधलं ते एक परिमाण आहेच असं मला वाटतं. अर्थात हे सगळं मान्य करूनही दोघांमधल्या निखळ मैत्रीची, ती मैत्री वर्षानुवर्षे टिकल्याची उदाहरणे सापडतील. ऑन-ऑफ होणारा 'लिंगभाव' गृहीत धरून मैत्रभाव चांगला आकार घेऊ शकतोच."
--------------------------------------------------------------------
मोकळी चर्चा होईल असा हा विषय नाही, परंतु नव्या विचाराच्या सुशिक्षित पिढीचे मत जाणून घ्यायला नक्की आवडेल.

'जुने ते सोने अन नवे ते हवे'....!


पूर्वी रहाटाचे पाणी पाटातून शेतीकडे जायचे अन मुलांना खेळायला एक नैसर्गिक खेळणे मिळायचे. आता न राहिले रहाट अन पाण्याचे पाट. सुदैवाने आमचे घर वाडीत असल्याने कधीतरी मोटर पंपाचे पाणी अंगणातल्या पाटातून वाहते अन माझ्या लेकीचा मुक्काम पाटातील पाण्याकडे वळतो. जो आनंद महागडी खेळणी अन आधुनिक गेम पार्क देऊ शकत नाहीत तो आनंद पाटातील पाण्याचे तुषार माझ्या अंगावर उडवताना तिला मिळून जातो. अन तिच्या चेहऱ्यावरील ओसंडणार्या आनंदातून मी माझे बालपण जगतो.

छोट्या छोट्या नैसर्गिक गोष्टीतून मिळणारा आनंद घेण्याचे सोडून आपण उगाच महागड्या भौतिक गोष्टीच्या मागे धावत असल्याचे शल्य वाटते पण तूर्तास 'जुने ते सोने अन नवे ते हवे'....!

पाटाचे पाणी नितळ, वाहती माझ्या अंगणी
लेकीच्या हास्यात गवसली, माझी हरवलेली खेळणी !!

सचिन मेंडीस

ओढ घराची....!!


ओढ घराची....!!

मावळती झाली कि मुंबई मध्ये असलेला जीव घरच्या ओढीने कासावीस होतो. मुंबई तशी मायावी नगरी, स्वप्ने दाखवणारी अन ती फुलवणारी पण आपल्याला बुवा संध्याकाळ झाली कि परतीचे वेध लागतात.

मग जी मिळेल ती गाडी त्यात कोंबून मन परतीच्या वाटेला लागते. भाईंदर सोडले अन वसईच्या खाडीवरून गाडी विरार दिशेने निघाली कि वातावरणातील बदल जाणवू लागतो. वसईच्या हवेचा गारवा अन डोळ्याला दिसणारा निसर्गरम्य परिसर गर्दीत गुदमरलेल्या जीवाला स्वर्गीय आनंद देतो.

मन विचार करते काय जादू आहे ह्या वसईची, माझ्या तुमच्या गावाची, आपली माती आपली माणसे किती ओढ लावतात. बिछान्यावर गेल्यावर खिडकीतून दिसणारा अन नारळाच्या झावळी मागे लपणारा चंद्र, पक्षांचा किलबिलाट अन मुलांना गोष्टी सांगताना येणारी ती सुखाची शांत झोप. किती अवर्णनीय...!!

काही अपरिहार्य कारणामुळे आपले भाऊबंद मुंबईला राहायला जरी गेलेले असले ,तरी त्यांचे डोळे शनिवार-रविवारची वाट पाहत असतात, आपल्या गावच्या मातीचा सुगंध घेण्यासाठी अन घरच्या लोकांच्या मायेची उब अनुभवण्यासाठी...!!

Baandi...!!


'बांडी' भाजायची म्हटलं कि तोंडाला पाणी सुटते. मातीच्या मडक्यात भाजलेल्या पदार्थाची चवच न्यारी. कोवळ्या वालाच्या शेंगा, मसाला भरलेली बटाटे, गावठी कोंबड्यांची अंडी, चिकन किंव्हा डुकराचे मटन अशा स्वादिष्ट पदार्थाने बनलेली 'बांडी' खाणे हे तर खंर भाग्याचं.

काल आमच्या मामाकडे 'गेट टुगेदर' होते. मामाच्या सर्व मुली व माझी आई आम्ही सर्वजण कुटुंबासकट जमलो होतो अन जेवणासाठी बेत होता फक्त 'बांडीचा'. बच्चेकंपनी मिळून आम्ही २४ जण होतो अन एकूण ५ बांड्या. आमच्या ८८ वर्षीय आजीसह आम्ही वेगळ्या पद्धतीने 'बांडी' पार्टी एन्जोय केली. लहान मुले ह्या प्रकाराबद्दल अनभिद्न्य होते पण भाजलेल्या पदार्थावर ते अक्षरशः तुटून पडले. भाजलेली बांडी उघडताना त्यातून येणारी वाफ अन भाजलेल्या स्वादिष्ट पदार्थाचा सुगंध तर अवर्णनीयचं.

बांडी भाजण्यासाठी मातीची भांडे जमवण्यापासून ते जाळण्यासाठी लागणारी लाकडे, झावळ्या अन इतर पालापाचोळा जमा करणे हे एक कसरतीचे काम, परंतु मेहनतीतून मिळणाऱ्या फळाची चवच इतकी भन्नाट कि मेहनतीची तक्रार कुणालाच नाही. एक मात्र खंर, बांडी गरजेपेक्षा जास्त भाजून आतील पदार्थाचा कोळसा होवू नये म्हणून अनुभवी माणसाकडून वेळोवेळी बांडीवर पाणी शिंपडून आतील पदार्थाचा अंदाज घेतला जातो. ते काम आमच्या तात्यांनी परफेक्ट केले.

बांडी ह्या कल्पनेचा जनक कोण ते माहित नाही, पण साल्याने काय सॉलिड डिश दिली आहे आपल्या समाजाला. सलाम बांडीच्या प्रणेत्याला अन त्याचा आनंद घेणाऱ्या कुपारी जिभेला!

सचिन मेंडीस

बयशी सय !


बयशी सय !

वसईतील कुपारी समाजाला फार मोठा इतिहास आहे परंतु दुर्दैवाने तो योग्य पद्धतीने लिखित स्वरुपात जतन झालेला नाही. आपल्या जुन्या चालीरीती, गाणी, जुने संदर्भ, समाजाला कलाटणी देणाऱ्या घटना ह्या फक्त मौखिक स्वरुपात जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे हस्तांतरित झालेल्या आहेत. मागच्या एक दशकाचा आढावा घेतल्यास इंटरनेट तंत्रज्ञानाने जग जवळ आणले आहे परंतु त्या स्वरुपात जुन्या पिढीचे नव्या पिढीकडे होणारे ऐतिहासिक संदर्भाचे हस्तांतर कमी झालेले आहे.

आपल्या कडे ८०-९० वर्षाचे अनेक वडीलधारी मंडळी आहेत, हि मंडळी जो पर्यंत ह्यात आहेत तोपर्यंतच जुना इतिहास त्यांच्याबरोबर राहील. पण पुढे काय?. ह्या वडीलधारी मंडळीकडून बरीच माहिती आपण जमवून येणाऱ्या पिढीसाठी लिखित किव्हा ध्वनीमुद्रित स्वरुपात आपण साठवून ठेवू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील वातावरण, तेव्हाची शेती, राहणीमान, लग्नसोहळे, दुष्काळ, रोगराई, भुताखेताच्या गोष्टी असा अनेक माहितीचा खजाना आपण त्यांच्याकडून मिळवू शकतो.

सदर गोष्टीचा विचार करता मी व रॉजर रोड्रिग्ज Roger Baptista Rodrigues ह्याने पुढाकार घेवून आपल्या विविध गावातील ८०-९० वरील लाल लुगडे परिधान करणाऱ्या 'बय' च्या मुलाखती घेण्याचे ठरविले आहे. सदर मुलाखत विडीओ रेकोर्डिंग करून सोशल मिडियाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल व पुढे जावून सगळ्या मुलाखती पुस्तक रुपात आपल्या पुढे आणल्या जातील. ह्या कामी आर्थिक सहाय्य कबुल केल्याबद्दल TEAM SVS चे मी विशेष आभार मानतो.

आपल्या सर्वाना विनंती आहे कि मुलाखती दरम्यान विचारले जाणारे प्रश्न कसे असावेत जेणेकरून जास्तीत जास्त माहिती आपण गोळा करू शकू, ह्या संबंधात आपण आपले विचार इथे मांडावेत. त्याच प्रमाणे ह्या प्रकल्पात सहाय्य करू इच्छिणार्यांनी आपली नावे मला कळवावीत.

कवी लिहितो कविता


कवी लिहितो कविता
गावातील देवळाच्या बाजारू वृत्तीवर...
अन लेखणीने टोचतो सहजपणे, दानांच्या बदल्यात मागणाऱ्याना,
आणि न चुकता करवून आणतो त्यांचीच, परदेशातील भूमीची तीर्थयात्रा !

तो सोडून गेलेल्या तिच्यासाठी.....!!


तो सोडून गेलेल्या तिच्यासाठी.....!!

सर्वच गोष्टी बोलायच्या नसतात...
काही शोधायच्या असतात....
मंद वारयाच्या झुळुकीमध्ये ....
आवाज शोधायचा असतो त्याचा....टप टप बरसणाऱ्या पावसाच्या थेम्बामधे..
सुगंध ही त्याला असतो ग ....रातराणीच्या फुलातून तो हुंगायचा असतो.....
त्याचा स्पर्श...वेडे....देतो ना तो...कुडकुडणाररया थंडीत...
बोचरा असतो....पण हवा हवासा...
तो नसेल तुझ्या अवतीभवती शरीराने....
पण निसर्गाच्या माध्यमाने तो तुला भेटत राहील.....
डोळे बंद कर अन घे त्याला श्वासात....हृदयात....
हा हृदयात येईल तुझ्या तो....थेट...
अन विरघळून जाईल तुझ्यात कायमचा....एकरूप..एकजीव..
अन जगेल तो त्याचा अकाली गेलेला जीव तुझ्या विरहाच्या स्पंदनात !!

बोळींज सोपारा रस्ता मृत्यूचा मार्ग.

बोळींज सोपारा रस्ता मृत्यूचा मार्ग.

बोळींज सोपारा हा वसईतील अतिशय वर्दळीचा मार्ग आहे. विरार वरून सोपारा कडे जायचे असल्यास पश्चिम भागातून ह्या रस्त्याशिवाय पर्याय नाही. महापौर म्यारेथोन मुले ह्या रस्त्याची चांगलीच डागडुजी होते व रस्ता नेहमीच चकचकीत असतो. परंतु हा रस्ता अरुंद असल्याने व ‘धूम’ पद्धतीने वेगाची नशा चढलेल्या बाइक स्वारामुळे हा रस्ता अपघातग्रस्त रस्ता म्हणून प्रसिद्ध झाला आहे.मागच्या काही वर्षात ह्या मार्गावर मोठ्या संख्येने अपघात होवून ८-१० जीवांचे बळी गेले आहेत तर ४०-५० लोकांना मोठ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले आहे. भरीस म्हणून काय अवैध्य पाणी तस्करी करणारे अनेक Tanker   ह्या मार्गावर पोलिसांच्या डोळ्यादेखत उभे असतात अन वाहतुकीला त्रास देतात, त्याच प्रमाणे Reliance  कंपनीने आपल्या तारा टाकण्यासाठी अतिशय चुकीच्या पद्धतीने खड्डे खोदुन रस्त्याच्या एका बाजूची दुर्दशा करून टाकली आहे. सदर सर्व प्रकार वेळो वेळी विविध सरकारी अधिकाऱ्यांच्या कानी घालून कोणत्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत झाली नाही पर्यायाने अपघाताची संख्या लक्षणीय रित्या वाढली आहे.



आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने महानगरपालिका अन पोलिस प्रशासनाला तातडीने खालील उपाययोजना करण्याचे आवाहन करीत आहोत.



१) दर रस्ता अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करावे अन टप्प्या टप्प्यावर सुरक्षा फलक लावावेत.

२) वेगात गाडी हाकणाऱ्या धूमवीरावर कारवाई करावी जेणेकरून योग्य तो संदेश दिला जाईल.

३) विरार आगाशी मार्गावर जसे गतिरोधक टाकण्यात आले आहेत, तसे शक्य तिथे अन पुरसे  गतिरोधक बसवावेत.

४) Reliance कंपनीकडून पूर्ण रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी, ते जर शक्य नसेल तर सदर कंपनीची Bank  Guarntee जप्त करून पालिकेने स्वत दुरुस्ती करावी.

५) रस्त्यात उभे असलेले Tanker जप्त करावेत अन 'Maharashtra underground  Water  Act ' नुसार सदर वाहतुकीवर बंदी घालावी.

६) बोळींज सोपारा पूर्ण रस्त्यावर पुरेशा दिवाबत्तीची सोय करावी.

७) शक्य झाल्यास रस्ते सुरक्षा विभागाकडून ह्या रस्त्याचे सुरक्षा ऑडीट करून घ्यावे व अधिक तांत्रिक उपाययोजना कराव्यात.

सदर कामात दिरंगाई केल्यास भविष्यात होणार्या अपघाताचे पाप पालिका अन पोलिस प्रशासनाने स्वताच्या खांद्यावर घ्यावे अन जनतेच्या रोषास सामोरे जावे.

सचिन मेंडीस - बोळींज

माझा हरवलेला गाव.

कुपारी संस्कृती

कुपारी समाजातील एक दोन मुलींनी आंतरजातीय (बिगर-कुपारी) तरुणाशी विवाह विवाह केल्याने कुपारी संस्कृतीवर आघात झाल्याची व्यर्थ ओरड सध्या Facebook chya व्यासपीठावरून चालू आहे. त्या उद्देशाने काही मुद्दे इथे मांडावे वाटतात. मुळात कुपारी संस्कृती अस्त होण्याची कारणे हि मोठ्या प्रमाणात बोली भाषा मागे पडणे, पेहराव अन आहार बदलणे, कुटुंब आत्मकेंद्री होणे अन ग्लोबल वातावरणाचा समाज एक भाग होवून जाणे हि आहेत. इंग्रजी माध्यमाचा वापर, उच्च शिक्षण,कॉर्पोरेट सेक्टर मधील नोकरीचे वातावरण, स्त्रियांचे नोकरीमधील वाढते प्रमाण तसेच इंटरनेटमुळे जगाशी वाढलेला संपर्क हि झपाट्याने संस्कृती iबदलण्यासाठी उत्प्रेरके ठरली आहेत.

कौलारू घरे जाऊन बंगले येणे, रहाटाची चित्रे बनून भिंतीवर टांगणे, लग्नसमारंभात गावकर्यांचा सहभाग कमी होवून प्रोफ़ेस्सिओनल मंडळी येणे , घरगुती पक्वनाऐवजी सणाला रेडीमेड केक येणे अन धोतर-लुगडे हा पेहराव जाऊन शर्ट जीन्स चा मोठ्या प्रमाणात वापर होणे हि संस्कृती बदलाची व्यापक चिन्हे झाली. १-२%आंतरजातीय विवाहामुळे संस्कृती अस्ताला जात नाही. जेव्हा मोठ्या प्रमाणात गुजराती, मारवाडी, ब्राह्मण, मद्रासी मुली आपल्या येथे विवाह करून आयुष्य घालवतील तेव्हा ' आंतरजातीय लग्न' ह्या मुद्य्यामुळे कुपारी संस्कृतीचा चेहरामोहरा बदलेल असे मला वाटते.

लग्न हि खाजगी बाब आहे, कुणी कुणाबरोबर आणि कसे नाते जोडावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ह्या खाजगी बाबीला समाजाशी जोडणे योग्य होणार नाही. आपल्या समाजात होणारी लग्ने अन संसार सगळे चांगले अन आंतरजातीय वाईट हे सुद्धा संयुक्तिक नाही. लग्न करणे ह्या पेक्षा चांगल्या रीतीने संसार करणे, आपल्या जोडीदाराला सन्मानाने वागवणे हे महत्वाचे...तसेच ज्या व्यक्तीच्या जडणघड्निशी आपला काही संबंध नाही त्यावर हक्काने मतप्रदर्शन करणे मला गैर वाटते. काळ बदलत चालला आहे, ज्या प्रमाणे आपले राहणीमान, आहार, वेशभूषा बदलत जात आहे त्याच प्रमाणे ह्या ग्लोबल वातावरणात नातेसंबंध सुद्धा वेगळ्या रूपाने समोर येतील. त्यांना गुणदोषासकट स्वीकारणे हेच खरे. उगाच एखाद्या खाजगी विषयाला सामाजिक स्वरूप देवून एखाद्या व्यक्ती किव्हा कुटुंबाची जाहीर अवहेलना नको.

आपल्या समाजातील मुला-मुलीनी समाजातील व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड करावी हि भावना आदर्श आहे. मुळात आंतर-जातीय विवाह हे सो कॉल्ड निरोप पाठवून केले जात नाही. म्हणजे कुपार्याच्या पोराने कोकणस्थ ब्राह्मण मुलीला मागणी घालून लग्न जमवणे वैगरे. आंतर-जातीय विवाह हे ९०% प्रेमविवाह आहेत. कॉलेज, ऑफिस, प्रवासाच्या जागा इथे ओळखी होऊन नंतर प्रेम होणे अन पुढे जाऊन त्याचे विवाहात रुपांतर होणे हा सर्वसाधारण अशा विवाहाचा साचा असतो. राहिलेले १०% मंडळी समाजात कुणी जोडीदार मिळत नसल्याने नाईलाजास्तव इतर जातीत विवाह करतात, पण हे प्रमाण तसे खूप कमीच...

इथे चर्चा करून आपण ह्या गोष्टी टाळू शकत नाही. कुणी, कुठे, कसे, प्रेम करेल ते आपल्या हातात नाही अन नसावं ही..... योग्य वेळी पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार कसा असावा आणि त्यांच्या मुलाकडून काय अपेक्षा आहेत त्याची स्पष्ट जाणीव करून दिली तर अतिउत्तम....अन हो, जर कुणी प्रेमात पडून चांगल्या सुशिक्षित, सुसंकृत जोडीदाराची निवड केली असेल तर पालकांनीही मोठ्या मनाने त्यांना सामावून घ्याव. शेवटी सुखी जीवन जगणे महत्वाचे....फक्त कुपारी समाजात जगणे महत्वाचे नाही.....जर तस असलं असत, तर आपल्या समाजात सगळ्यांचेच संसार बहरले असते.

संस्कृतीमध्ये काळारूपाने बदल होत जाणे अपरिहार्य आहे. आपली कुपारी संस्कृती जतन झाली पाहिजे हे जरी मान्य केले तरी त्या मध्ये साचलेपण येणार नाही ह्याची सुद्धा काळजी आपण घ्यायला हवी. संस्कृती, मग ती कुठलीही असो, आसपासच्या अनेक संस्कृतीमधले रिवाज आपल्यात सामावून घेत पुढे जाते त्यामुळेच टिकते. संस्कृती बदलते पण नष्ट होत नाही. संस्कृती ही प्रवाही असली पाहिजे. अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणे हा स्थायी भाव आहे. काळाच्या उदरात काय गडप होईल हे सांगता येत नाही. येणाऱ्या काळात व्यवहारात जी भाषा, पेहराव व चालीरीती जास्त वापरल्या जातील तीच संस्कृती बनणार आहे आणि टिकणार, हे मान्य करावयास हवे. कालाय तस्मै नम:

(हा लेख लिहिण्यासाठी इंटरनेटवरून अनेक लेखाचे संदर्भ घेतले आहेत.)

Ek Baai nighun jate


एक 'बाई' निघून जाते तेव्हा एक 'आई' निघून जाते…
रोज सायंकाळी गाणारी एक 'अंगाई' निघून जाते…

तिची रडणारी इवलीशी लेकरे काळीज फाडून टाकतात…
देव बाप्पाकडे न येणारी आई परत मागतात…
'तो' उभा असतो सुन्न…
तिच्या निपचित देहाकडे पाहत…
क्षणभरात कित्येक आठवणींना चाळत…
त्या दुर्दैवी संसाराची 'सावली' निघून जते…
एक 'बाई' निघून जाते तेव्हा एक 'आई' निघून जाते…
रोज सायंकाळी गाणारी एक 'अंगाई' निघून जाते…

तिच्या शोकाकुल आईचा आकांत…
घुमत असतो आसमंतात…
आणि खिन्न बापाचा हुंदका अडकून असतो श्वासात…
आपल्या तरुण लेकीचे शव त्यांना जिवंतपणी निर्जीव करते…
एक 'बाई' निघून जाते तेव्हा एक 'आई' निघून जाते…
रोज सायंकाळी गाणारी एक 'अंगाई' निघून जाते…

घर होत सुन….
सुन होतं मन…
डोळ्यात अश्रूंची साठवण ….
अन हृदयात न पुसणारी आठवण….
एक 'बाई' निघून जाते तेव्हा एक 'आई' निघून जाते
रोज सायंकाळी गाणारी एक 'अंगाई' निघून जाते

पुन्हा होईल पहाट…
सुरु राहील जगरहाट…
पण एक घर, एक दार…
तिची आतुरतेने पाहील वाट…
एक बाई…
एक आई ….
एक अंगाई…
येईल का परतुनि….?

कुपारी लगीन....!

कुपारी लगीन....!!


एक दिवस लग्नाचे आमंत्रण येत...
मंत्रण देणारा गोड हसत आमंत्रण देतो...
माझ्या जाण्यावाचून लग्न होणार नाही अस उगाचच वाटत...

घरात कोल्ड ड्रिंक नसतानाही ती ऑफर करण्याची मी रिस्क घेतो...
त्याला तशी घाई असतेच, माझीही फॉर्मलिटी पुर्ण होते.....
पायरी उतरताना तो BMC मधील बिशाचे घर विचारून घेतो....
बिशा घरीच असेल हे मी खात्रीने सांगतो.

ते निघून गेल्यावर मम्मी विकेपिडिया सुरु करते......
त्याची मुलगी माझ्या मावशीच्या, आतेच्या, नणंदेच्या, भाच्याला दिल्याची
जवळची ओळख देते......
माझ्या तात्याच्या नॉलेज मधे अमूल्य भर पडते.....

लग्नाचा दिवस उगवतो...
ठरल्या प्रमाणे मी आहेरची वही चाळतो...
१०० चा आकडा पाहून मनोमन  सुखावतो...
मी १०० रुपयाची परतफेड १५० रुपयाने करतो.
सुट्टे मिळतात पण नेहमीप्रमाणे एन्वेलप नसते...
माझा संताप होतो.

गावातील राकेशच्या पाठी बसून मी लग्न मंडप गाठतो....
दरवाजात स्वागतासाठी बहुतेक मुलीचे काका-काकी उभे असतात. ...
ट्रेन मधे चवथ्या सीटवर बसणार्या काकाला सुटात पाहून मन भरून येते.....
मला हातात हात देताना ते कॉर्नर सीट वर बसल्या सारखे हसतात....
मला VIP झाल्याचा भास होतो.

मी आहेरच्या रांगेत सरकतो....
पुन्हा एकदा एन्वेलप भरल्याची खात्री करतो.....
चार जनाना हॅंडशेक करीत मी स्टेज वर पोहोचतो......
अजून पुढे जाणार तोच समोरच जोडप फोटोसाठी उभ राहते.......
माझा पोपट होतो, उगाच सगळे माझ्या कडे पहात असल्याचा भास होतो.....

स्टेज वरून उतरणार तर काउंटर वरील लाइन सरकत मागे स्टेज पर्यंत आलेली असते.......
मी पायरी वर अडकून पडतो........
समोर ६०-७० जण रांगेत उभे असतात..........
मला घरी केलेल्या वालाच्या भाजीची तीव्रतेने आठवण येते......
फस्ट क्लास तिकिटासाठी जशी सेपरेट लाइन.....
तशी जास्त अहेर वाल्यासाठी डाइरेक्ट एंट्री अशी भुके पोटी मला कल्पना सुचते...
परंतु १५० रुपयाच्या आठवणीने मी आयडियाची कल्पना सोडून देतो......


शेवटी माझ्या मेहनतीला फळ येते.....
अन मी प्लेट पर्यंत पोहोचतो....
माझ्या ताटाखाली टिश्यू नसतो...
मग मी प्लेट बदलून इश्यू सोल्व करतो......मी पुढे डोकावतो....
माझ्या समोरील व्यक्तीच मटणातील बोळावर संशोधन चालू असते......
शेवटी तो हार मानून नळी पुरता कॉम्परो करतो.......
मी माझ्या ऐपतीप्रमाणे प्लेट सजवतो. ......
काउंटर वरील भाजी अन डाळ मला वाळीत टाकल्यासारखी वाटते.....
मी एक एक चमचा घेउन त्यांची समज करतो.....

मी प्लेट घेउन खुर्चिकडे वळतो.....
दोन रिकामी खुर्ची पैकी एक भाताने सजलेली असते.......
अन दुसरीच्या पायाखाली साक्षात एक ताट झोपलेला असतो......
मी दुसर्या बाजूला एका काकाच्या बाजूला बसतो........
काकाच्या प्लेट्मधील हिमालय पाहून माझ्या ताटातला जीवदानी ओशाळतो.......
काकाने बहुतेक अंगठी केली असेल असा मी तर्क लावतो......
रुमालाने कपाळ पुसत मी कसाबसा जेवण संपवतो.....
ताटात उरलेल्या भाजीची मला दया येते.

वॉश बेसिन शेजारी नेहमीप्रमाणे गर्दी असते,.....
मला कळायच्या आत बाजूच्या दादयची प्लेट माझ्या वाईट शर्टच हलक चुंबन घेते. ......
मी राग आवरून पुढे सरकतो...
थेंबा थेंबने पाणी हातावर घेतो.......
साबणाचे मासे मटणात बुडवून काढल्यासारखे वाटतात. .....
मी हळूच हात मागे घेतो.
अन मी त्यांचा नाद सोडून देतो......

पोट भरलेले असते पण आइसक्रीम चा मोह आवरत नाही.......
मला कुपारी असल्याचा अभिमान वाटतो.......
मी आइसक्रीम खात खात गेटपाशी येतो, ......
चवथ्या सीट वरील हास्य पुन्हा डोळ्यात साठवतो...

सकाळच एक युद्ध संपलेले असते.....
ओटीवर बसून मी रात्रीच्या युद्धाची तयारी सुरु करतो...
तेवढयात एक अजून लग्नाचे आमंत्रण येत...
अन पुन्हा... (Sachin Mendes)

खारी...!!

खारी...!!

कुणाला वाटेल खारी हा काही लेखनाचा विषय होऊ शकत नाही. कालपर्यंत मलाही तसं वाटत होते पण काल ट्रेनमध्ये 'प्रेमाची गोष्ट' चित्रपट बघत असताना चित्रपटाचा नायक अतुल कुलकर्णी चहामध्ये 'खारी' बुडवून खाताना बघितला अन 'खारी' मध्ये मला लिखाणाचा विषय सापडला.

लहानपणापासून आपल्या सर्वांची खारीबरोबर दोस्ती आहे. त्यातल्या त्यात जीरा खारी आपल्याला लय भारी वाटते. पूर्वीपासून गावात येणारे पाववाले खारी घेऊन यायचे नंतर तांब्या-पितळीच्या वस्तूच्या बदल्यात बेकरी पदार्थ देणारे विक्रेते खारी घेऊन दारोदारी येऊ लागले. आता नाक्यावरील दुकानावर पिशवीबंद केलेल्या लोकल अन नामांकित कंपनीच्या 'खारी' मिळतात.

तेव्हाच्या काळात बहुतेक लोकांची ऐपत पाव घेण्याची असायची त्यामुळे रोज खारी खाण्याचे भाग्य थोड्याच श्रीमंत लोकांना मिळायचं. घरी कुणी आजारी असल्यास किव्हा पाहुणे मंडळी आल्यास खारी आणली जायची पण तिचा मान ग्लुकोजच्या बिस्कीटनंतरच. शाळेत असतना काही धड्यामध्ये अमुकाने 'खारीचा वाटा उचलला' असा उल्लेख असायचा तेव्हा वाटायचं साल्या ह्या माणसाने सर्वात जास्त खारी खाल्ली असणार, आज त्या गोष्टी आठवल्या कि स्वतःचे हसू येते.

चहाशिवाय खारी म्हणजे थंडी नसलेला ख्रिसमस. चहा नसेल तर खारीला बिलकुल मजा नाही. गरम गरम चहामध्ये फुगलेल्या खारीचा तुकडा बुडवायचा अन हळूच तोंडात खारी कोंबायची.  नरम अन गरम झालेली वेगवेगळ्या पापुद्र्याची खारी जीभीवर चाखताना मजाच अवर्णनीय! कधी कधी चहात बुडवलेली खारी धोका द्यायची, अर्धी हातात तर अर्धी चहात बुडी मारायची. चहा गरम असल्याने बोट घालून बुडलेली खारी काढायला त्रास व्हायचा अन मग चहा थंड होईपर्यंत वाट पहावी लागायची. जीराखारी बुडवून खात असताना खारीवरील जीरा सुटून चहाच्या पृष्ठभागावर तरंगत राहायचा ज्यामुळे चहाचे सौदर्य विद्रूप व्हायचं. शेवटी चहा थोडा थंड झाल्यावर पीत असताना तळाशी राहिलेली व नरम झालेली खारी तोंडात यायची अन हरवलेले कोकरू सापडल्याचा आनंद व्हायचा. काही वेळेला चहा संपूनही काही नरम खारी तळाला राहायची जी नंतर बोटाने कपामधून खरवडून काढली जायची.

बालपण मागे सरून आता मोठे झालो असलो तरीही खारीची दोस्ती सुटली नाही. दुनिया बदलली तशी खारीनेही आपल रूप अन चंव बदलली. साध्याची मस्का, जीरा, तिखट अशी चव तर रूपामध्ये बो टाय सारखी ट्विस्ट केलेली किव्हा साखर पेरलेली घोड्याच्या नालेच्या आकाराची खारी आता घरी यायला लागली. आजारी माणसाला खारी अन लेमनची बाटली दिल्याने त्याच्या प्रकृतीमध्ये काय सुधारणा घडते हे मला अजून न सुटलेले कोडे आहे. खारीवर हे एक ललित लिहून आपल्या समाजावतीने तिला धन्यवाद देण्यात मी 'खारीचा वाटा' उचलला ह्यात मला आनंद वाटतो.

सचिन मेंडीस       

डोळस आंधळे !

डोळस आंधळे !!

मागच्या आठवड्याची गोष्ट. जोगेश्वरी स्टेशनला जिन्यावरून खाली उतरत होतो इतक्यात एक आंधळा व्यक्ती प्लेटफॉर्म कडे जाताना दिसली. हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जाण्याचे ठिकाण विचारले. त्याला चर्चगेट स्लो पकडून लोअर परळला उतरायचे होते व तिथून कॉलेज गाठायचे होते. आम्ही निश्चित जागी पोहचलो. मलाही अंधेरी डाऊन जायचे होते अन गाडीला वेळ होता म्हणून मी त्याची चौकशी सुरु केली. तो जन्माने आंधळा नव्हता पण एका अपघाताने त्याचे डोळे निकामी झाले होते. आता सध्या तो अंधांच्या कॉलेज मध्ये जात होता.

इतक्यात गाडी आली अन मी त्याला म्हटले 'तुझी चर्चगेट गाडी आली', तर तो उत्तरला 'हि चर्चगेट फास्ट आहे, मला स्लो पकडायची आहे'. मी आश्चर्याने त्याला विचारले 'तुला कसे ठाऊक?'. तर तो हसत म्हणाला 'Anouncement झाली ना आता'. खर सांगितलं तर मी काही ती ऐकली नव्हती, कारण माझे डोळे Indicator पाहू शकत होते. मी त्याला म्हटलं कमाल आहे बुवा तुमची. तर तो म्हणाला, 'दादा आता आमचे कान आणि नाक हेच आमचे डोळे'. आम्ही वासावरून अन आवाजावरून सर्व गोष्टीचा अंदाज घेतो. रस्त्यावर कितीही रहदारी असली तरी वाहनांच्या आवाजाने आम्हाला रस्ता पार कसा करावा ते कळते. मी स्तब्ध झालो. इतक्यात गाडी आली अन मी त्याला म्हटले 'तुझी चर्चगेट गाडी आली', तर तो उत्तरला 'हि चर्चगेट फास्ट आहे,'anouncement झाली ना आता'. मी Indicator बघितले अन माझी मलाच लाज वाटली. मी आंधळ्या व्यक्तीला मदत करायला निघालो होतो पण मी किती अपंग आहे याची जाणीव मला होऊ लागली होती.

शेवटी मी त्याला विचारले 'भाऊ, कधी अपघात होण्याची भीती नाही का वाटत?'. तर तो ताबडतोब बोलला 'दादा, आजपर्यंत रेल्वे अपघातात कधी आंधळा मेल्याचं ऐकलं आहे?, मरतात ते सगळे डोळे असून आंधळे बनलेले लोक'. मला थोबाडीत बसल्यासारखे झाले. त्याच्या हातातील काठीची जागा चुकीची वाटू लागली. त्याने मला बाय करून नुकताच आलेल्या चर्चगेट स्लो मध्ये बसून तो निघून गेला, मी सुन्न झालो. मी स्टेशन वर नजर टाकली. कान असलेल बहिरे अन डोळे असलेले आंधळे मला स्टेशन वर सर्वत्र दिसू लागले अन मला त्या आंधळ्या व्यक्तीच्या ताकतीची अन आपल्या अपंगत्वाची जाणीव झाली.

सचिन मेंडीस

डोळस आंधळे !

डोळस आंधळे !!

मागच्या आठवड्याची गोष्ट. जोगेश्वरी स्टेशनला जिन्यावरून खाली उतरत होतो इतक्यात एक आंधळा व्यक्ती प्लेटफॉर्म कडे जाताना दिसली. हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला जाण्याचे ठिकाण विचारले. त्याला चर्चगेट स्लो पकडून लोअर परळला उतरायचे होते व तिथून कॉलेज गाठायचे होते. आम्ही निश्चित जागी पोहचलो. मलाही अंधेरी डाऊन जायचे होते अन गाडीला वेळ होता म्हणून मी त्याची चौकशी सुरु केली. तो जन्माने आंधळा नव्हता पण एका अपघाताने त्याचे डोळे निकामी झाले होते. आता सध्या तो अंधांच्या कॉलेज मध्ये जात होता.

इतक्यात गाडी आली अन मी त्याला म्हटले 'तुझी चर्चगेट गाडी आली', तर तो उत्तरला 'हि चर्चगेट फास्ट आहे, मला स्लो पकडायची आहे'. मी आश्चर्याने त्याला विचारले 'तुला कसे ठाऊक?'. तर तो हसत म्हणाला 'Anouncement झाली ना आता'. खर सांगितलं तर मी काही ती ऐकली नव्हती, कारण माझे डोळे Indicator पाहू शकत होते. मी त्याला म्हटलं कमाल आहे बुवा तुमची. तर तो म्हणाला, 'दादा आता आमचे कान आणि नाक हेच आमचे डोळे'. आम्ही वासावरून अन आवाजावरून सर्व गोष्टीचा अंदाज घेतो. रस्त्यावर कितीही रहदारी असली तरी वाहनांच्या आवाजाने आम्हाला रस्ता पार कसा करावा ते कळते. मी स्तब्ध झालो. इतक्यात गाडी आली अन मी त्याला म्हटले 'तुझी चर्चगेट गाडी आली', तर तो उत्तरला 'हि चर्चगेट फास्ट आहे,'anouncement झाली ना आता'. मी Indicator बघितले अन माझी मलाच लाज वाटली. मी आंधळ्या व्यक्तीला मदत करायला निघालो होतो पण मी किती अपंग आहे याची जाणीव मला होऊ लागली होती.

शेवटी मी त्याला विचारले 'भाऊ, कधी अपघात होण्याची भीती नाही का वाटत?'. तर तो ताबडतोब बोलला 'दादा, आजपर्यंत रेल्वे अपघातात कधी आंधळा मेल्याचं ऐकलं आहे?, मरतात ते सगळे डोळे असून आंधळे बनलेले लोक'. मला थोबाडीत बसल्यासारखे झाले. त्याच्या हातातील काठीची जागा चुकीची वाटू लागली. त्याने मला बाय करून नुकताच आलेल्या चर्चगेट स्लो मध्ये बसून तो निघून गेला, मी सुन्न झालो. मी स्टेशन वर नजर टाकली. कान असलेल बहिरे अन डोळे असलेले आंधळे मला स्टेशन वर सर्वत्र दिसू लागले अन मला त्या आंधळ्या व्यक्तीच्या ताकतीची अन आपल्या अपंगत्वाची जाणीव झाली.

सचिन मेंडीस

Chimni


शिमनी !

चिमणी ह्या छोट्या पाखराबद्दल मला प्रचंड सहानभुती आहे. हा इवलासा जीव बालपणापासून माझ्या आठवणीच्या आभाळात उडत आलेला आहे. 'मुगले मुगले नास लो' ह्या बालगीतात 'शिम्न्यो रांडो पलाल्यो' असा तिचा उल्लेख आहे. त्या गाण्यापासून चिमणीला मी व आपण सगळेच ओळखत आलेलो आहात. चिमणी सारख्या निरागस जीवाला 'रांडेची' उपमा का दिली हे मोठे कोडेच आहे अन मला नेहमीच ते खटकते. ह्या एकतर्फी आरोपाबद्दल मी गाणं लिहिणाऱ्या कवीचा मनोमन धिक्कार करतो व जाहीरपणे त्याला चिमणीच्या व्यभिचाराचे पुरावे सादर करण्याचे आव्हान करतो.

लहानपणी आपले घर भरून चिवचिवनाऱ्या ह्या चिमण्या काळाच्या ओघात आज आपल्यापासून दूर गेल्या आहेत. का असेल बरे? जुन्या कौलारू घरात आपली घरटी बनवणारी अन आपल्या ताटातील जेवण जेवणारी हि पाखरे कुठे हरवली असतील? लहानपणी एखाद्या चिमणीच घरट जपण्यासाठी घरातील मंडळी किती काळजी घेत असू. किती जवळचे होतो आपण त्यांना. कौलारू घरांत त्यांना आपलेपणा वाटायचा बहुतेक. त्या घरांना, त्यातील आतील माणसांच्या स्वभावाला त्यांचे निरागस जिने अन काड्यांचे घरटे शोभत असे.

कधी शंका येते मला, त्यांनी आपल्यावर बहिष्कार टाकल्याची. नव्या चकचकीत बंगल्यातून आपण त्यांना हाकलून दिल्या पासून त्या येत नाहीत आपल्या गावात. बहुतेक त्यांचे घरटे आपल्या मार्बलच्या घरांत 'कचरा' म्हणून टोचू लागल्या पासून त्या निघून गेल्या आहेत दूर मायेच्या माणसांमध्ये राहायला. आपण हि सोडून दिलंय त्यांना साद घालण्याचे. आता आपण 'चिऊताई'च्या नावाने लेकरांना घास भरवत नाही, त्यासाठी आपण 'क्रिश' किव्हा 'छोटा भीम' आणलाय घरांत. तसेच आधुनिक जगातील मोबाइल विद्युत लहरींनी मोडून टाकलंय त्यांच्या इवल्याश्या जगण्याला. माणसांशी संवाद साधणाऱ्या ह्या कृत्रिम मोबाइलनी चिवचिवनाऱ्या जीवाशी असलेला संवाद तोडून टाकलंय आपला.

कधी शांतपणे ओटीवर बसून जुने अंगण आठवू लागलो कि चिमण्यांचे गीत कानी गुजु घालते. पण त्या गीतात मिळणाऱ्या स्वर्गीय आनंदाची जागा आज अपराधीपणाने घेतली आहे. गुन्हेगार आहे मी तिचा अन माझे लोक. हुसकावून टाकलंय आम्ही तिला आमच्या गावातून अन आमच्या आठवणीतून. 'या चिमण्यानो, परत फिरा रे' अशी साद घालण्याची शरम वाटते मला.जमलं तर या तुम्ही चिमण्यानो, आमच्या आठवणीच्या गावात, छोटीशी काडी दातात घेऊन. देईल तुम्हाला मी हक्काची जागा घरटे बांधण्यासाठी माझ्या आठवणीच्या गावात, बदल्यात हवी आहे मला तुमची जीवाकाळजाची चिवचिव, पुन्हा नाते जोडण्यासाठी!

सचिन मेंडीस

क्षणभराची प्रेयसी...!!

क्षणभराची प्रेयसी...!!

जोगेश्वरी वरुन अंधेरी डाउन ट्रेन पकडली...बसून मस्त प्रवास होणार
होता....गाडी अपेक्षे प्रमाणे प्लॅटफॉर्म 2 ला जाऊन स्थिरावली...अंधेरी
वरुन सुटण्यास गाडीला 5 मिनिटे अवकाश होता. सहज म्हणून प्लॅटफॉर्म 1 वर
लक्ष गेले. एक सुंदर तरुण मुलगी बोरीवली ट्रेन साठी उभी होती. विवाहित
पुरुषाने तरुण मुली-ला पाहायला आपल्याकडे कायदेशीर बंदी नसल्याने मलाही
कायदेशीर व नैतिक दृष्टीने अयोग्य वाटल नाही.

मी तिच्याकडे पाहत असताना तिचेही माझ्याकडे लक्ष गेले. मी न पहिल्या
सारखे करून मान फिरवली अन तिनेही....पुन्हा 5-10 सेकंदाने तिच्याकडे लक्ष
गेले अन सुखद योगायोग म्हणजे तिचीही नजर माझ्याकडे वळली....पुन्हा एकदा
नजरा नजर....अन त्याच दरम्यान बोरीवली गाडी प्लॅटफॉर्म 1 ला लागली आणि
आमच्यात नजर संकट कोसळले. आता ही बया बोरीवली लोकलसाठी थांबलेली अन गाडी
प्लॅटफॉर्म वर म्हणजे क्षणभराच नेत्रसुख गाडीसंगे निघून जाणार....
प्लॅटफॉर्म 1 वरुन तिची गाडी निघाली....का कुणास ठाऊक, मनात विचार
आला...कोण कुठली ती...काय सबंध तिचा...थांबेल का ती प्लॅटफॉर्म वर एक
स्मित हास्य देण्यासाठी...काहीतरीच हा विचार...का बर थांबणार ती....सचिन
मेंडीसला स्माइल देण्यासाठी....वेडा विचार....गाडीचा शेवटचा डब्बा पास
झाला....मी क्षणभर मिटलेले डोळे उघडले अन प्लॅटफॉर्म 1 वर नजर
टाकली...अरे देवा ...ती तिथेच उभी होती....त्याच जागेवर....बाप रे, हे कस
काय शक्य आहे....पुन्हा नजरा-नजर झाली.....अन पुन्हा मानेची  फिरवा
फिरव.. जसे आमच्या गावीच नाही....

क्षणभर डोक्यात टिक टिक वाजली...अन धड धड वाढली ठोक्यात....माझया विरार
गाडीने होर्न दिला अन गाडी जागेवरून हलली.....तिला जाणवल बहुतेक
ते....पुन्हा तिची नजर वळली अन निरोपाचे एक स्मित-हास्य तिच्या
चेहऱ्यावरून ओघळले.....प्राजक्त फुलावा तसा चेहरा फुलला तिचा...5
मिनिटाचे नाते...कोण..कुठली...कस...काय.......क्षणभराची प्रेयसी
म्हणू तिला....अजूनही टिक टिक वाजते डोक्यात....

घरी येऊन अर्धांगिनीला हा प्रसंग सांगितला....तर तिने डोक्याला हात मारला
अन प्रेमाने म्हणाली....सचिन साहेब, ही 'दुनियादारी' बंद करा....अन
उद्यापासून डाउन ला जाऊ नका...उगाच लाइफ मध्ये अप-डाऊन नको आता.

sugandhit Athvani

सुगंध अन संगीत ह्या मानवी मनाला वेड लावणाऱ्या गोष्टी. चांगला सुगंध अन चांगले संगीत मन प्रफ़ुलित करते. प्रत्येक व्यक्तीच्या भूतकाळाशी, सरून गेलेल्या आठवणीशी सुगंधाचे व संगीताचे एक अनामिक नाते असते. एक विशिष्ट संगीत किव्हा एका विशिष्ट गोष्टीचा सुगंध थेट मनाला भूतकाळच्या प्रसंगाकडे घेऊन जातो अन काळाच्या वाऱ्यासंगे विझून गेलेल्या आठवणीच्या समयी उजळून निघतात.

गावातली गावठी बदामे, लालबुंद झालेली. कधीतरी हातात घेऊन हुंगून पहा. कोणती आठवण देतात? शाळेत असताना घोसाळी गावातील मित्राने पिशवी भरून आणलेली बदामे. पावसाळ्यात चिंब भिजलेली, त्याचा वर्गभर पसरलेला गंध. आठवतो का? मग त्या बदामाशी जोडलेल्या आठवणी. तिच्यासाठी राखून ठेवलेली मोठी टपोरी बदामे, बदामाच्या रसाने लाल झालेला शर्टचा वरचा खिसा अन नंतर घरी जाऊन दाराच्या फटीमध्ये बदामाची बी ठेवून त्यातून काढलेला बदामाचा पांढरा गर. आठवले असेल ना?  एका बदामाच्या वासाचा सुगंध किती आठवणी फुलवतो, मनाला झुलवतो! कधी घेऊन बघा नवीन वही किव्हा पुस्तकाचा गंध...काय आठवते? अख्खी शाळा उभी राहते त्या गंधात. रातराणी तर माझी प्रेयसी आहे, तिचा सुगंध मादक वाटतो. शाळा संपून कॉलेज मध्ये प्रवेश घेत असताना मुलीविषयी वाटणारं सुप्त आकर्षण अन चांदण्या रात्रीच्या सोबतीला त्या गोड विचारात वातावरण मोहरून टाकणारी फुललेली रातराणी. कधी रातराणीचा सुगंध आला तर थेट तिचीच आठवण निघते. ते अल्लड दिवस, ती हुरहूर सगळ कसं डोळ्यासमोर गंधाळते. क्षणभर ती हसल्याचा भास होतो.

जसं सुगंधाच तसंच संगीताच. संगीत म्हणजे गाणी, विशेष करून जुनी गाणी. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एखादे गाणी ओठी रुळते अन ते थेट त्या काळाशी विणले जाते. 'सून सायबा सून, प्यार कि धून'  हे गाणे अजूनही कधी कानी आले, कि मी थेट बालपणीच्या काळात लग्नाच्या शुक्रवारच्या दिवसात पोहचतो. मांडवाच्या दिवसाआधी भोंगा लावून मोठ्या सीडीवर हे गाणे वाजवले जाई अन मग हक्काचे 'तोहफा तोहफा लाया लाया' हे गाणे धाकट्या भावासारखे पाठी वाजे. हि गाणी आजही ऐकली कि डोळ्यासमोर हरवलेला गाव सापडतो. ती पताके, नारळाच्या पात्यापसून बनवलेले डेकोरेशन, भेरलीच्या झाडाच्या लांब दोऱ्या अन मांडवाला लावलेले झिरो बल्ब डोळ्यासमोर चमकतात. १९९४ साली माझ्या दहावीच्या सेंड- ऑफ च्या वेळी आम्ही LD रिसोर्तला गेलो होतो अन त्या वेळी तिथे 'डर' चित्रपटातील 'जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन' हे गाणे वाजवले जात होते. आज कधी FM वर हे गाणे कानी पडले कि दहावीच्या सेंड- ऑफची अन न मिळालेल्या किरण ची प्रकर्षाने जाणीव होते. देवळातील गाणी तर खूप मन प्रसन्न करतात. ते निरागस दिवस अन तेव्हा आपला वाटणारा देव ह्याच्याशी संवाद घडवून आणतात. 'रूपवंत फुले' हे गीत आजही ऐकले कि मावलीच्या सणाच्या दिवसात, तिच्या चरणी वाहण्यासाठी शेतीवाडीतून गोळा केलेली फुले मनात फुलतात. तो इवलासा रुमाल, त्यात गच्चुन दाबलेली गोंडाळे अन अबोलीची फुले सरकन आठवणीच्या रुमालातून हृदयात डोकावतात.    

प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या भूतकाळाशी, सरून गेलेल्या आठवणीशी सुगंधाचे व संगीताचे एक अनामिक नाते असते. एक विशिष्ट संगीत किव्हा एका विशिष्ट गोष्टीचा सुगंध थेट मनाला भूतकाळच्या प्रसंगाकडे घेऊन जातो अन आपल्या बाबतीत हि ते खरे असेल. तुमच्या आठवणीतील फुले अन गाण्याच्या ओळी वेगळ्या असतील पण मनाला वाटणारा सुखद आनंद मात्र नक्कीच सारखा असेल. अजून बऱ्याच गोष्टीचा उळेक्ख करता येईल पण तूर्तास आज इतकंच. एक छान कल्पना डोक्यात फुललीय...येत्या शनिवारी रात्रीच्या प्रहरी जेव्हा जेवल्यानंतर पायपीट होईल, तेव्हा गावातील वेशीवर असलेल्या रातराणीच्या फुलाला हुंगत मोबाईलवर 'जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन' हे गाणे ऐकायचं पुन्हा पुन्हा अन तिचा  चेहरा पुन्हा आठवायचा. कशी छान हसेल ती, पूर्वीसारखी..!!

सचिन मेंडीस