Thursday, August 4, 2016

अवयवदान

देहाचा प्रवास अंतिमत: राखेकडे जातो असं चिंतन अनेक वर्ष झालं आपण ऐकतोय, मानतोय. 'माती असशी मातीस मिळशी' ह्या भावनेने देहाचं अंतिम सत्य राख हे आपल्या विचारात पुरेपुर भिनलंय. देहाच्या भौतिक सुखासाठी आत्म्याशी तडजोड करू नये, हा विचार उदात्त जरी असला तरी बदलत्या काळात देहातून श्वास निघून गेल्यावर देहाची माती व्हावी, हे चिंतन चिंता वाढवणार आहे. दहन किंवा दफन करून मृत शरीराची माती करण्याऐवजी अवयवदानाने अनेक अभागी जीवनात नवा श्वास फुंकण्याची आज सोय झालेली आहे. लोक प्रबोधन वेग घेतयं. मग अजूनही 'देहाचा प्रवास राखेकडे' ह्या चिंतनाऐवजी एका देहाचा प्रवास दुसर्या देहाकडे असं नवं चिंतन का होऊ नये?

देहाची राख होत होती, होत आहे परंतु देहाचा राखेच्या दिशेचा प्रवास आता थांबायला हवा. देह मातीमोल होतो, शेवटी राख होते, हे असत्य आहे. देहातून प्राण निघून गेल्यावरही अचेतन देह अनेकांत प्राण फुंकू शकतो, हेच शाश्वत सत्य आहे.

सचिन मेंडिस

तू म्हणजे

तू
म्हणजे,
काटेरी मुकुट
अंगभर खिळे
भाल्याच्या जखमा
विद्रूप देह
खडतर वाट
कोसळणं अन उठणं
कालवारीचं दु:खणं
क्षमा करणं

आम्ही
म्हणजे,
स्मार्टफोन
ब्रँडेड अँक्सेसरीज
सजलेले मुखवटे
चमचमीत भोजन
वातानुकुलीन कवच
तक्रार अन असमाधान
अहंकार; स्पर्धा

तू निर्मल
आम्ही गढूळ
तू अमर्याद
आम्ही क्षणभंगुर !

                                          सचिन मेंडिस

आभाळमाया

आभाळमाया

मान वर करून आभाळाकडे पाहीले. चांदण्यांचे थवे आभाळावर अलगदपणे विहार करत होते. चंद्र दिसत नव्हता. बहुतेक ढगाआड विश्रांती घेत असावां. तरीही त्याची श्वेत काया ढगाआडून शुभ्र प्रकाशाची मंद फुंकर मारत होती. किती विलोभनीय सौंदर्य आभाळांच. अवघ्या धरतीला कवेत घेणारं. आभाळमाया म्हणतात ती हीच असेल का?

किती दिवसानंतर आभाळाकडे पाहीलं होतं, तेही इतकं प्रेमाने. सवडीने आभाळाकडे पाहायचं विसरून गेलोय आपण. आपण म्हणजे आपली अख्खी नवी पिढीचं. आम्ही त्या नवीन पिढीतले थोडे वयस्कर. आभाळाला पारखे झालोयं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. आजकाल मोबाईलमुळे मान वर करण्याची सवयचं सुटुन गेलीयं. तेच कारण असावं, पण ते एकमेव कारणही नसावं.

चिंता कुणाला नाहीत? राजापासून रंकापर्यत अन दिल्लीपासून गल्लीपर्यत सगळेचं जीव चिंतेचं गाठोडं घेऊन जगतांयत. प्रत्येकाच्या चिंतेचं वर्तुळ गरजांच्या त्रिज्येवर अवलंबून. जगण्याची अशी सोपी भूमिती.
पदोपदी चिंता वाहणारी नवी पिढी. दुर्भाग्य म्हणजे आईवडिलांच्या कुशीत शिरून चिंता हलक्या कराव्या तर कुठलंस अनामिक अवघडलेपणं आलेलं. मोठे झाल्याची किंमत म्हणा पाहीजे तर. अशा वेळी आभाळाचा आधार घ्यावा का? विसरून गेलोयं आपण. नीरव शांततेत गाव अंगावर झोपेची चादर ओढत असताना आपण आभाळाच्या स्वाधीन व्हायचं. किती अनुपम,अलौकीक, अतुल्य आभाळ. बघत बसायचं आभाळाचं अमर्याद रूप. बोलायचं त्याच्याशी. एक मूक संवाद. आभाळांच्या लेकरांचा त्याच्या आईशी. सांगावं आभाळाला आपलं दुखणं-खुपणं. चुका कबूल कराव्या. मन हलकं करावं. मागावं त्याच्याकडुन आपलं अडलेलं मागणं. आभाळाची ओंजळ भरलेलीचं असते. आपल्याला देण्यासाठी. आपण मात्र दुरावलेले असतो, आभाळमायेपासून. खरचं तुटलीयं का आपली नाळ आभाळापासून?
चंद्र ढगाआडून बाहेर आलायं. चांदण्याचा सडा अंगणी सजलाय, तोही न मागता. चंद्र खुणावतोयं आपल्याला. आभाळाबरोबर तुटलेली नाळ जोडण्यासाठी, तो साद घालतोयं. आभाळ वाट पाहतेयं आपली. त्याच्या ओंजळीतून आपली ओंजळ आभाळमायेने भरण्यासाठी. गरज आहे एका नजरेची, आभाळाकडे लागलेली.

सचिन मेंडिस

गर्दीतले एकटेपण !

गर्दीतले एकटेपण !

तुडुंब भरलेले रस्ते;
उतु जाणाऱ्या गाड्या
अन
एकटे चालणारे असंख्य चेहरे.

प्रत्येकजण धावतोय;
कशाच्यातरी मागे
स्वताला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात
दमवून घेतोय,
आयुष्यातील अनमोल क्षणाला

गर्दीच्या ह्या दुनियेत;
फक्त अंतर वाढत राहते.
कशासाठी धावतोय, कुठे पोहोचतोय;
कळेपर्यंत, अंतर वाढलेलं असत;
अन आयुष्य संपलेलं असतं.

जे सोबत होते;
ते एक तर पुढे गेलेले असतात;
नाहीतर राहिलेले असतात खूपच मागे,
मागे राहिलेल्या नात्यांसारखे.

मग जो तो करतो;
केविलवाणा प्रयत्न,
एकटेपणावर उत्तर शोधण्याचा.
खरंतर नाती असूनही नसतात;
असते ते आपले
गर्दीतले एकटेपण !

हा ख्रिस्ती मूल्यांचा विजय !

हा ख्रिस्ती मूल्यांचा विजय !

लोकसत्ताचे बुध्दिमान संपादक श्री. गिरीश कुबेर ह्यांनी १७ मार्चच्या संपादकीयामध्ये आदरणीय मदर तेरेजा विरोधात खालच्या पातळीवर जाऊन अश्लाघ्य टीका केली. मदर तेरेजा ह्यांनी सेवेच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मांतरे केली असे आरोप करून त्या मानवतेच्या माऊलीला व तिच्या निस्वार्थ सेवेला बदनाम करण्याचा प्रयत्न कुबेर महाशयांनी केला. खरतर मदर ह्या कुणा विशिष्ट धर्मीयांच्या आई नव्हत्या तर समस्त अनाथांच्या माता होत्या. इतर धर्मियांच्या देव देवता किव्हा आदरणीय व्यक्तीबाबत असे घडले असते, तर कदाचित टोकाची हिंसक प्रतिक्रिया उमटली असती. इतिहासात असे घडले आहे. संतप्त लोक रस्त्यावर उतरून त्यांनी हिंसक आंदोलनाने जाळपोळ करून आपला रोष व्यक्त केला आहे. पण आपण असे केले नाही. आपली ख्रिस्ती मुल्ये अशा विरोधाला परवानगी देत नाही. किंबहुना धर्मापेक्षा थोडे जास्त आपण देशहिताला प्राधान्य देतो. कायदा हातात घेत नाही, अन काल आपण घेतलाही नाही.

आपण विचाराची लढाई विचाराने लढली. फक्त लढली नाही तर जिंकलीही. लोकसत्ता सारख्या अग्रगण्य दैनिकाला त्यांचे संपादकीय मागे घ्यावे लागले. माफी मागावी लागली. इतिहासात असे कधी घडलं असेल असं वाटत नाही. अतिशय सभ्य भाषेत लोकशाही मार्गाने आपण अनेकांनी संपादकांना प्रतिक्रिया पाठवून त्यांचे आरोप खोडून काढले. आपली भाषा कडक होती पण त्यात द्वेष अन विखार नव्हता. मदर तेरेजा ह्यांचे कार्य अन विचार आपल्या कृतीत होते. हा ख्रिस्ती मूल्यांचा विजय आहे.

वसईतील अनेक चळवळीचे नेतृत्व केलेल्या धर्मगुरूंशी मागे एकदा सामाजिक प्रश्नांवर बोलण्याचा योग आला होता. आपली लोकसंख्या कमी होत असताना मतपेटीतून व्यवस्था परिवर्तन करणे नजीकच्या काळात अशक्य आहे, ही चिंता तेव्हा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु समाजातील बुद्धीजीवी गटाने एकत्र येऊन लेखणीचा वापर करून, माहिती अधिकार आणि जनहित याचिकेचा आधार घेऊन जर व्यवस्थेविरोधात लढा दिला तर आपण आपल्यावरील अन्याय दूर करू शकतो व व्यवस्थेकडून आपले हक्क मागू शकतो, असे ठाम विचार त्यांनी व्यक्त केले होते.

आज लोकसत्ताने आपले संपादकीय मागे घेऊन जी जाहीर माफी मागितली आहे, ते धर्मगुरूंनी सुचवलेल्या कायदेशीर मार्गाचं प्रेरणादायक उदाहरण आहे.


सचिन मेंडिस  

संदेश

प्रवासात अनेक चेहरे भेटतात. त्यांच्याशी संवाद साधला तर आपण किती सुखात आहोत, तरीही माणूस म्हणून किती शून्य आहोत, ह्याचा प्रत्यय येतो. आजचाच अनुभव. खूप काही शिकवून जाणारा.

आजच्या आत्मकेंद्रित जगात अल्पशिक्षित असूनही त्यागाचे जीवन जगणारा 'संदेश' भेटला. आदिवासी मुलगा. वय साधारण २१ वर्षे. आज विरार स्टेशनकडे बाईकवर प्रवास करीत असताना त्याने रस्त्यात हात केला व लिफ्ट मागितली. मी संवाद साधला. तो आपल्या घरी डहाणूकडे निघाला होता. गावात एका कारखान्यात कामाला होता. दिवसाची २५० रू. मजुरी.

मी त्याला अजून बोलतं केलं. ८ वी पर्यत शाळा झालेली. मग कुटुंबाची जबाबदारी पडल्याने शाळा सोडावी लागली. दर महिन्याला ५००० रू. तो गावी पाठवतो. स्व:ताचं शिक्षण न झाल्याचं क्षल्य उरी असूनही आज छोटा भाऊ १० वीत शिकत असल्याचं समाधान त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं.

कुटुंबाचं भल व्हावं म्हणून राबणारा, दोन वेळ डाळ-भात खाणारा अन फक्त रविवारी भाजीची चव चाखणारा संदेश 'माणूस' म्हणून खूप ग्रेट वाटला. रस्त्यात त्याने गाडी थांबवायला सांगीतली. देव दर्शनासाठी त्याला मंदिरात जायचे होते. बहुतेक त्याच्या संघर्षाचं बळ श्रध्देत असावं. मला मंदिरात न जाताही देव भेटला होता, माणसाच्या रूपात.

छोटी छोटी माणसं सुध्दा किती मोठा संदेश देऊन जातात ना? फक्त संवाद हवा.

सचिन मेंडिस
उन्हाळी सुट्टीच्या दिवसात आजही सोसाट्याचा वारा सुटला की मन गावातील हरवलेल्या चिंचेच्या झाडाचा शोध घेते. चिंचेचा पाऊस ओंजळीत घेताना जी श्रीमंती अनुभवायला मिळायची, त्याची सर आज पैशाच्या पावसाला येणार नाही.

चिंचेच्या बदल्यात बोरे, काजू, फुगे, भुईमुगाच्या शेंगा इत्यादी विकत घेताना येणारा आनंद आज मोठमोठ्या मालमत्ता विकत घेताना प्रत्येकाला गवसतं असेलंच असं नाही.

मुलांच्या उन्हाळी सुट्टीत आजही मन बालपणातील चिंचेच्या झाडाजवळ घुटमळते. गावातील झाडे गेली. चिंचा गेल्या. सुबत्ता आली, चिंता आल्या. पदोपदी चिंता वाहणारी नवी पिढी. दुर्भाग्य म्हणजे आईवडिलांच्या कुशीत शिरून चिंता हलक्या कराव्या तर कुठलंस अनामिक अवघडलेपणं आलेलं. वयाने मोठे झाल्याची किंमत म्हणा पाहीजे तर. अशा वेळी चिंचेच्या झाडाचा आधार घ्यावा का?

पाऊलखुणा

पाऊलखुणा 󾇛

बयकडं लक्ष गेलं. भल्यामोठ्या रांगेत लाल लुगड्यातील बय लक्ष वेधून घेतं होती. साधारण ८५ वर्षे वय असावं. तसं वयाचं कारण पुढे करून तिला रांगेऐवजी सरळ रमेदी मातेचं दर्शन घेणं अशक्य नव्हतं, परंतु तिच्या वार्धक्यापेक्षा तिची श्रध्दा जास्त बळकट असावी. किती नितळ, निर्मळ भासत होती बय. काय मागायला आली असेल बय ह्या वयात. तसं बयचं आयुष्य देण्यातचं गेलं असांव. कुठलीही बस असेना, ती जगलीही असेल तर दुसर्यांसाठी. स्वत:चं असं काही जगलीचं नसावी.

बय जसजशी पुढे सरकत होती तसंतसं माऊली अन तिच्यातल अंतर कमी होत होतं. माझं लक्ष बयवरून हटत नव्हतं. इवलीशी बय त्या गर्दीत किती श्रीमंत वाटत होती. जणू वाळलेल्या बागेत डोलणांर गुलाबांच फुलं. बयने हातातली पिशवी उघडली अन अलगदपणे त्यातून अबोलीचा हार बाहेर काढला. बहुतेक बयनेचं बनवला असावा तो हार माऊलीसाठी. किती सुंदर दिसत होता तो हार बयच्या हातात. अन हारापेक्षा सुंदर लाल लुगड्यातील बय.

गेली ३-४ वर्षे बयला मी रमेदमावलीच्या अंगणात पाहत होतो. किती बहरायची ती रमेदमावलीच्या पाऊलवाटेत. तिला रमेदमावलीची ओढ असेल की रमेदमावलीला तिची. बयला ह्या वयात कुठून बळ मिळत असावं इथ येण्याचं? काय संवाद चालला असेल तिच्यात अन रमेदमावलीत इतकी वर्षे? की रमेदमावलीचं तिच्या जगण्याची ओढ असावी? माझं कुतुहुल क्षमत नव्हंत.

काही वेळाने बयची सावली माऊलीच्या दारात पोहोचली. थरथरत्या हाताने बयने अबोलीचा हार माऊलीच्या गळ्यात घातला अन माऊलीच्या गालावर हलकेचं चुंबन घेतलं. किती सुंदर, निरागस अन पवित्र क्षण होता तो. मला क्षणभर माऊलीचा हेवा वाटला. बयने हळुवारपणे आपले हात माऊलीच्या पुढ्यांत जोडले आणि ती माऊलीशी बोलू लागली. तिचां संवाद ऐकण्याची अनामिक ईच्छा माझ्या मनात निर्माण झाली. काय मागत असेल ती माऊलीकडे? अन ह्या वयात? स्वत:साठी नक्कीचं मागायला आली नसावी. तितकी खात्री देवळात उपस्थित कुणीही देऊ शकलं असतं. बयला न ओळखणांरही. तसं मी तरी बयला कुठे ओळखत होतो. पण बय मला माझी,आपली वाटू लागली होती.

माझं मिस्साबलीमध्ये लक्ष नव्हतं. किंबहुना मिस्सेइतकंच पवित्र अन मंगल मला बयचं अन माऊलीचं मिलन वाटतं होतं. बय माऊलीचं दर्शन घेऊन माघारी फिरली. रमेदमावलीचं अंगण बयच्या पाऊलखुणांनी बहरलं होतं. बयच्या परतीच्या वाटेत मी ऊभा होतो. बय जसजशी माझ्या समीप येत होती तसतशी मला एका नितळ सुगंधाची अनुभुती होतं होती. बय काही मागून गेली असेल की देऊन गेली असेल? उत्तरं शोधण महत्वाचं नव्हतं, त्यापेक्षा बयचं स्वर्गीय अस्तित्व डोळ्यात साठवण जास्त गरजेचं होतं.

मी रमेदमावलीच्या चेहर्याकडे पाहिलं. माऊलीच्या चेहर्यात मला बय दिसत होती. मला तो क्षण अगम्य वाटला. मी पाठी वळून बयकडे पाहिलं. मला लाल लुगड्यातील रमेदमावली हळूवार पाऊंल टाकीत गर्दीत विरघळताना दिसली. मी बयच्या पाऊलवाटेत माऊलीच्या पाऊलखुणा निरखू लागलो. माऊली दर्शन देऊन परतली होती. ज्याचं नशिब होतं, त्याने 'रमेदबय' अनुभवली होती.

--------------------------
सचिन मेंडिस 󾇛

'बय'

'बय' हा माझ्या लिखाणाचा नेहमीचा विषय. बयला पाहिले तर चार ओळी सहंज सुचतात, इतकी बय लेखणीला भावून जाते. कधी लिहायला विषय नसला तर 'बय' मदतीला धावते. आज सहज फेसबुक चाळत असताना बयचा प्रसन्न फोटो समोर आला. क्षणभर थांबलो. बयच्या निर्मळ रुपाला डोळ्यात साठवून घेतलं. काय लिहावं ह्या फोटोविषयी. अनोळखी चेहरा तरीही कितीही जवळचा वाटणारा. रॉजरचंसुध्दा कौतुक करावं तितकं थोडं इतक्या बयच्या वेगवेगळ्या मुद्रा त्याने कँमेर्यात रूजवल्या आहेत.

किती दशकांच ओझं घेऊन बय इथपर्यंत आलीयं. न थकता, न थांबता, न तक्रार करता अक्ख्खा कुपारी समाज आपल्या उबदार मिठीत घेऊन बयचा अवर्णनीय प्रवास झालांय. एक चालताबोलता इतिहास,ज्या इतिहासात आनंदाचे क्षण कमी अन संघर्ष जास्त दडलांय. असा संघर्ष ज्या संघर्षाच्या पायावर एक सुशिक्षित अन संपन्न कुपारी समाज उभा राहिलाय.


लहानपणापासून बयला आपण डोळ्यात जागवत आलोय. किती मुद्रा पाहिल्या असतील बयच्या आपण. लहान बाळाला मांडीवर उलट झोपवून आंघोळ घालणारी बय, विहिरीच्या बाजूला झावळ्या विणणारी बय, घराच्या पाठीमागे चुलीवर ठेवलेल्या पातेल्याखाली नारळाची साल घालणारी बय ते वाडीतून डोक्यावर भाजीपाला वाहून आणणारी फोटोतील बय. सतत वाहत असणारी.

एक मात्र खंर. प्रत्येक मुद्रेत बयची ओळख जरी वेगळी असली तरीही ध्येय अन संघर्ष सारखांच असतो, आपल्या पिल्लाचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्याचा. नाही का?

'लादलेला दृष्टीकोन'

'लादलेला दृष्टीकोन'

काल 'नाईटी' हा वस्त्र प्रकार समाजात कधी व कुठे वापरावा ह्याबद्दल वेगवेगळी मते वाचायला मिळाली. मुळात अनादी काळापासून वस्त्रं हया प्रकाराचा उपयोग शरीराचे ऊन,वारा,पाऊस ह्यापासून 'रक्षण' व पुढे 'लाज' झाकण्यासाठी म्हणून होऊ लागला. लाजेअगोदर शरीररक्षण हा गरजेचा क्रम लक्षात घेतला तर पहिली 'शारीरीक' तर दुसरी 'लादलेली मानसिक' गरज ठरते. चुडीदार व नाईटी हे दोन्हीही वस्त्रांचे प्रकार, उपयोजिता लक्षात घेतली तर दोन्हीही गरजा पूर्ण करतात, परंतु नाईटीला 'रात्र' हा शब्द चिकटल्याने तिचा कालसापेक्ष वापर ठरवला जाऊ लागला. हा बदललेला दृष्टीकोन. इथे उपयोगापेक्षा 'काळ' हा घटक वरचढ ठरतो.

पावसाळ्यात रंगबेरंगी फुलाची छत्री घेऊन तो उभा होता. एकाने विचारले, 'काय आज बायकोची छत्री?'. तो म्हणाला, 'लेडीज छत्री आहे म्हणून काय मी थोडाचं भिजणार आहे?'. इथ पुरूषाची छत्री म्हणजे काळ्या रंगाचीच असावी अस गृहीतक मांडून संवाद साधला गेला होता. काळी व रंगबेरंगी हे दोन्हीही छत्र्यांचे रंग, उपयोजिता लक्षात घेतली तर दोन्हीही गरजा पूर्ण करतात, परंतु छत्रीला 'रंग' हा घटक चिकटल्याने तिचा रंगसापेक्ष वापर ठरवला जाऊ लागला. हा बदललेला दृष्टीकोन. इथे उपयोगापेक्षा 'रंग' हा घटक वरचढ ठरतो.

ती जाडजूड स्त्री. घामाघूम झाली होती. तिने पर्समधला रूमाल काढला अन चेहरा पुसला. आजूबाजूच्या बायका तिच्या हातातील मोठ्या आकाराचा रूमाल पाहून 'अगं बाई, जेन्टस रूमाल' म्हणून हसू लागल्या. इथ स्त्रियांचा रूमाल म्हणजे आकाराने छोटाचं असावा असं गृहीतक मांडून संवाद साधला गेला होता. मोठा व छोटा हे दोन्हीही रूमालांचे आकार, उपयोजिता लक्षात घेतली तर दोन्हीही गरजा पूर्ण करतात, परंतु रूमालाचा 'आकार' हा घटक चिकटल्याने तिचा आकारसापेक्ष वापर ठरवला जाऊ लागला. हा बदललेला दृष्टीकोन. इथे उपयोगापेक्षा 'आकार' हा घटक वरचढ ठरतो. वरील दोन उदाहरणात 'जेंडर स्पेसिक प्रॉडक्ट' ही मानसिक गरज आहे, 'अँप्लिकेशनशी' तिचा काडीमात्र संबंध नाही.

अशी अनेक उदाहरणे देता येतील, जिथे मूळ उपयोगापेक्षा एखाद्या वस्तूचा त्याचा रंग, आकार, काळ व इतर अनेक घटकांवर ती वस्तू कोणी, कधी व कशी वापरावी हे ठरवले जाते. ह्याला आपण 'समाजमान्यता' असं म्हणतही असू, परंतु मला तो 'लादलेला दृष्टीकोन' असंच वाटते.

सचिन मेंडिस

कुपारी बाजीगर

पंधरा वर्षापूर्वी त्याची कंपनी बंद झाली. त्याने दुसरीकडे नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतु वाढलेले वय , कमी शिक्षण अन बदलेली परिस्थिती ह्यामुळे नोकरी काही मिळाली नाही. संपूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून. मुलांची शिक्षण बाकी होती. वयाच्या ५० शी मध्ये त्याच्यासमोर फक्त काळोख होता. ३-४ महिने कसेबसे त्याने काढले परंतु पैशाचं सोंग घेता येणं जास्त दिवस शक्य नव्हतं.

त्याने बायकोला मनातला विचार बोलून दाखवला. बायको हिरमुसली. चांगल्या कंपनीत काम केलेला आपला नवरा लोकांच्या वाडीतला भाजीमाल दादरला नेऊन विकणार? माहेरची मंडळी काय म्हणेल, गावातली लोक हसतील का? पण तो निर्णयावर ठाम होता.

त्याने स्वताच्या वाडीत मेहनत करायला सुरुवात केली. पण तुटपुंज्या जमिनीच्या तुकड्यावर जास्त माल पिकवणे शक्य नव्हते. मग त्याने गावातील काही पडीक जमीन भाडेतत्वावर (अर्धल) घेवून कसायला सुरुवात केली. सुरुवातीला अक्षरश: ढोर मेहनत केली. दादर मार्केटचा अभ्यास केला. आपल्या कडून विकत घेतलेली तुळस पुढे कुठे जाते, ह्याचा माग काढला. मधल्या दलालांना बाजूला ठेवून शेवटच्या मोठ्या गिर्हाकाकडे पोहचण्यात त्याला यश मिळाल.. इथून त्याच नशीब फिरलं. घरात पैशाचा ओघ वाढू लागला. पण मेहनत थांबली नाही.
जी जमीन भाडेतत्वावर (अर्धल) घेवून तो कसत होता त्यातली काही जमीन त्याने २ पैसे देवून खरेदी केली. तिथचं त्याच घर उभ राहिलं.

आज मुलं उच्चशिक्षण घेवून मार्गी लागली आहेत. दरवर्षी नवीन देशाचं पर्यटन होते. बँक खात्यात एखाद करोड जमा आहेत. सध्या एका आयुर्वेदिक कंपनीबरोबर औषधी तुळशी बद्दल बोलणी चालू आहे. काल रस्त्यात भेटले तेव्हा विषय निघाला. मी म्हटलं 'तुमच्यावर लिहायला पाहीजे'. त्यांनी हात जोडले, म्हणाले 'मला मोठं करू नकोस, जमलं तर आपण टाकलेल्या शेतीला मोठं कर, पोरांना म्हणांव छोटी नोकरी करण्यापेक्षा ३-४ जण एकत्र येऊन शेती करा, जे माझ्या सारख्या कमी शिकलेल्या माणसाला जमलं, ते नव्या पिढीतल्या उच्चशिक्षितांना का जमणार नाही?' मी पर्याय नव्हता म्हणून ह्या धंद्यात आलो, तुम्ही संधी म्हणून या'.

मी काही बोललो नाही, मला तो कुपारी बाजीगर वाटला, परिस्थितीशी हरून पुन्हा जिंकलेला.

सचिन मेंडिस
-------------------------------------

( कृपया ही गोष्ट आपल्या तरूणांबरोबर शेअर करा. एखादा कुणीतरी प्रेरणा घेऊन प्रगती करेल.)

रोटी, सुनिल और स्पीडब्रेकर

रोटी, सुनिल और स्पीडब्रेकर

काल घारा गेलो ते समोर गराम गराम शा आन तळणाई रोटी. नाय लगने नाय कय सोहळे, पण कुपारयाला रोट्यो काड्यादो कय कारण लागाते गा? बेह्ल्या जागी मे ४ जाग्या लाविल्यो. मे विसारला ते कळाला कि मराडीशा मावशी घरणे रोट्यो आल्त्यो. मावशी अमेरिकेला गेल्ती तडने कुहनो तरी 'लो कोलेस्ट्रोल' पीठ घेवोन आल्ती. घारा डॉक्टर अहलोगा ओ प्रॉब्लेम (नोएल, ऐकिला गा). असो, मा तोंडा लागली ना, ता बस झाला. मम्मी हांगाते ५ रोट्यो पहरावशा सुनील ला दिल्यात अन पोशव्या हान्ग्लीयात. रोटी खादो बरी रे, पण वाटणी पोशव्याशी मंजे रोटीमिनशा तेलाहारखीस कटकाट. में विसार केलो यो वाटणीयो रोट्यो मे खाते अन उद्या सुनीलला समजावोन हांगाते. पण कुपारी सातबारो फिरविदे पण 'तळणाई रोटी' अन 'वाला भाजी' ह्या बरोबर गद्दारी नाय कर्यासो. अन सुनील ते रोट्याओ वेडो, त्याई वाटणी पोसली पाय. में सुनीलला फोन लाविलो आन हांगीला शा करोन ठव में रोट्यो घेवोन आलो.

मम्मीने प्लास्टीकशा काळ्या पिशवीत ५ रोट्यो घालोन दिल्यो. आते मा बुलेटला डिगी नाय ते तहिस ती पिशवी मे हँडलला टांगविली अन गाडी बोळींजने नंदाखालला हाकिली. एक ते बुलेटसो ब्रेक कमी लागाते अन वरती रस्त्यात ये ओजलेले भोटे स्पीड ब्रेकर टाकील्यात. त्या स्पीड ब्रेकरशी लांबी रुंदी उंची बगीली गा टाकणारो 'आडसळ' हायदे इ मे अनुमान काढला. (मा कय चुकले हाय दे ते बी बरा नाव सुचवा). मे वर खाला वर खाला करीत जे पी नगर मार्गे पहरावात एकदासो पोसलो. बहुतेक पोटात शा आणि रोटी पक्के विरघळल्यात हायद्यात. सुनिलशा आंगळ्यात पोसलो ते सुनीलशी नवरी हातात टोपला घेवोन उभी. अरे माझ्या देवा, मी विसार केलो जेमतेम ५ रोट्यो हाडल्यात अन इने जाम होस केलेली दिखाते. मागोमाग सुनील हातात शा शे २ कपे घेवोन उभी. सुनील हांगाते, 'मेंडिस, रोट्यो कडे हात.' अरे माई खबार घ्याशी होडोन पयली याई रोट्याई चौकशी (उतेळी ई कुपार्या डीएनए मिनेस हाय). मे हँडलला लाविलेल्या पिशवीला हात लाविलो ते पिशवी पतिंगा हारकी हुराते. मला घाम फुटलो. बगीते ते पिशवीला पण घाम फुटले. वाटला पिशवीला पण गर्मी करते हाय दे गा का? नंतर कळाला कय नाय, पिशवितने तेल टपकाते. माला कळाला रोट्यो अगोदरूस टपकाल्यात. रस्त्यात गेम जालतो. मे सुनीलला हांगीला 'सुनिल, तू होस केले रे पन रोट्यो रस्त्यात पडल्यो वाटाते'. मे ओडा बोले बस ते सुनीलशा नवरी हातातने टोपला आन सुनिलशा हातातने शा सा कप धपकन खाला पडला. का कुणा हांगो माला टोपला भरलेल्यो रोट्यो आंगळ्यात गाडगुलीघत पळताना दिघल्यो.

ओड्यात सुनील सो पोर ओट्योरने बोयलो, 'सचिन अंकल, तुमाला नंदाखालसो रस्तो माहित होतो भगुन तुमे जेपी नगरने टर्न घेतलो, बहुतेक रोट्यो सरळ आगाशी रोडला गेल्यात हायद्यात'. मे त्या तोंडोर बगीला. तोंडात गाळ आलती पण सुनिलसो तापाट स्वभाव माला माईत होतो भगुन मे गाळ तहिस तोंडात गिळली. सुनिल मान्या तयार नोतो. हांगाते 'यात कय तरी राजकारण हाय'. अडे राजकारण करोन माई होस पुरले अन माला माईत हाय की पिशवीशे माये ५ नगरसेवक वोटिंग होयशा अगोदरूस पडल्यात. मे सुनीलला हांगिला, 'खोटा वाटाते हायदे तर मा मांगी भे अन सल'. माला वाटला सुनीलने विषय खपवे पन याने गाडीआ मागे पाय टाकीलो. आते इलाज नोतो. आमशी फटफटी उरफटी निगाली.

जेपीनगर ये तो बगिते ते पयल्या स्पीडब्रेकर पा एक कागुळो पायात रोटी धरून सोशीये कड्डीते. मे सुनिलला हांगिला तडे बग एक नगरसेवक हापडलो बघ. कागुळ्याने आमशोर बगिला अन फुर् उडालो. सुनिल शिडलो, हांगाते या कागुळ्या आयशा नवर्याने रोट्यो धाडल्योत्यो गा. ता ऐकोन माला सुनिलशा नवरी हातसा टोपला आठवाला. सुनिस सो का दोष कर्यासो कुणा पण नवर्याला राग येणार. आमे पुढे निगाले. गिअर बदले ते दुहरो स्पीडब्रेकर आलो. सुनिल बोयलो, 'ये ब्रेकर जुळे जन्माला आल्यात वाटाते, सगळो वेड्यावं कारभार'. माला कळातोता ई रोटीआ दुख हाय पन तोंड उगडला तर मा पाठीत येदे. सुनिलने अडेतडे नंदार मारली ते बाजूशा गटारात एक रोटी तरताना नंदर्या पडली. सुनिल बोयलो, 'ती बग हापडली'. मे हांगिला, 'घरने गरय घेवोन येव गा.' सुनिल का उमज्यासो ता उमजालो. आमे पुडे निगाले. बोळींज सो टर्न ये तो स्पीड ब्रेकरसो भोटो भावजी लागलो. आमे दोगे त्यावरने आपटाले आन बाजूशा झाडामेरे पोसले. बगीते ते का? तिहरो नगरसेवक (रोटी) फांदीवर गाव्या लागले अन तो आख्खो मुगल्याई वेंग्यात घेतले. 'या मुगल्या सोकाट जाला ते,' सुनीलने मुगल्याकरता प्रार्थना केली. मे कय बोयलो नाय. ३ विकेट पडलोत्यो. 'सुनिल पुढे जासा गा वळ्यासा, मे सुनिलला घाबरातुस विसारला. नाय ५ ई रोट्याव हिशोब लागलो पाय, यात कय तरी राजकारण हाय. आयला, आते याला का हांग्यासा. एक ते ओ तापट वरती स्वाभिमानी. मे हांगिला सुनिल, तुआ पोर हांगातोतो ते आपुन आगास रोडला जाय गा? दोन त्या वाटेला गेल्यात हायद्यात. सुनिलने मावर डोळे भोटे केले. मे माव हिसाब चुकतो केलतो.

जाला, आमे भंडारआळी पार करोन बोळींज सोपारा रोडला लागले. नेमखो राम मंदिरासमोर उस्सो स्पीडब्रेकर. 'आयला या महापालिकेने देवाला पय ना होडला ता रे,' मे सुनिलला हांगिला. आमे गाडी थांबविली अडे तडे नजार मारली. रोटी कय नजार पडली नाय. बाजूला खांबाखाला एक कुत्रा जाम आहातोता. माला डाउट आलो पन कुत्र्याला कहा विसर्यासा. पन कुत्र्या तोंडाला तेल दिखातोता. मे सुनिलला खूण केली. सुनिलशी हीर तापली. वेडxxxये साले, सोर येत्यात तिगाळा निजात्यात अन आते बरे जागे रेत्यात. मे सुमडीमिने गाडी सुरू केली. ४ नगरसेवक हापडलोते. आमे पुढे निगाले अन १० फूट पुढे जाय ते रमेशवकीलशा आंगळ्यासो स्पिडब्रेकर आलो. सुनिल मागे होतो. थांबण्याशिवाय पर्याय नोतो. आमे अडे तडे बगीला. तळ्याबाजूला २ मांजरीआ कसका पडलोता. दोगामिने १ रोटी ओळख पटवण्यापलिकडे मार खातोती. माला रोटीई हालत बगोन नेल्सन दमेलशा गोष्टीसो कळ्याव काळो सुंबिलेलो लाडू आठवालो. 'अडे पासर अहीलोशी ते यांशे डोखे फोटलोशे,' सुनिलने प्रेमाने मांजरीवर बगोन हांगिला. आमशा ५ व्या रोटीओ शोध लागलोतो. तहा बगीला ते रमेशवकिलशा आंगळ्यात आमे केस हरलोते. माला समाधान या होता की मे राजकारण केला नाय ता मे सुनिलला डोळ्यादेखत सिध्द केलता.

मे सुनिलला हांगिला आते आल्यास बोळींजला ते घारा शा घे सल. सुनिलने मुंडी हालविली. घारा पोसले अन मम्मीला शा कर्या हांगिलो. मे सुनिलला रोट्यो द्या गेलतो अन सुनिलला घेवोन मेस घारा आले ई मम्मीला कय उमजाला नाय. सुनिल शांत होतो, बहुतेक मनातशा मनात स्पीडब्रेकर फोटतोतो हायदे.
मम्मीला विसारला 'एखादी रोटी हाय गा'ते मम्मीने 'मालास रेली नाय' अही कम्पलेंट केली. मा तोंडाला रोटी लागलोती पन ओ डबलसीट हाडले त्या का कर्यासा. ओ हुक्कोस जाय ई माला कळला. सुनिल शांतस होतो. जेपीनगर शे स्पीडब्रेकर मनातशा मनात जाग्या लागले हायद्यात याव माला अंदाज आलो.
मम्मीने शा कपात वाळ्या लाविलतो बस ओड्यात माई लेक आली. 'डँडी, मम्मीने शिशीनवहीनीच्या घरी रोट्या द्यायला दिलेल्या पण ते सगळे दमणला गेलेत अन परवा यायचे'. मे सुनिलशा तोंडोर बगिला अन सुनिलने मा तोंडोर. मे पोरीपा पिशवी हातात घेतली अान सुनिलशा हातात दिली. सुनिलला दमण पावलोता. मे हुटलोतो. सुनिलने शा तोंडाला लाविलो. मे आतमिने जाओन कापडी पिशवी हाडली अन रोट्यो त्यात टाकील्यो. पुन्ना रिस्क कून घेते. रोट्यापेक्षा सुनिल उनो.

राती सुनिलसो वॉट्सअँपवर मेसेज आलो. बहुतेक अर्ज होतो. मे वाशा सुरूवात केली,

'प्रति,

आयुक्त
वसई-विरार महानगरपालिका,

विषय: स्पीडब्रेकरमुळे झालेली नुकसान भरपाई मिळणेबाबत'

मे विसार केलो आयुक्त सतीश लोखंडेला बहुतेक आते रोट्यो काड्या लाग्यात.

गावं हेच खरं 'राव' असतं

गावात मरण झालं. साधासरळ देवमाणूस चांगलं जीवन जगून परतीच्या प्रवासाला निघाला. सायंकाळची वेळ होती. घरात व आजूबाजूच्या घरात चुली पेटल्या नाहीत. अर्ध्या तासापूर्वी बोललेली व्यक्ती आपल्यात नाही, हे किती अनपेक्षित.

रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली. गावातील क्रियाशील व्यक्तींची पाऊले हलू लागली. चहा नाश्त्याची सोय होऊ लागली. लहान मुलांना दूध, जेवणासाठी दुसरीकडे नेलं गेलं. आजारी शेजाऱ्यांच्या व नातेवाईकांच्या औषधाची सोय केली गेली. गावात राहण्याची उब काय असते, ह्याचा प्रत्यय अशा प्रसंगातून आला.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असू दे, गावं उभं राहतो. गावं पुढं आलं की संकट माघार घेते, हा इतिहास आहे. सुखात सर्व गावं असेलच असं नाही, परंतु दुःख्खात गावं उभं राहतं. कधी कधी काही व्यक्ती किव्हा एखादे श्रीमंत कुटुंब गावापेक्षा मोठा असल्याचा आभास निर्माण करतात. व्यक्ती कितीही मोठा असुदे, मग तो पैशाने, हुद्द्याने वा कीर्तीने. तो गावापेक्षा मोठा होऊ शकत नाही.

गावात भांडण तंटे असतात. निंदा-नालस्ती चालते परंतु अडचणीला जसा गावं धावून येतो तसा कुणी राव धावून येऊ शकत नाही. कारण जे गावं करील ते राव करील काय? मग ते गावं कोणतंही असू दे, तुमचं वा आमचं, गावं हेच खरं 'राव' असतं.

मला भावलेला जॉन

मला भावलेला John Pereira 󾁅

जॉन सर्वाना आवडतो, आपला वाटतो. जॉनच्या धावपळीमुळे व प्रकृतीकडे करीत असलेल्या दुर्लक्षामुळे सर्वाना जॉनची काळजी वाटते. दुसर्यांना जॉन आपला वाटणं, त्याची काळजी वाटणं हे जॉनच्या ५० वर्षाच्या आयुष्याचं संचित आहे. हे संचित फक्त अनमोल नाहीए तर तितकचं आदर्श अन अनुकरणीयही आहे. जो दुसर्यांच्या अंगणात आनंदाचं झाड लावतो, त्याच्या अंगणात सुखाची फुलं दरवळतातं असं म्हटलं जातं. जॉनने आपल्या घरात सुख यावं हा हेतू डोळ्यापुढे ठेऊन इतरांच्या अंगणात कधी झाडं लावली नाहीत. तसा त्याचा मुळी स्वभावचं नाही. तो निस्वार्थी वृत्तीने वाहत असतो, म्हणून त्याची ओंजळ कधी आटत नाही अन आटणारही नाही.

जॉनची ओळख कधी झाली ती आठवत नाही परंतु जसजसा त्याचा परिचय व सहवास वाढत गेला, तसतसा त्याच्यामधील 'देवमाणूस' उलगडत गेला. आजच्या स्वार्थी व चंगळवादी दुनियेत जॉनसारखा नम्र, निस्वार्थी, नैतिक व निरागस मनुष्य मित्र म्हणून लाभणं हे भाग्यचं. त्याच्या गरजा मर्यादीत आहेत. भौतिक सुखाची त्याला ओढ नाही. जगण्याची त्याची स्व:ताची तत्वे आहेत अन तो तत्वांशी तडजोड करीत नाही. तो त्याच्या जगण्याशी प्रामाणिक आहे म्हणून त्याच्या ५० व्या वाढदिवसी दोन शब्द लिहीताना कुणाला उसने शब्द घ्यावे लागत नाही.

दिवंगत फा. नँप हे जॉनचे श्रध्दास्थान. जॉनच्या आयुष्यावर त्यांचा खूप प्रभाव जाणवतो. म्हणूनच फादरांनी लिहिलेल्या गीताप्रमाणे जॉन 'कधी धरतीस अंथरतो तर कधी आकाश पांघरतो'. आभाळाला छत व धरतीला अंथरूण मानून जॉनसारख्या समई अखंड तेवत असतात म्हणूनचं लोकांच्या वाटेवर प्रकाश सोबत करतो. काळोखाला भगदाड पाडण्याचं मूळ व सामर्थ्य जॉनच्या धार्मिक श्रध्देत असांव. 'सचिन, तू प्रत्येक रविवारी मिस्साला जात जा' असं जेव्हा तो निरागसपणे पण तितक्याचं पोडतिडकीने समजावून सांगतो तेव्हा त्याला कर्मकांडापेक्षा जीवनाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करण्यासाठी ख्रिस्ती श्रध्दा कशी गरजेची आहे, हे अभिप्रेत असावं.

जॉनच्या प्रवासात त्याची पत्नी वेरोणीकाला विसरून चालणार नाही. निस्वार्थीपणे लोकांना वाहून घेतलेल्या जॉनचं वेरोणिका ही मानसिक बळ आहे. ज्याचं मानसिक बळ अगाधं असतं त्याला संघर्षाची भीती नसते. म्हणूनचं पाणी आंदोलनापासून सुरू असलेला व्यवस्थेविरूध्दचां जॉनचा संघर्ष महापालिकाविरोधी लढ्यापर्यत तितकाचं त्वेषाने दिसून येतो. 'वेरोणिका येशूचा चेहरा पुसते' ह्याचा अन्वयार्थ लावण्यासाठी मला जॉन-वेरोणिका ह्या जिवंत पुस्तकाचं उदाहरण द्यावसं वाटेल. कुणाला ही अतिशोयोक्ती वाटेल, परंतु त्यांना जवळून ओळखणारे माझ्याशी सहमत असतील.

जॉन हा असा आहे, म्हणून गमतीने मी जॉनला 'वसईचा महात्मा गांधी' म्हणतो. खरंतर आज मी अशा निरागस, निस्वार्थी, नितळ माणसाला शुभेच्छा देताना त्यांचा आशिर्वादही मागतोय. आजच्या चंगळवादी दुनियेत जॉनपासून खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यासाठी कधीतरी वेळ काढून 'जॉन' नावाचं पुस्तक वाचावं लागेल. क्रिकेटच्या सामन्यात पंचगिरी करताना अनवधाने चुकीचा निर्णय दिल्याने संघाची जाहीर माफी मागणारा जॉन असो की स्टिफनच्या जाण्याने आठवडाभर निर्जीव झालेला जॉन असो. तो मनात फुलत राहतो, आसपास दरवळत राहतो. म्हणूनचं हवाहवासा वाटतो.

एकचं प्रार्थना. बाबा रे, प्रकृतीची खूप हेळसांड केली. आता जप तब्बेतीला. ही समई अनेक वर्ष तेवत ठेवायची आहे. तुझी आभाळमाया आम्हा मित्रांवर सदैव राहू दे.

सचिन मेंडिस